क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी: ज्ञान नाही विद्या नाही तयास मानव म्हणावे का? 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी: ज्ञान नाही विद्या नाही तयास मानव म्हणावे का? 
Today is the death anniversary of Krantijyoti Savitribai Phule

जन्म होतो नदीचा आणि जन्म होतो स्त्री चा

ती इवल्याश्या झऱ्यातुन आणि ती मातेच्या गर्भातुन फूलते

नदी नैसर्गिक घडते आणि स्त्री स्वभावतः घडत जाते

नदीचा गोतावळा झरा, ओढा, नाला, आणि समुद्र तर स्त्रीला मात्र बाप, भाऊ, प्रियकर, नवरा आणि मुलाचा जिव्हाळा; नदी सागरास भेटण्यास आतुर तर स्त्री सर्वांसाठी झटण्यात गुंतून असते. स्त्रियांना स्वताचा अभिमान समजत असतांनाच स्वाभिमान समजणंही गरजेचं आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला फरक समजण गरजेचं आहे. श्रद्धा आणि अंधश्रध्देतला फरक समजण त्याहून जास्त गरजेचं झालं आहे. आज हा शब्दप्रपंच का तर जिने आपल्याला वाचायला, लिहायला आपला मान सम्मान जपायला शिकवलं तीचा कुठतरी विसर पडत चालला आहे. स्त्री कशी असावी याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले.

भारताची पहिली स्त्रीवादी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सावित्रीबाई फुले या भारताच्या सामाज सुधारणा चळवळीतील महत्वाच्या नायिका होत्या. विशेष म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी ज्या बिगुलाचा बडगा उगारला तो आजही वारसा म्हणून जपला गेला आहे. जेव्हा समाज सुधारक ज्योतिबा फुले यांनी देशातली पहिली मुलींची शाळा उघडली तेव्हा सावित्रीबाई फुलेंनीदेखील तिथेच शिक्षण घेतलं. म्हणून त्यांना देशातील पहिल्या महिला शिक्षिकेची पदवीही मिळाली. सावित्रीबाईनी अंधश्रद्धेविरोधात प्रखर लढा दिला पण आजचा समाज अंधश्रद्धेत गुंततच चालला आहे. एका सावित्रीने वडाला फे-या मारायला शिकवलं तर एका सावित्रीने अज्ञानाच्या फे-यातून बाहेर पडायला शिकवलं. म्हणून सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा फुलेंची सावित्री समाजात रुजणं ही आजची गरज आहे.

जातीवाद आणि पुरुषी वर्चस्व असलेल्या सामाजिक व्यवस्थेची भीती न बाळगता त्यांनी मुलींचे शिक्षण ही समाजाची मोठी गरज असल्याचे सांगितले होते. जातीभेद, अत्याचार आणि बालविवाहाच्या दुष्कर्मांविरूद्ध सावित्रीबाईंनी शिक्षण व सामाजिक कार्याद्वारे जनजागृती तर केलीच, शिवाय कविता लिहून स्वत: ला कवयित्री म्हणूनदेखील प्रस्थापित केलं. कवि नदीला ला सागराची प्रेयसी आणि स्री ला पुरुषाची अर्धांगिनी म्हणून उपमा देतात. नदी ज्या गावातून जाते तिथली होऊन नवजीवन फुलविते, कुठे तीर्थक्षेत्र तर कुठे संगमक्षेत्र होते; तर स्त्री घर आणि समाजातुन वाहते जाई तिथे माया घेऊन जाते. सावित्रीबाईंनी देखील या समाजात प्रेम माये सोबतच स्त्री स्वावलंबन पेरलं तीने स्त्रियांना जगण्याचा धडा शिकविला ज्यातून आपण स्त्रियांनी घडावं असा संदेश दिला.

ज्ञान नाही विद्या नाही

ते घेणेची गोडी नाही

बुध्दी असूनी चालत नाही

तयास मानव म्हणावे का? अशा कवितेतून त्यांनी समाजाला प्रश्न विचारला होता.

महिलांचे हक्क आणि शिक्षणाच्या लढाईत आपले संपूर्ण आयुष्य घालवणाऱ्या सावित्रीबाईंचे नाव आणि चारित्र्य आजही जगातील अनेक स्त्रियांना प्रेरणा देते. प्राणांतिक आपत्ती सोसूनही स्त्रिया, अनाथ मुले ,श्रमिक समाज यांच्या सुखासाठी झटणारी आई सावित्री यांनी मुलींसाठी शाळा उघडली आणि शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातील समाजासाठी खुली केली.

स्त्रीया स्वत्व त्यागुण सर्वस्व पुरूषांना बहाल करतात. समुद्राला भरती आली की नदीला सुद्धा उसळाव लागते सोबतीला त्याच्या खळखळ कधी संथ तर कधी मंद वहाव लागते. हेच आजच्या स्त्रीयांना समजणं आवश्यक आहे. कारण पुरूष जरी आपलं सर्वस्व असला तरी आपलं स्वत्व जगण आपण शिकलं पाहिजे. स्त्री ही त्यागाची प्रतिमा, मायेचा सागर, माणुसकीचा झरा वगैरे ठीक आहे पण तिनेही कधीतरी स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, वेळ काढून स्वतःसाठी जगलं पाहिजे समाज घडविण्यात हातभार लावला पाहिजे.

वर्णव्यवस्थेच्या चौकटीत अडकुन राहिलेल्या दलितांना सन्मान.
अठराविश्व दारिद्र्यामध्ये खितपत पडलेल्या शेतकऱ्यांना न्याय.

अनेक तप अज्ञानाच्या अंधकाराला कवटाळलेल्या समाजाचा उद्धार, चूल आणि मूल इथेपर्यंतच मर्यादित राहिलेल्या स्त्रीला स्वकर्तृत्वाची जाणीव अशा अनेक आघाड्यांवर केवळ समाज सुधारणेचा वसा घेवून रात्रंदिवस झटलेले महापुरुष आणि विचारवंत ज्यातीरावांनी सावित्रीबाई ला शिकवलं होतं त्यांचं समाजात वेगळ स्थान निर्माण केलं होतं. तसच आजच्या ज्यातीबांनी देखील आपल्या सावित्रीमधले कलागुण ओळखून तीला या समाजात स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याची संधी देवून तीच्या सोबत सकारात्मकतेने आणि सम्मानाने वाटचाल केली तरच हा स्त्री-पुरूषांचा सामाजीक रथ योग्य मार्गाने आणि एकमेकांच्या सहकार्याने समाज बदलण्याची आणि घडविण्याची क्षमता ठेवू शकेल. कारण सावित्री किंवा ज्योतीबा दुसऱ्याच्या घरात नाही तर आपल्याच घरात आपल्याला शोधावा लागेल.

वयाच्या 66 व्या वर्षी ब्यूबॉनिक प्लेगच्या साथीने सावित्रीबईंना समाजाने गमावलं. साथीच्या विरूद्ध निर्णायक लढाई दरम्यान सावित्रीबाईंचे तथ्य जाणून घेणे प्रासंगिक आहे, त्या कारणामुळे तिचा समावेश भारतातील महान महिलांच्या यादीत करण्यात आला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com