विनायक नाईक : एक कट्टर, मराठीप्रेमी, कार्यकर्ता हरपला !

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्‍या अध्यक्षपदाची धुरा त्‍यांनी कितीतरी वर्षै जबाबदारीने सांभाळली. गोमंतक साहित्य सेवक मंडळ, गोमंतक मराठी अकादमीच्‍या वाङ्‍मयीन कार्यक्रमांच्‍या निमित्ताने आमच्‍या गाठीभेटी व्हायच्या. 

विनायक नाईक आपल्यातून निघून गेल्‍याचे वृत्त ऐकून मन आतून गलबलून आले. आमच्या बरोबरीने मित्रत्वाच्या नात्याने वावरणारे विनायक नाईकसर आता आमच्या बरोबर नाहीत याची खंत पण मनात आहे. मी नाईकसारांना अगदी जवळून पाहिले आहे. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्‍या अध्यक्षपदाची धुरा त्‍यांनी कितीतरी वर्षै जबाबदारीने सांभाळली. गोमंतक साहित्य सेवक मंडळ, गोमंतक मराठी अकादमीच्‍या वाङ्‍मयीन कार्यक्रमांच्‍या निमित्ताने आमच्‍या गाठीभेटी व्हायच्या. साहित्य सेवक मंडळाचे वाङ्‍मयीन कार्य पणजी शहरापुरतेच मर्यादित न राहता गोव्यातल्या इतरही महत्त्वाच्या तालुक्यांत व्हावे यासाठी तालुका पातळीवर उपकेंद्रे सुरू करावीत अशी त्‍यांची आंतरिक इच्छा होती. त्‍यासाठी त्‍यांनी खूप प्रयत्न केल्याचे मला आठवते. तसेच, पेडणे येथे मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज असे ग्रंथालय व्हावे, असा स्वत:चा मनोदय त्यांनी कैक वेळा आमच्याकडे बोलून दाखवला होता. (Vinayak Naik had been the Chairman of Gomantak Sahitya Sevak Mandal for many years)

त्यांचा स्वत:चा पुस्तकविक्रीचा व्यवसाय होता. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात तसेच वास्को येथील जनता वाचनालयामध्ये ते पुस्तक प्रदर्शन भरवत. एखाद्या प्रकाशकांची नवीन पुस्तके आली की ते मला प्रदर्शनात आवर्जून बोलावून घेत असत.
मराठी ही गोव्याची राजभाषा व्हावी, अशी त्‍यांची आंतरिक इच्छा होती. मराठी राजभाषेच्‍या चळवळीत त्‍यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शशिकांत नार्वेकर, नारायण आठवले, जयसिंगराव राणे, गोपाळराव मयेकर यांच्‍या बरोबरीने ते मराठीसाठी वावरले.

डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड डॉक्टरांच्या हाताखाली स्वयंसेवक म्हणून काम करावे

गोमंतक मराठी अकादमीच्या उभारणीत त्‍यांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान होते. ते धडपड्या व जिद्दी स्वभावाचे होते. गोमंतक मराठी अकादमीच्या मराठी भवनाच्या निर्मितीसाठी ते झटले होते. मराठी राजभाषा प्रस्थापन समितीचे ते क्रियाशील पदाधिकारी तसेच कार्यकर्ताही होते. एखादे विधायक कार्य हाती घेतले की ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी ते सतत झटत असत.

गोव्‍यातील लेखकांना महाराष्ट्रातही नावलौकिक मिळावा, गोव्‍यातील साहित्यिक गोव्यापुरते मर्यादित न राहता त्यांना महाराष्ट्रातही नावलौकिक मिळावा यासाठी ते कार्यरत होते. त्‍यांनी ‘पुस्तक देवघेव योजना’ सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. गोव्‍यातील अनेक साहित्यिकांना, कवी-कवयित्रींना, वक्त्यांना त्‍यांनी अखित भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यासपीठ उपलब्ध करू्न दिले. नाईकसरांच्‍या अंगी संघटनकौशल्य होते. ते गो.सा.से. मंडळाच्या अध्यक्षपदी असताना पणजी येथे राम शेवाळकर यांच्‍या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्‍यात आले होते. तसेच, साहित्य सेवक मंडळाच्‍या गोमंतक साहित्य समेलनांच्या आयोजनात त्‍यांचे फार मोठे योगदान होते.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

गो.सा.से. मंडळाच्‍या वनीने त्‍यांनी महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांची तसेच वक्त्यांची मागदर्शनपर व्याख्याने आयोजित केली होती. पेडणे येथे आयोजित करण्यात आलेल्‍या अगामी २८व्या साहित्‍य संमेलनाच्‍या आयोजनात त्यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. साहित्य संमेलन पेडण्यातच व्हावे, अशी त्यांची आंतरिक इच्छा होती. २८व्या साहित्‍य संमेलनात त्‍यांची अनुपस्थिती सर्वांनाच ठळकपणे जाणवेल.

गो.सा.से. मंडळाच्‍या बैठकांत स्वत:ची मते ते परखडपणे व्यक्त करायचे. ते नेहमी खादीच्‍या पेहरावात वावरत असत. त्‍यांना कोणत्याही गोष्टीचा बेडेजाव नव्हता. वागणे-बोलणे अत्यंत साधे आणि नम्र. आमच्या सर्वांचा ज्येष्ठ मित्र हरवल्याचे दु:ख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

- प्रा. नारायण महाले

संबंधित बातम्या