गोव्यातील उत्तम ललित लेखक विनय बापट

विनय बापट यांचे ‘बागीतलं घर’ या ललित लेखनात स्वतःचे बालपण पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे.
Novel
NovelDainik Gomantak

लितलेख (निबंध) म्हणजे लेखकाच्या अनुभवाच्या गाभ्याचा अविष्कार असतो. हा अनुभव निसर्गाच्या सान्निध्यातला असेल, व्यक्तीच्या किंवा एखाद्या वास्तूच्या सहवासातील असेल.... प्रतिभावान मन या अनुभवातील अर्थपूर्ण भाग नेमका लक्षात घेऊ शकते.’ असे मत ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक मा. ना. आचार्य यांनी ललित लेखनाविषयी व्यक्त केले आहे. त्याचा प्रत्यय प्राध्यापक विनय बापट यांचे ‘बागीतलं घर’ हे ललित लेखांचे पुस्तक वाचताना येतो. स्मरणरंजनात्मक स्वरूपाच्या 25 प्रकरणांचे हे ललित लेखन आहे. एकंदर आठवणीतून लेखकाने स्वतःचे बालपण पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे.

बापट यांचे बालपण गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील ‘धावे’ खेडेगावात गेले आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणीतून पूर्व गोव्यातला परिसर वाचकांना अनुभवता येतो. बालपणीच्या आठवणी कथन करताना लेखक ‘नोस्तालजिक’ झाल्याचे जाणवते पण वर्तमान काळातील सत्य तो विसरलेला नाही. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर, लेखक वर्तमान आणि भविष्याचा वेध घेताना दिसतो. ‘शिक्षण’ ह्या पहिल्याच लेखात लेखक आपल्या कुटुंबाबद्दलच्या, गुरुजींबद्दलच्या, स्नेही-शेजाऱ्याविषयीच्या आठवणी सांगतो. आपल्या आई-वडिलाबद्दलच्या आठवणी तटस्थपणे रेखाटतो.

Novel
नोकरीला रामराम ठोकुन महिलांनी उभारला व्यवसाय

आपल्या वडिलांनी आपण एक सुसंस्कृत आणि चांगला माणूस व्हावं म्हणून केलेल्या कष्टांची त्याला जाणीव आहे. वडिलांच्या मृत्युनंतर आपलं कुटुंब आणि कुळागर सावरण्यासाठी आपली आई पुन्हा कशी खंबीरपणे उभी राहिली हे सांगताना, लेखक, ‘ते दिवस’ या लेखातून आईचे वास्तववादी चित्र रेखाटतो. ‘मामाचा गाव’ या लेखात आजोळच्या नातेवाईकांच्या आठवणी सांगतो. बालपणी खेळलेल्या वेगवेगळ्या गावगिर्या खेळाबद्दलही बारीक-सारीक तपशिलासह लिहितो. ‘बागीतलं घर’ मधील अनेक आठवणी गणेश चतुर्थी, दिवाळी, शिमगा, अनंतचतुर्दशी इत्यादी सण-उत्सव, स्त्रियांचे हळदीकुंकू, लग्न, समाराधना अशा अनेक सणा-समारंभाशी निगडित आहेत. शिमग्यातल्या रोंबटात भटाच्या मुलांनी नाचायचं नाही हा त्यांच्यावर झालेला संस्कार आहे. पण शिमगा आला कि आजही ते रोंबट आणि घुमचे कटर्र.... घुम... हा आवाज लेखकाच्या कानात घुमू लागतो.

यातील प्रत्येक लेखातून लेखक सकारात्मक स्व-विचार मांडताना दिसतो. आपल्या बालपणीची एक आठवण सांगताना लेखक म्हणतो, आपण लहानपणी मित्रांच्या संगतीने चोरून सिगरेट ओढायचो. शिव्या पण द्यायचो. आपल्या या व्यसनामुळे बाबांनी मात्र स्वतःला मानसिक त्रास करून घेतले. आपल्याला मारहाण केली नाही. याबद्दल त्यांनी आपल्यालाच ‘चूक की बरोबर’ हा निर्णय घ्यायला लावला. बाबांनी रागाच्या भरात आपल्याला ‘थापट’ मारलं असतं तर आपण कुटुंबापासून बाबांपासून दुरावलो गेलो असतो आणि व्यसनाच्या अधिकच आहारी गेलो असतो. आपण आज जे कोणी आहोत ते बाबांमुळे ही जाणीव लेखक प्रांजळपणे व्यक्त करतो.

‘श्रावण पाळणं म्हणजे निसर्गाशी नातं जोडणं’ असाही एक विचार लेखक, ‘आला श्रावण आला’ या लेखात मांडतो. ‘कोयंडे-बाल (विटी दांडू), लगोरी, पाच गुण्यांचा- मुलींचा खेळ, डोंगर का पानी, पकडापकडी, लपालपी, फटाशांचा खेळ असे बालपणी मित्रांबरोबर खेळलेले खेळ त्याच्या आयुष्यातील एक वेगळा ठेवा बनून राहिले आहेत. पण काळाबरोबर ‘ते पाकलेय गेले आणि उंडेय गेले’ अशी या खेळांची गत झाली आहे. ‘खेळ’ या ललित लेखाच्या शेवटी लेखक स्वतःचा विचार मांडताना विचारांची नवी दिशा स्पष्ट करतो. कदाचित मुलांना एक दिवस व्हिडीयो गेमचा आणि कार्टूनचाही कंटाळा येईल. पुन्हा एकदा ती खेळाकडे वळतील. हातात कोयंडे-बाल असेल, डोळ्यांना स्पेशल चष्मा आणि डोक्याला प्रोटेक्टिव कॅप असेल, आणि कुणी सांगावं- गणूचा पणतू किंवा खापरपणतू ‘इंडियन कोयंडे-बाल लीग’मध्ये खेळणारा पहिला गोमंतकीय असेल..!

लेखकाने आपल्या वांग्मयीन आविष्कारासाठी मूलतः लवचिक असलेला ललित लेखनाचा आकृतिबंध स्वीकारला आहे. गतकाळाच्या ओढीतून लेखकाने अगदी भरभरून आणि मन मोकळेपणाने लिहिले आहे. व्यक्ती, स्थळे, घटना आणि प्रसंग यांच्याशी निगडित आठवणींना आपसूकच लालित्यपूर्ण रंगरूप लाभले आहे. त्यात त्याच्या संवेदनशील परिपक्व मनाचं आणि व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब उमटले आहे.

गोव्यातील (Goa) पूर्वसुरींनी कथा, काव्य, लेखन, विपुल प्रमाणात केल्याचे दिसून येते. त्या मानानं ललितलेखन केलेले नाही. मीना समुद्र, गिरीजा मुरगोडी, अंजली आमोणकर, बाळ सप्रे आजच्या घडीला गोव्यातील दैनिकामधून सातत्याने ललित लेखन करताना दिसत आहेत. ‘बागीतलं घर’ पुस्तकाच्या माध्यमातून लेखन क्षेत्रात लेखकाने टाकलेले पाऊल स्वागतार्ह आहे. त्याची लेखनशैली चित्रमय आणि वास्तववादी आहे. या आठवणींचे निवेदन प्रमाणभाषेत आहे. संवाद मात्र कोकणी चित्पावनी भाषेत लिहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनाला वांग्मयीन गुणवत्ता प्राप्त झाली आहे.

‘बागीतलं घर’ वाचताना आनंद यादवांच्या ‘झोंबी’ आणि ‘घरभिंती’ या आत्मकथनात्मक कादंबऱ्यांची आठवण होत होती. यातील प्रकरणांना लेखकाने वेगवेगळी शीर्षके दिली नसती तर एक आत्मकथनात्मक कादंबरी निर्माण झाली असती. असो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली हे नमूद करायलाच हवं. बापटांच्या पुढील वांग्मय वाटचालीस शुभेच्छा!

- नारायण महाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com