आम्हाला वार्धक्य आले

Hema Naik
बुधवार, 22 जुलै 2020

मन निर्मळ आणि शरीर निरोगी असल्यास कोरोनाची कसली भिती, पहाटे सूर्याच्या किरणांतून उगवणारा नवा दिवस आणि आल्हाददायी प्रेरणा देणाऱ्या झाडातून वाहणारा वारा चैतन्याचे बळ घेऊन येत असतो. नवी स्फूर्ती आणि नवा विचार यातून वाढत जातो आत्मविश्वास. या विश्वासाला फुंकर मारण्याची फक्त गरज असते. निराशा नको. वार्धक्य म्हणजे काय तो थकवा आहे का? अजिबात नाही.

हेमा नायक

आषाढ संपला आणि श्रावण आला. एरव्ही आम्हाला श्रावणाची नवलाई मोठी असायची. आषाढ पावळेचें कौतुक होईतो संपत चाललेल्या आषाढांत विश्रांती न घेता घसघशानी पाऊस उतू लागलाय. श्रावणातील पावसाच्या धारा वेगळ्याच असतात. बदलती नक्षत्रे, ऋतू बदल आणि त्याप्रमाणे बदलणारे हवामान. त्या अनुसार निसर्गात देखील बदल जाणवून येतो. देवकार्यासाठी आणि जास्त करून श्रावणी रविवार पुजण्यासाठी लागणारी झाडांची पत्री सध्या जागोजागी नजरेस पडते. शेरवडाची पिवळी पाने. छान दिसतात पाहायला. चतुर्थीला माटोळीसाठी लागणारा रानमेवा दिसू लागणार आता. एकूण हे मंगलमय वातावरण भूलविणारेच असते. मागच्या दोन महिन्यात कोसळलेला पाऊस जमेस धरल्यास त्याने शंभर इंचाकडे धाव मारली आहे. अजून जुलै संपायचा बाकी आहे, पण पावसाने ८५ इंच गाठली. म्हणजे वार्षिक सरासरी झाली. तसा आज पर्यंतचा पाऊस मागच्या वर्षापेक्षा ३४ टक्के जास्त झाला असे तज्ञांचे म्हणणे. तरीही जमिनीने आक्रोश करीत न बसता पावसाचे पाणी शोषून घेतले. कोठेतरी एक दोन वृक्ष कोसळले. जुन्या मोडकळीस आलेल्या एक दोन इमारती कोसळल्या. पावसाची किमया बघत सध्या खिडकी जवळ बसून दिवस काढायचे. बाहेर जाता येत नाही. साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी घरा बाहेर जायचे नाही, हा नियम मागचे साडेचार महिने कटाक्षाने पाळीत आलो. खिडकीतून दिसतात वाढलेल्या वृक्षवेली. वाऱ्या बरोबर येऊ लागतात वेगवेगळ्या फुलांचे आणि पिकून खाली पडलेल्या फणसा सारख्या फळांचे वास. कुळागरी वातावरण. निसर्गातील प्रत्येक झाड आणि वृक्ष, तसेच प्रत्येक वाल आपल्याला आव्हानांना सामोरे जात जगण्याची स्फूर्ती देत असतात आणि झाडाच्या पानापानांतून दर दिवशी नवा सकारात्मक विचार घेऊन सकाळची सुरुवात होते. पण हल्लीच्या दिवसात जगण्यात एक निराशा जाणवत गेली. आपण वृद्ध झालो, ही भावना गेल्या मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून नव्हती. आपण बसने फिरायचो, कधी स्कूटरवर नाही तर चालत. पण कोरोनाची लागण सुरू झाल्याच्या घटनांबरोबरच एक फतवा निघाला, तो म्हणजे साठ वर्षावरील वृद्धांनी घरा बाहेर जाऊ नये, कारणे अनेक. एकतर त्यांच्या आरोग्याच्या विविध तक्रारी असतात आणि ही लागण त्यांना झाली तर त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यात नसते आणि हा आजार त्यांना सोसवणार नाही. मग झाले, प्रत्येकाने आपल्या वयाचा हिशोब केला, ‘अरे, काल परवाच तर आपल्याला निवृत्ती मिळाली. इतकी वर्षे नोकरी करून कमावले, घर बांधले, गाडी घेतली आणि आता हे काय? अचानक सुखा समाधानाने फिरण्याची इच्छा मनात येतानाच हा धक्का निवृत्त झालेल्यांना आणि साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणात उत्साहाने वावरणाऱ्या आमच्या सारख्यांना न पेलण्या इतका जबरदस्त होता. शारीरिक व्याधी सोडल्या तर एखादी व्यक्ती विचारांनी कधीच वृद्ध होत नसते. हेच विचार अंगातील सकारात्मक वृत्तीचे पोषण करते. नवनव्या विचारांत मन गुंतून राहिले, की त्याचा परिणाम शारीरिक प्रकृतीवर होत असतो आणि व्यक्ती सदा प्रसन्न उरते. मन निर्मळ आणि शरीर निरोगी असल्यास कोरोनाची कसली भिती, पहाटे सूर्याच्या किरणांतून उगवणारा नवा दिवस आणि आल्हाददायी प्रेरणा देणाऱ्या झाडातून वाहणारा वारा चैतन्याचे बळ घेऊन येत असतो. नवी स्फूर्ती आणि नवा विचार यातून वाढत जातो आत्मविश्वास. या विश्वासाला फुंकर मारण्याची फक्त गरज असते. निराशा नको. वार्धक्य म्हणजे काय तो थकवा आहे का? अजिबात नाही. आपले निर्मळ मन समविचारी लोकांमध्ये मिसळून मोकळे करायची इच्छा याच वयात होत असते. नेमक्या याच वेळी वार्धक्याची जाणीव करून देऊन कोरोना रोगाने निराशा आणून सोडली. एखाद्याचा आत्मविश्वास हरवतो तेव्हा त्याच्यातील विश्वास जागवून देण्याचे काम म्हणजे माणुसकी असते आणि याचीच या काळी नितांत गरज होती. ही गरज भागवली गेली आहे का? याचे प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करून बघावे. एखादी वृध्द व्यक्ती रागावली, तर तिच्यापेक्षा जास्त मोठ्याने आवाज चढविणारेच जास्त बघितले. वयाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती वृध्द होतेच, तिला वार्धक्य येतेच, पण त्या वयाचा देखील आदर राखलाच पाहिजे. मी दोन वाक्ये वाचलीत एकीकडे, पण मनाला स्पर्शून गेली…लाख समंदर पार किया मैंने / लेकीन मैं कागज की नाव बनाना भूल गया. फार सुंदर. अंतर्मुख होवून मी विचार करीत बसली. वाटले एखादा मुलगा म्हणत असेल आपण मोठा होईन लाखो रूपये कमावलेत, पण लहानपणी कागदाच्या होडी करून देणाऱ्या आईचे हात आता नाहीत, कारण मी त्या बनवायला विसरलो आहे. कोरोनाच्या भीतीने वृद्धाश्रमात असलेल्यांना भेटायला सध्या कोणी जाऊ नये, अशी बातमी वाचली आणि मनात आले, खरेच का कोणी उत्सुक असेल तिकडे जायला आणि असल्यास त्या वृद्धांना तिकडे ठेवण्याची गरज का होती? एक फोटो बघितला हल्लीच एक माणूस आपल्या पाळलेल्या कुत्र्याला घेऊन वृद्धाश्रमात ठेवलेल्या आपल्या आईची खबर घेण्यास मजेत जातो. बाहेर धो धो पडणारा पाऊस थांबलेला आहे. श्रावणमासी हर्ष मानसे.. आपणही उत्साहित होवूया. सगळे राग शीण विसरून. संपादन हेमा फडते

संबंधित बातम्या