गावांचे, शहरांचे रुपडे बदलतेय...

village
village

कलानंद मणी

गोवा मुक्तीवेळी १९६१ मध्ये गोव्याची ग्रामीण लोकवस्ती जवळजवळ ८० टक्के होती ती २००१ मध्ये केवळ ५० टक्के शिल्लक राहिली आणि २०२० मध्ये त्याचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत घटले आहे. झपाट्याने गोवा ग्रामीण लोकवस्तीबाबत भारताच्या तुलनेत ३० टक्के पुढे आहे. हे सारे पाहताना आणि पुढील काही कारणे विशद करताना या भाकितात खूपच गोव्याचा गाव पद्धतशीरपणे संपवण्यात येणार का ही चिंता आहे. गोव्यात जवळजवळ ४११ गावे आहेत अशी सरकारी आकडेवारी सांगते. त्यात उत्तर गोव्यात सर्वात जास्त २४८ गावे आहेत.
गावाविषयी बोलायचे झाल्यास १० वैशिष्ट्ये लक्षात ठेवायला हवी. ती अशी, १) सामुदायिक भावना २) शेजारपण, ३) संयुक्त परिवार ४) धार्मिक आस्था, ५) साधी राहणी, ६) लहान आकार, ७) ठरलेली स्थानिकता, ८) परस्पर संबंधांला प्राथमिकता, ९) रुढीवादी आणि १०) स्थानिक साधनांवरील अवलंबन. ही वैशिष्ठ्ये लक्षात घेतल्यास गोवा मुक्तीनंतरच्या काळातील गोव्यातील गावांची समीक्षा होणे गरजेचे आहे.
१९०० ते १९६० या कालावधीत जेव्हा गोवा प्रामुख्याने ग्रामीण गोवा होता, एकंदरीत लोकसंख्या जवळजवळ २१ टक्के वाढत होती. त्यानंतर गोव्याच्या मुक्तीची काळजी करताना गोव्याच्या भविष्याकडे तेवढे गांभीर्याने पाहिले नाही. जी लोकसंख्या ६० वर्षात वाढली नाही ती नंतरच्या १० वर्षात दीडपट झाली. गोवा मुक्तीपूर्वीच्या ६० वर्षाच्या काळात लोकसंख्या २१.४६ टक्के दराने वाढत होती ती पुढील ४० वर्षात म्हणजे २००१ पर्यंत ९२.८४ टक्के दराने कशी वाढली.
आज गोव्यात सर्वत्र गोयकाराच्या मनात गोयकार आणि गोव्याविषयी भीती वाढत आहे. त्यात ५० वर्षांत गोव्याच्या लोकसंख्येत चारपट वाढ झाल्याचे प्रमुख कारण आहे. लोकसंख्येत वास्तविक अफाट व अनियंत्रित वाढीमुळे लिंगभेदावरही नकारात्मक परिणाम झाला आहे, त्याकडेही काणाडोळा केला जात आहे. १९६० पर्यंत लिंगभेदात देशात तीन आदर्श राज्यांत गोव्याचा समावेश होता, पण परिस्थिती विपरीत होत चालली आहे. एकंदरीत १४ प्रमुख समस्या गोव्याची ग्रामसंस्कृती व ग्रामव्यवस्थेसमोर उभ्या ठाकल्या आहेत.
१) गावांचे शहरीकरण - या राक्षसी विकासामुळे जरी पुष्कळसे गाव हे ग्रामपंचायत व्यवस्थेच्या अधीन असले तरी त्यांनी शहरी तोंडवळा धारण केला आहे. ज्यांच्यामुळे ग्रामीण गोवा फार गतीने अदृश्य होत चालला आहे. ज्यामुळे गावात उपलब्ध भूमी, संसाधने यावरील ताण प्रचंड वाढला आहे.
२) लोकवस्तीतील संरचनात्मक बदल - नावाने जरी ग्रामीण भाग म्हणून आपण संबोधित असलो तरी प्रचंड मोठ्या आकाराच्या इमारती गावात उभ्या राहत आहेत. ज्यात एका वाड्यासारखी नवीन लोकवस्ती उदयाला येत आहे. गावात एक नवी, पण अपरिचित लोकवस्ती तयार होत आहे, ज्यामुळे शेकडो वर्षात सामुदायिक भावनेने राहिलेले ग्रामीण लोकांतील परस्परांतील विश्वासपूर्ण संबंध, एकाचार आज धोक्यात आला आहे.
३) सांस्कृतिक ओळख आणि पारंपरिक उत्सव लोप पावणे- ग्रामीण समाज एकमेकांना जोडलेला समाज असतो. परस्परालंबित्व हे वैशिष्ट्य असते. शहरी भागाप्रमाणे इतर संस्कृतीचा प्रभाव नसल्यातच जमा असतो, पण ज्या गतीने गोव्याच्या ग्रामीण भागात नवी लोकवस्ती निर्माण होत आहे, त्यामुळे हे अद्वितीय ग्रामीण संस्कृती, उत्सव व एकजीनसीपणासमोर संकट उभे ठाकले आहे. गोव्याच्या ओळखीलाच हा धोका निर्माण झाला आहे.
४) स्थलांतरित लोकसंख्या- गोव्यात अवाढव्यपणे लोकसंख्या वाढ होण्याचे एक कारण म्हणजे परप्रांताहून येणारे लोक आहेत. ज्यांची संख्या मूळ गोवावासीयांच्या लोकसंख्येला ओलांडण्याच्या आसपास पोचली आहे. या स्थलांतरित लोकसंख्येचा प्रभाव ग्रामीण भागावर पडत आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जीवनमान तुलनेने स्वस्त असल्याने स्थलांतरित प्रथम ग्रामीण भागात राहणे पसंत करतात.
५) उपजिविकेच्या साधनातील बदल - ग्रामीणातील समाज प्रामुख्याने शेती व त्यावरील जोडधंद्यावर अवलंबून असतो. गोव्याचा समाज त्याला अपवाद नव्हता. शेती व जोडधंदे त्यांच्या उपजिविकेचे प्रमुख साधन होते. कालांतराने सरकारी नोकरी, शिक्षकी पेशा आणि मुंबई शहरातील त्यांचे उत्पन्न गोव्याच्या ग्रामीण समाजाच्या वैभवात भर घालत गेले. हे सर्व घडत असताना गोव्याचा मूळ ग्रामीण समाज तसाच होता पण खाणकाम, औद्योगिक वसाहत, शहरांच्या अवाढव्य व अनियंत्रित विस्तारामुळे गोव्याच्या पारंपरिक उपजिविकेच्या स्त्रोतांना मोठा तडाखा बसला. त्यामुळे सामाजिक संरचना व सांस्कृतिक ओळखीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
६) नैसर्गिक साधनांत घट आणि पाणी टंचाई - गोव्याबद्दल सर्वमान्य समज आहे की हा निसर्गाने नटलेला एक मनमोहक भूभाग आहे. आहे म्हणायचा की होता. चार पटीने वाढलेली लोकसंख्या, जवळ सर्व गावांत होत चाललेले शहरी अतिक्रमण आणि स्थापित झालेले आणि होत असलेले औद्योगिक वसाहतींमुळे वन क्षेत्र, शेती क्षेत्र व जल क्षेत्र यावर प्रचंड आघात झालेला आहे. त्यामुळे गोवा एक आत्मघाताच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. ७) व्यसन - देशभरात गोव्याची ओळख मुबलक दारू व नशा करणारा प्रांत अशी आहे. कालपर्यंत गोव्याच्या ग्रामीण समाजाला अमली पदार्थांचा संसर्ग नव्हता. दारूचे व्यसनसुद्धा मर्यादित होते. आज ग्रामीण समाजात दारूच्या वापराला धार्मिक, सांस्कृतिक व आधुनिकतेचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे आणि त्यात अमली पदार्थांची भर पडली आहे. तरुणांना व्यसनाधीन करण्यामागे मतांचे राजकारण व संस्कृतीचा ऱ्हास यांचे मोठे योगदान आहे. गोव्याला ठरवायचे आहे की व्यसनमुक्त समाज हवा की व्यसनत्रस्त समाज हवा. समाज दोन्ही होड्यांवर पाय ठेवू शकत नाही. सुसंस्कृत गोवा हवा म्हणताना व्यसनाधीन गोवा विकसित होत आहे.
८) वाढता परावलंबन- ग्रामीण समाज प्रामुख्याने कमीत कमी शिक्षित टक्केवारीत झालेली वाढ स्वागतार्ह आहे, पण ही वाढ होताना ग्रामीण समाजात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. शेताच्या मातीला हात लावणे मागासलेपणाचे समजले जाते तेच जीवनमूल्य झाले आहे. कालपर्यंत नोकरीचे आमिष दाखवणारे सरकार आज हात वर करत आहे. बेरोजगारांची फौजही सामाजिक शांततेला नवे आव्हान बनली आहे. परंपरागत साधनेही नाहीत व आधुनिकतेचे आश्वासनही नाही अशा दुष्टचक्रात ग्रामीण युवक सापडला आहे.
९) औद्योगिकीकरणाला न जुळवून घेणे- गोव्याच्या समाजाला सुशेगाद म्हणून संबोधले जाते. हे सुशेगादपण एक जीवन संस्कृती आहे. जीवन हे केवळ पैसे कमावण्यासाठी नसून सहकार्याने जगण्यासाठी ते आाहे अशी ही संस्कृती सांगते. औद्योगिक संस्कृती त्याहून भिन्न आहे. त्यात गुंतवणूक व दिवस रात्रीची स्पर्धा असते. गोव्यात सर्व प्रमुख गावांत औद्योगिक वसाहती आहेत. त्यात कार्यकुशल असलेले गोमंतकीय मिळत नाहीत म्हणून परप्रांतीयांचे प्राबल्य वाढले आहे. गोवेकरांविषयी एक सर्वमान्य तक्रार आहे की ते कौशल्यात व मेहनतीत मागे पडतात. त्या तुलनेत परप्रांतीय औद्योगिकीकरणासाठी भरवशाचे, उत्तम वाटतात. यामुळे गोव्याच्या औद्योगिकीकरणातून निर्माण झालेल्या संधींचा फायदा गोव्याचा समाज घेऊ शकला नाही. याउलट निसर्गसंपदा मात्र गमावली आहे. सुशेगादपणाचा अभिप्रेत असलेला विकास येथे केला असता तर परप्रांतीयांमुळे निर्माण झालेली समस्या दिसली नसती. आजही घरकामापासून उद्योगात परप्रांतीय असतात तर गोमंतकीयांचा डोळा केवळ सरकारी नोकरीवर असतो.
१०) पर्यावरणाची हानी- गोव्याच्या ग्रामीण समाजाला प्रदूषण कचरा हा शब्द ठाऊक नव्हता. निसर्गयुक्त व कचरामुक्त असे त्याचे जीवन होते. गावागावांच्या औद्योगिकीकरणामुळे हवा पाणी माती व आहाराचे प्रदूषण वाढले आहे. तसेच दिशाहीन शहरीकरणामुळे कचरा व्यवस्थापन हा ग्रामपंचायतींसमोर डोकेदुखीचा विषय बनला आहे.
११) आरोग्य- गोव्यात दरडोई इस्पितळातील खाटांची संख्या जास्त असतानाही ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य चांगले आहे असे म्हणता येणार नाही. क्षयरोग, मधुमेह, हृदयरोग, कुपोषण, मज्जासंस्थेचे आजार आणि संसर्गजन्य रोगांचा प्रभाव जाणवत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या या समाजाचा आरोग्यावरील खर्च वाढला आहे.
१२) अन्न सुरक्षा- १९८० दशकाच्या अंताला व १९९० च्या प्रारंभी ग्रामीण भागात दरदिवशी ३० रुपये मजुरी मिळत होती. तेव्हा एक मजूर पाच रुपयात २० ते २५ बांगडे विकत घेत होता. आज मजुरी ५०० ते ६०० रुपयांवर पोचली तरी ते २०-२५ बांगडे विकत घेणे स्वप्न बनले आहे. तसेच भाजीपाला स्वतःच उगवत होते. आज ती बाजारी वस्तू बनली आहे. पूर्वीच्या आरोग्यवर्धक भातपिकाची शेती सोडून दिली गेली असून भातपिकाच्या नव्या प्रजातींचा अवलंब केला गेला आहे. यामुळे ग्रामीण समाज पारंपरिक आहारापासून वंचित झाला आहे. त्याचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.
१३) गृह - १९८० पूर्वीच्या काळात घरबांधणी ही समस्या नव्हती. भूमीहिनांना घरबांधणीसाठी जमीन देण्याचे काम सामाजिकदृष्ट्या अस्पृश्य झालेले जमीनदार (भाटकार) करत होते. तेव्हा एक गरीबाचेही घर शंभर चौरस मीटरपेक्षा जास्त आकारात आकाराला येत असे. कारण काही असो भाटकार आणि भूमीहिनांच्या बिघडलेल्या संबंधामुळे आज गरीबांना घर बांधायचे आहे, तर न परवडणाऱ्या किमतीत भाटकाराकडून जागा विकत घ्यावी लागते. या बदललेल्या सामाजिक समीकरणात गोव्याच्या ग्रामीण बहुजनांसमोर घर बांधणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
१४) वाढते घाणेरडे व भ्रष्ट राजकारण- ग्रामीण भागात धर्म व जाती पूर्वीही होत्या, पण सलोखा कायम होता. मागील ३० वर्षात राजकारणाच्या बदललेल्या चारित्र्यामुळे जो आज मोठा व्यवसाय म्हणून बघितला जातो, त्यामुळे ग्रामीण भागात अशांततेत व विभाजनात भर पडली आहे. धर्म, जाती व वर्गाचे राजकारणामुळे ग्रामीण समाज शांत आहे असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे.
गोव्याच्या ग्रामीण समाजाचे एकंदरीत दृश्य पाहता, जर या समाजाला पुनर्जीवित करायचे आहे आणि त्यांच्या माध्यमातून गोव्याला संरक्षित करायचे आहे तर काही पावले तातडीने उचलणे अत्यंत गरजेचे आहे १) ग्रामीण क्षेत्रातील जमिनीचा, शहरीकरण वा औद्योगिकीकरणासाठीचा वापर पूर्णपणे बंद करणे. २) जमीनदार व कोमुनिदादकडील काही जमीन मूळ गोमंतकीयांना घरबांधणीसाठी आरक्षित ठेवणे ३) विहीर, तळी व झऱ्याचे सुरक्षितता याकडे लक्ष देणे व त्यांचे संवर्धन करणे, जलस्रोत धोक्यात आणणे ताबडतोब बंद करणे, ४) विहीर, तळी व झऱ्यांवर आधारित क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे पाण्याची व्यवस्था करणे आणि त्याची यंत्रणा ग्रामपंचायतीच्या हातात देणे, ५) ग्रामीण क्षेत्रातील नैसर्गिक संसाधनांना धोका पोचवणारे उद्योग ताबडतोब बंद करणे व स्थानिक कार्यकुशल आधारित, प्रदूषणमुक्त उद्योगांना प्रोत्साहन देणे, ६) शिक्षण व्यवस्थेबरोबर कौशल्य विकासाची सांगड घालणे ज्यामुळे स्वावलंबनाकडे युवापिढी वळेल. ७) ग्रामीण बहुजनांना मासळीसकट अन्य पौष्टीक आहार माफक दरात उपलब्ध करून देणे, ८) ग्रामीण तरुणांमध्ये उद्योगाला पोषक मानसिकता व कार्यक्षमता तयार करणे, ९) ग्रामपंचायतीला स्वावलंबी करणे, आमदार व खासदारांपासून मुक्त ठेवणे. १०) गोव्याचे शिक्षण तीन भाषेत उपलब्ध असावे. प्राथमिकपासून माध्यमिकपर्यंत. ते म्हणजे मराठी, कोकणी व इंग्रजी. ही व्यवस्था समाज व सरकारने मिळून करावी. ज्यांना ज्या भाषेत आस्था व सोयीस्कर आहे त्याच भाषेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे. ११) भ्रष्टाचाराच्या महारोगापासून ग्रामपंचायत आज मुक्त नाही त्यासाठी एका सामाजिक संस्थेने सुचवलेल्या मसुद्यावर विचार करणे व त्याची अंमलबजावणी करणे सर्वात महत्त्वाचे. गोव्याला ‘अच्छे दिन’ यायचे असल्यास याला गावांचा महासंघ तयार केला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com