गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळाच

- तुषारबरगट
रविवार, 20 डिसेंबर 2020

अमरावती जिल्हातील व्हाराडातल्या शेंडगावी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांची जन्मभूमी शेंडगाव असली तरी कर्मभूमी मात्र अख्ख्या भारतभर होती.

जानोरकराच्या घरात डेबू जन्माला आला, आणि या ऐहिक प्रपंचात रमला नाही. सुरुवातीला चार लोकांच्या दबावाखाली लग्न केलं. संसारात जीव रमण्यासाठी या माणसाचा जन्म झाला नव्हता. मग सुरु झाला डेबूजीं ते गाडगे महाराज हा प्रवास.

अमरावती जिल्हातील व्हाराडातल्या शेंडगावी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांची जन्मभूमी शेंडगाव असली तरी कर्मभूमी मात्र अख्ख्या भारतभर होती. संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर; आणि आज याच महामानवाची पुण्यतिथी.

समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी आपलं आयुष्य दिलं. गाडगेबाबांचे कीर्तन म्हणजे अगदी साध्या सर्वसामान्य माणसाला समजेल अश्या बोलीभाषेतलं. बाबांचं शालेय शिक्षण नसलं तरी भल्याभल्यां तत्त्वज्ञान घेऊन मिरवणाऱ्या भटांना/बुवांना आपले वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन व तसे उदाहरण देऊन धूळ चारत.  अंधश्रद्धा, बुवाबाजी, ग्रामस्वच्छता, श्रमदान जे माणसाच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडतील असे विषय बाबा कीर्तनात रहायचे.

पूर्वीच्या काळातली लोकं भोळी होती ,साधी होती कशावरही लवकर विश्वास ठेवत आणि त्याला बळी पडत. बऱ्याच बुरसटलेल्या विचारांना दूर करत  बाबा आपल्या बोलीभाषेत कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमातून जनतेला जागृत करीत असे

"धरती पैदा झाली तवा पासून देव कोनं पाहिला नाही.....देव कोणाले दिसला नाही....देव पाहायची वस्तू नाही.... "सत्यनारायण" ही देवाची भक्ती नाही..." ही 'भटजीची रोजगार हमी योजना हायय...' सरवी फसवेगिरी आहे रे....(वऱ्हाडी भाषा)

अगदी अशाच बोलीभाषेत बाबांचे कीर्तन असायचे.

विदर्भात दोन प्रमुख संत होऊन गेलेत थोर समाज सुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगेबाबा दोन्ही संतांनी विदर्भाच्या तळागळा पासून ते संपूर्ण देशात आपलं कार्य केलं तुकडोजी महाराजांचे आपल्या ग्रामगीतेत लिहितात...

    "जैसे आपणा स्नान करावे । तैसे गावही स्वच्छ करीत जावे।

    सर्वच लोकांनी झिजून घ्यावे । श्रेय गावच्या उन्नतीचे।।"

तसं बघितलं तर विदर्भाच्या प्रत्येक घरात या दोन संतांचा जवळून परिचय आहे. आता आपल्याला त्यांचे विचार त्यांचे साहित्य सर्वकडे पसरायचे आहे.

अध्यात्माचा विचार केला तर 33 कोटी देवांची निर्मिती करून ठेवलेली दिसून येते. पण इतके देव असतांनाही साधू संतांना जन्म घ्यावा लागला तो का? हा गहन प्रश्नच आहे.  भगवंताने जन्माला घातलेल्या या मानवजातीचा विकास करण्यासाठीच ह्या संत महात्म्यांनी पृथ्वीतलावर जन्म घेतला. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या माणसाला मार्ग दाखविण्यासाठी ह्या कर्मयोगी पुरुषाला जन्मास घातले. ह्या माणसाला जगण्याचं मर्म समजून सांगण्याकरिता चंदनासारखं झिजावं. हाच एक मनी ध्यास घेउन हे कर्मयोगी संत ही सृष्टी जन्मास घालत असावी.

कारण जो व्यक्ती शाळेत गेला नाही, जो व्यक्ती संगीत शिकला नाही ज्याला शास्त्र अध्यात्माची गरज नाही; तो व्यक्ती जेव्हा आपल्या साध्या सरळ वाणीतून अभंग गातो, किर्तन करून माणसात माणसाला देव शोधायला भाग पाडतो, गरीब, अनाथांना आपलं मानून त्यांची सेवा करतो तोच खरा संत होऊ शकतो, नाही तर अलीकडचे संत, बाबा, महाराज आपण बघूनच आहोत, नाही का?

जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।

तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती. खरंतर त्यावेळी ह्या संतांनी लिहिलेल्या साहित्याची, विचारांची गरज आजच्या वर्तमान काळाला आहे. कारण या परिवर्तनशील समाजातील माणसाच्या विचारातील उणिवा भरून काढण्याचं कामच ह्या संत विचारांनी केलंय.

कारण बदलो बदलना चाहिये। जैसी बखत आवेगीं।

हाच विचार घेऊन पुढे जाऊया ....

सामान्यांना दुर्गुण व दोषांची जाणीव करून देवून साध्या सोप्या भाषेत उपदेश देत होते. सावकाराकडून कर्ज काढू नका, चोरी करू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत होते.. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत होते. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत असायचे.

बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण आठवत होती. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांमध्ये होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते, जनसंपर्क होता, सुशिक्षित समाजथरातील काही लोकं स्त्रिया आणि अतिशूद्र या सर्वांना तुच्छ समजला जात होता. स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र करून गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे गावून घेत होता. गाडगे महाराजांच्या जीवनावर “डेबू” नावाचा नीलेश जलमकर दिग्दर्शीत चित्रपट मराठी प्रदर्शित झाला आहे. गाडगे नगर येथे त्यांचे समाधी मंदीर आहे. अशा या महामानवाने २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावतीला दवाखाण्यात आणता आणता वलगावला पेढी नदी ओलांडली आणि गाडीतच अखेरचा श्वास घेतला.  

- तुषारबरगट

संबंधित बातम्या