इतिहासाच्या पाऊलखुणा वीरांगना सुधाताई जोशी

ज्या काळी एका हिंदू स्त्रीची कारकीर्द घरातील चार भिंतींच्या चौकटीपुरती मर्यादित होती, त्या काळी सुधाताई जोशी यांनी 6 एप्रिल 1955 रोजी म्हापसा येथे सत्याग्रहाचे नेतृत्व करून अनुकरणीय आणि उल्लेखनीय धैर्य दाखवले.
liberation
liberationDainik gomantak

सुधाताई महादेवशास्त्री जोशी या गोव्याच्या मुक्ती लढ्याच्या इतिहासातील एक शूर महिला स्वातंत्र्यसैनिक होत्या. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1918 रोजी गोव्यातील फोंडा (Ponda) तालुक्यातील प्रियोळ या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार गावात झाला. त्यांची मोठी बहीण आशाताई फडके या गोव्यातील पहिल्या महिला कीर्तनकार असून गोव्याच्या मुक्तिलढ्यात (liberation) त्यांनीही आपली स्वतंत्र भूमिका बजावली होती. आशाताई फडके यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून गोवा मुक्तीचा विचार मांडला. ज्या काळी एका हिंदू स्त्रीची कारकिर्द घरातील चार भिंतींच्या चौकटीपुरती मर्यादित होती, त्या काळी सुधाताई जोशी यांनी 6 एप्रिल 1955 रोजी म्हापसा (Mapusa) येथे सत्याग्रहाचे नेतृत्व करून अनुकरणीय आणि उल्लेखनीय धैर्य दाखवले. त्या काळी एका गृहिणीसाठी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणे हे काही सोपे काम नव्हते. तत्काली स्त्रीला फक्त गृहिणीच मानले जात असे. थोडक्यात घराशी निगडित सर्व कामे फक्त एकट्या स्त्रीने करावी आणि सार्वजनिक जीवनात सहभागी होणे तर स्त्रीसाठी, विशेषतः हिंदू स्त्रीसाठी अगदीच निषिद्ध होते.

liberation
Goa Liberation: षष्ठ्यब्दीपूर्तीचे कार्यक्रम ठरता ठरेनात!

सत्तरीमधील आंबेडे येथे राहणारे प्रसिद्ध विद्वान महादेवशास्त्री जोशी यांच्याशी सुधाताईंचा विवाह झाला होता. पंडित महादेवशास्त्री जोशी हे नॅशनल काँग्रेस गोवा या प्रमुख सत्याग्रही संघटनेचे सदस्य होते. या संघटनेने गोव्यातील अनेक सत्याग्रहांचे नेतृत्व केले. 18 ऑगस्ट 1946 रोजी कर्नाटकातील बेळगावच्या वाटेवर असलेल्या लोंढा शहरात पार पडलेल्या एका अधिवेशनात नॅशनल काँग्रेस गोवा या संघटनेची स्थापना झाली होती. डॉ. राम हेगडे यांनी या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिले. सुधाताई जोशी या संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. 6 एप्रिल 1955 रोजी म्हापसा येथे झालेल्या अधिवेशनात महादेवशास्त्री जोशींना सत्याग्रहाचे नेतृत्व करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.

महादेवशास्त्रीजींना अन्तर्गळ (हर्निया) झाला आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली म्हणून सुधाताईंनी स्वेच्छेने या अधिवेशनाचे नेतृत्व करण्याची इच्छा दर्शविली. त्यामुळे नॅशनल काँग्रेस गोवा या संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करून म्हापसा येथील मारुती मंदिराबाहेरील सत्याग्रहाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. सुधाताईंनी मणेरी शिबिरात हजेरी लावली आणि आपले भाषण वाचून दाखवले. काणकोण तालुक्यातील दोन 19 वर्षांच्या मुली, कुमुदिनी पैंगीणकर आणि शालिनी लोलियेंकर, त्याचप्रमाणे अंबिकाबाई दांडेकर या 70 वर्षांच्या महिला अशा तीन इतर स्त्रिया सुधाताईंसमवेत होत्या. जयवंत बुर्ये, प्रभाकर धोंड, दीनानाथ येंडे, रामा फडते, वासुदेव प्रभुदेसाई, श्रीपाद सप्ते, नरसिंह येंडे, बाजीराव बेलवलकर आदी एकूण 13 सत्याग्रहींचा या सत्याग्रहात समावेश होता.

liberation
Goa 60th Liberation day: निमित्त 'सर्वासाठी दृष्टी' उपक्रम आयोजित

नॅशनल काँग्रेस गोवा या संघटनेमधील त्यांच्या साथीदारांसह सिंधुताई देशपांडे सुधाताईंसमवेत गुप्तपणे दोन दिवस अगोदर म्हापसा येथे पोहोचल्या. दुसऱ्या दिवशी 6 एप्रिल रोजी कुमुदिनी, शालिनी, अंबिकाबाई आदींसह सुधाताई जोशी कार्यक्रमस्थळी आल्या. कार्यक्रमस्थळी पोर्तुगीज पोलीस आधीच तैनात करण्यात आले होते. एका धाडसी महिलेच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या या ऐतिहासिक सत्याग्रहाचे साक्षीदार होण्यासाठी लोक जमले होते. सुधाताई जोशी स्टूलवर उभ्या राहिल्या आणि जमावाला संबोधित करू लागल्या. त्यांनी जय हिंदचा राष्ट्रवादी नारा दिला. कुमुदिनी, शालिनी, प्रभाकर धोंड, दीनानाथ येंडे आदींनीही राष्ट्रवादी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. पोर्तुगीजांनी सुधाताईंना पुढे बोलू दिले नाही. त्यांनी सुधा ताईंचा झेंडा जप्त केला आणि इतर सहकाऱ्यांसमवेत त्यांना अटक करण्यात आली. सुधाताईंना पणजी, मडगाव आणि केपे येथील तुरुंगात डांबण्यात आले होते.

सिंधू देशपांडे, शारदा सावईकर, सूर्यकांत फळदेसाई, शांता हेदे देसाई, लक्ष्मी पैंगीणकर आदी महिलांसोबत सुधाताई जोशी यांनी पणजी तुरुंगातील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाविरोधात आणि तुरुंगातील स्त्री-पुरुष सत्याग्रहींना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीच्या विरोधात अन्न सत्याग्रहाचे नेतृत्व केले. सुधाताईंच्या अटकेची आणि तुरुंगवासाची बातमी भारतभर पसरली आणि लोकसभेतही त्याबद्दल आवाज उठविण्यात आला. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुधाताई जोशी यांच्या प्रयत्नांची आणि शौर्याची प्रशंसा केली होती. घरची जबाबदारी आणि लहान मुले असतानाही सुधाताई जोशी यांनी गोवा मुक्तिलढ्यात सक्रिय सहभाग घेतला. आज या महान स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत, परंतु मुक्तिलढ्यातील त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.

यंदा आपण गोवा (goa) मुक्तीचे साठावे वर्ष साजरे करत आहोत. या प्रसंगी गोवा मुक्तिलढ्यात सहभागी झालेल्या महान महिला स्वातंत्र्य सैनिक सुधाताई जोशी यांना नम्र अभिवादन. जय हिंद. जय गोमंतक. जय सुधाताई.

ज्या काळी एका हिंदू स्त्रीची कारकीर्द घरातील चार भिंतींच्या चौकटीपुरती मर्यादित होती, त्या काळी सुधाताई जोशी यांनी 6 एप्रिल 1955 रोजी म्हापसा येथे सत्याग्रहाचे नेतृत्व करून अनुकरणीय आणि उल्लेखनीय धैर्य दाखवले.

- प्रजल साखरदांडे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com