स्त्रीशक्तीने गरुडझेप घेतली ज्योतिबा-सावित्रीची कामगिरी मोठी

दैनिक गोमन्तक
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

 दलित शोषित, बहुजनसमाजाला जे ‘धर्मा’ चे चटके बसत होते. त्यातून या समाजाची सुटका करायची असेल, तर सर्व धर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या समाजात समानता निर्माण करणाऱ्या धर्माची आपण स्थापना केली पाहिजे, असा विचार महात्‍मा फुलेंच्या मनात पूर्वीपासून चालत होता.

महात्मा ज्योतिबा गोविंद फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. पेशवाईच्या अस्तकाळी महाराष्‍ट्रावर ब्राह्मणांच्या अतिरेकाने जे भकास व उदास वातावरण निर्माण झाले होते, त्याच्या गडद सावल्यांना ज्योतिबांना त्यांच्या बालपणी व तारुण्यकाळातही सामोरे जावे लागले होते. फुलेंचे बालपण व कर्तेपणाचे आयुष्यही पुण्यातच गेल्यामुळे तेथे जातियता होती तीच सर्वत्र होती. कारण, पुणे हे शहर पेशव्यांची राजधानी होती. त्यामुळे तेथे जे घडत होते ते त्या काळच्या समाजव्यवस्थेचे जणू प्रातिनिधीक असे स्वरूप होते. त्यामुळे दलित शोषित, बहुजनसमाजाला जे ‘धर्मा’ चे चटके बसत होते. त्यातून या समाजाची सुटका करायची असेल, तर सर्व धर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या समाजात समानता निर्माण करणाऱ्या धर्माची आपण स्थापना केली पाहिजे, असा विचार महात्‍मा फुलेंच्या मनात पूर्वीपासून चालत होता. मग त्यांनी आपल्या मित्रमंडळींशी चर्चा करून पूर्ण विचारांती ‘सार्वजनिक सत्यधर्मी’ची स्थापना केली.

या नवीन धर्माची स्थापना करताना महात्‍मा फुलेंनी महर्षी व्यासांच्या धर्माच्या व्याख्येचा अर्थ लक्षात घेतला होता. प्राचीन काळात व्यासांनी ‘समाजाची धारणा करणारा तो धर्म’ अशी व्याख्या केली होती. याच व्याख्येचा आधार घेत महात्मा फुले यांनी सांगितले, आपणा सर्वांचा निर्माणकर्ता व त्याने निर्माण केलेले मानवप्राणी यामधील संबंध स्पष्ट करणारा जो शब्द तो धर्म होय.’ त्यामुळे ‘समाजाची धारणा करणारा तो धर्म’ या व्याख्येच्या निकषावर सत्यधर्माची परीक्षा केल्यास या परीक्षेमध्ये हा धर्म सर्वार्थाने उत्तीर्ण होतो, असे दिसून येते व त्यामुळे महात्‍मा फुलेंच्या सार्वजनिक व सामाजिक कार्यावर विश्वास असणारे निष्ठा असणारे महात्मा फुलेंचे अनुयायी बनले. खरं तर त्यावेळी आपला देश धर्मभेद जातीभेद, स्त्री-पुरुषभेद, उच्च-नीचता, स्पृश्य अस्पृश्यता या साऱ्यांना व्यापून गेला होता. त्याला उतारा म्हणून किंवा त्यावर उपाय म्हणून ज्या धर्माची गरज भासली त्या गरजेतूनच हा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ जन्माला आला. पेशवाईच्या काळात काय किंवा इंग्रजांच्या आमदानीत काय शिकला सवरला होता, तो उच्चवर्णीय. त्यामुळे शुभकार्य काय, जन्म काय किंवा मृत्यू काय, यावर प्राबल्य भटा-ब्राह्मणांचे. त्यामुळे यापासून मिळणारी बिदागी ही त्यांचीच तर सरकारदरबारी कारकुनापासून जो पुढच्या सर्व हुद्यांवर या जातीचेच वर्चस्व. या सर्वांचा परिणाम म्हणून ‘सार्वजनिक सत्यधर्म’ स्थापन करून समानता आणावी, विषमता नष्ट करावी, हा मुख्य उद्देश यामागे होता.

महात्मा फुले यांनी केलेले फार महत्त्‍वाचे काम म्हणजे त्यांनी अप्रस्थापित समाजाच्या सर्वांगीण क्रांतीची मुहुर्तमेढ रोवली. दीन-दलित, शोषित, पिढीत अशा बहुजनसमाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी बंडाचा झेंडा उभारणारे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून केवळ महाराष्‍ट्र राज्यानेच नव्हे, तर संपूर्ण देशाने त्यांना वंदन केले. 
१८२७ ते १८९० हा ज्योतिरावांचा काळ. या काळात त्यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नवी मूल्ये, नवे विचार आणि नव्या जाणिवा रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. याकामी त्यांना जसे त्यांच्या उच्चवर्णीय मित्रमंडळीचे सहकार्य लाभले, तसे ‘सार्वजनिक सत्यधर्मा’ च्या अनुयायांचेही लाभले. त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती वंदनीय सावित्रीबाई फुले यांचे तर त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य सदोदित मिळत गेले. सावित्रीबाई फुलेंच्या योगदानामुळेच स्त्री शिक्षणाचा पाया तर घातला गेलाच, पण स्त्री ही अबला जरुर आहे, पण तिला सबला करणे हे प्रत्येकाचे काम आहे. तिला फक्त चूल आणि मूल यांच्यातच गुंतवून न ठेवता तिला तिच्या पायावर उभे राहण्याचे सामर्थ्य दिले तर स्त्री -पुरुषभेद तर नाहीसे होतीलच. पण, ती काय चमत्कार करू शकते, याचा अनुभव आपण घेऊ शकू, असा विश्वास त्यांच्यात निर्माण केला.

आज स्त्रीशक्तीने गरुडझेप घेतली आहे. त्यामागे ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले या दांपत्यांची कामगिरी फार मोठी आहे. हे विसरुन चालणार नाही. कारण यासाठी या दांपत्याला अनेक प्रकारच्या हालआपेष्टा व अवहेलना, अपमान यांचा सामना करावा लागला. तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी त्यांनी अतिशय खंबीरपणे शांतचित्ताने आणि विवेकाने दोन हात केले आणि आपले सत्याचे, वास्तवतेचे प्रबोधनात्मक विचार ठामपणे मांडले. यासाठी दोघांनी दीर्घकाळ प्रत्यक्ष जनसामान्यांमध्ये फिरुन त्यांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडली. आपण गरीब असलो, अस्पृश्य असलो, अशिक्षित असलो, तरी आपणही माणूसच आहोत. प्रत्येक माणसाला माणसासारखे जगण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. याबाबत अखेरपर्यंत जसे त्यांनी आपल्या वाणीने काम केले, तसे लेखणीनेही केले. महात्‍मा फुलेंनी अनेक प्रकारची साहित्यनिर्मिती करून जनकल्याणाचे कार्य सर्वदूर पोचविण्याचे काम केले. याबाबतची त्यांची ग्रंथसंपदाही मोठी आहे. हे खरे असले तरी वानगीदाखल फक्त चार-पाच अत्यंत महत्त्‍वाच्या पुस्तकांची येथे नोंद घेणे उचित ठरेल. पैकी पहिले पुस्तक म्हणजे ‘तृतीयरत्न’ हे नाटक महात्‍मा फुलेंनी साहित्यक्षेत्रात पदार्पण केले, ते ‘तृतीयरत्न’ हे नाटक लिहूनच. १८५५ मध्ये त्यांनी ते लिहिले. त्या नाटकातील गर्भिणी कुणबी स्त्री, जोगाई व तिचा नवरा ही देववादी धार्मिक भोंदूगिरिची बळी आहेत, तर ख्रिस्ती धर्मोपदेशक या भोळ्या जीवांना धार्मिक भंपकगिरीच्या तावडीतून बाहेर काढणारा व विधायक वाटेवरून जाण्यासाठी विद्येच्या विश्वास विश्वात नेऊन सोडणारा देवदूत आहे.

१८६९ मध्ये त्यांनी ‘ब्राह्मणांचे कसब’ हे पुस्तक लिहिले. हा पद्यग्रंथ नऊ खंडात आहे. ‘पुरोहितशाहीच्या कचाट्यातून कुणबी, माळी, मांग, महार यासारख्या अतिउपयोगी वर्गास सोडवावे व त्यांना विद्या शिकवून सुजाण करावे या दुहेरी हेतूने त्यांनी या ग्रंथाची निर्मिती केली होती. ‘गुलामगिरी’ हा त्यांचा आणखी एक गाजलेला ग्रंथ ‘गुलामगिरी’ मग ती कुणाचीही व कुठल्याही स्वरुपाची असो, तिचे टाके ढिले करणे आणि अंतिमतः तिचे समूळ उच्चाटन करणे हे फुलेंनी आपले कार्य व कर्तव्य मानले. त्यासाठी या ग्रंथातून त्यांनी जनजागृती केली. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा १८८३ साली लिहिलेला त्याचा वस्तुस्थिती दर्शक ग्रंथ आहे. यात देशातल्या मध्यम, कनिष्ठ शेतकऱ्यांच्या पशूपलीकडच्या निकृष्ट अवस्थेची जाणीव करून सर्वांना तशी जाणीव आणि इशारा करून देण्याचे काम केले गेले आहे. 

- शंभू भाऊ बांदेकर

संबंधित बातम्या