Antarctica: काही योग जुळून यावे लागतात...

ते माझे महाविद्यालयीन दिवस होते आणि तेव्हा वृत्तपत्रे व नियतकालिके हेच माहितीचे प्रमुख स्रोत होते.
Antarctica
AntarcticaDainik Gomantak

अजय करमली

भारतीय अंटार्क्टिका कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1984 मध्ये तिसऱ्या भारतीय मोहिमेदरम्यान अंटार्क्टिकामध्ये स्थापन करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या वैज्ञानिक बेस स्टेशनबद्दल म्हणजेच दक्षिण गंगोत्रीबद्दल वाचून मी अंटार्क्टिकेला जाण्याचे स्वप्न पाहिले होते.

ते माझे महाविद्यालयीन दिवस होते आणि तेव्हा वृत्तपत्रे व नियतकालिके हेच माहितीचे प्रमुख स्रोत होते. दूरदर्शनचे दर्शन आमच्यासाठी तोवर दूरच होते. खाडीत दीर्घकाळ काम केल्यानंतर मला आर्थिक स्थैर्य मिळाले, कॉलेज जीवनात पाहिलेले अंटार्क्टिका प्रवासाचे स्वप्न मी जपून ठेवले होते.

कामाच्या दरम्यान कोणतीही दीर्घकालीन रजा मिळणे नेहमीच कठीण होते आणि वर्षभर किंवा अर्ध्या वर्षाच्या पुढे कोणत्याही टूरचे नियोजन करणे केवळ अशक्य होते. किती वेळा नियोजित रजा रद्द करावी लागेल आणि मला ऑफिसमध्ये यावे लागेल याची शाश्वती नव्हती.

शेवटी, ऑफिस हे माझे पहिले घर होते आणि माझ्या कुटुंबापेक्षाही त्याला पहिले प्राधान्य होते. कारण मला आणि माझ्या कुटुंबाला जे हवे होते ते सर्व नोकरीने दिले आहे. जीवनाच्या वाटचालीत मला आर्थिकदृष्ट्या स्थिर केले आहे.

मी माझ्या निवृत्तीचे नियोजन वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी केले होते आणि निवृत्तीनंतर पण वयाच्या साठाव्या वर्षापूर्वी या प्रवासाचे कार्यक्रम आखत होतो. माझ्या निवृत्तीनंतरच्या काळावर आणि वेळेवर कोविडने वर्चस्व गाजवले आणि माझे अंटार्क्टिका सफरीचे स्वप्न हवेतच विरते, असे वाटू लागले. कोविडनंतरचे जग फिरण्यास योग्य उरणार नाही, असेही वाटू लागले.

त्यामुळे, आम्ही जवळपासच्या सफरींवर लक्ष केंद्रित केले होते. अशाच लडाखच्या सफरीत एक बेत जुळून आला. गेल्या वर्षी जूनमध्ये आम्ही आमचे शेजारी राजेश जोशी यांच्यासमवेत लडाखला गेलो होतो. तिथे जोशींचा वर्गमित्र असलेल्या नंदू ढेकणेशी भेट घडली. ढेकणे म्हणजे अतिशय उत्साही आणि मित्रांच्या गोतावळ्यात रमणारा माणूस.

लडाखला निघण्यापूर्वी श्रीनगरला निगेन तलावाच्या हाउसबोटमध्ये अंटार्क्टिका मोहिमेचा विषय निघाला आणि मी कान टवकारले. राजेश जोशीने ‘हर्टिग्रुटेन’ या नॉर्वेजियन क्रूझ कंपनीमार्फत अंटार्क्टिका सफरीचा घाट ते घालत होते. दोघांनी एक कॅबिन शेअर करायची वगैरे त्यांचे सुरू होते. नंदूला आणखी लोक सोबत हवे होते.

अनायासे माझेही अंटार्क्टिकाचे स्वप्न पूर्ण होणार होते, मी पट्कन हो म्हणून टाकले. पण, कॅबिन शेअर करायला कुणीतरी हवे होते. माया त्यावेळी तयार नव्हती. त्यामुळे, नंदूनेच एका व्यक्तीचा होकार मिळवला, पण तिने अंटार्क्टिकाची थंडी सहन होणार नाही, हे कारण देत माघार घेतली. शेअर न करता कॅबिन घेतल्यास खर्च दुप्पट होत होता. मला काहीही करून अंटार्क्टिकाला जाण्याची संधी सोडायची नव्हती.

मी मायाचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू केले. ती तयार झाली, पण तिला आमच्यासोबत आमची मुलगी राधाही असावी, असे वाटत होते. इतकी दीर्घकालीन रजा मिळवणे राधासाठी अशक्यच होते. अशी संधी आयुष्यात एकदाच मिळते ती घालवू नये, असे आम्हाला वाटत होते. सुदैवाने राधाने टाकलेला रजेचा अर्ज मंजूर झाला. मग, जो उत्साह संचारला त्यात पुढील कामे वेगाने होऊ लागली.

प्रवासाची आखणी, कॅबिन बुक करणे आणि व्हिजा मिळवणे. कोविडमुळे बहुतेक देशांतील ही यंत्रणा मंदावली होती. आधी व्हिजा की, आधी बुकिंग, असा प्रश्‍नही उभा राहिला. येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक विमानाच्या तिकिटाचे दर वाढत होते. शेवटी आगाऊ पैसे देऊन कॅबिन बुक करण्याचा निर्णय घेतला.

Antarctica
Accidents in Goa: बस्तोडा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर कार-रिक्षाची जोरदार धडक; एकजण गंभीर जखमी

आता काहीही करून व्हिजा मिळवणे अत्यावश्यक होते. अंटार्क्टिकासाठी व्हिजाची कोणतीही आवश्यकता नाही. आमच्याकडे अर्जेंटिनासाठी व्हिसा असणे आवश्यक होते.

दोन प्रकारचे व्हिजा आहेत, ई-व्हिसा ज्यासाठी ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो आणि प्रत्यक्ष कागदपत्रांची मोठी यादी असलेला फिजिकल व्हिसा ईमेलद्वारे अर्ज पाठवायचा आणि त्यानंतर वाणिज्य दूतावासात प्रत्यक्ष सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात. आम्हा सर्वांकडे अमेरिकेचा व्हिसा होता.

आम्ही आमचा प्रवास सुरू होण्याच्या सुमारे 40 दिवस आधी ऑक्टोबरमध्ये अर्ज केला आणि ई-व्हिजा मिळवला. अर्जेंटिनाचा व्हिजा 90 दिवस वैध असतो. कॅबिन बुकिंग, व्हिजा वगैरे प्राथमिक तयारी झाली होती. आम्ही ट्रिपसाठी तयार होतो आणि गोव्यातून निघण्याचा दिवस उजाडला. (क्रमश:)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com