‘कोविड’बाबत गाफिल नकोच!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

दिल्लीत ‘कोविड १९’च्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. दिल्लीत या महामारीची  तिसरी लाट आल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. यामुळे देशाच्या अनेक भागात कोविड महामारीची दुसरी, तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोवाही याला अपवाद कसा असू शकेल.

दिल्लीत ‘कोविड १९’च्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. दिल्लीत या महामारीची  तिसरी लाट आल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. यामुळे देशाच्या अनेक भागात कोविड महामारीची दुसरी, तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोवाही याला अपवाद कसा असू शकेल.

सध्या रुग्णसंख्या रोडावल्यामुळे सरकार अनेक ठिकाणची कोविड निगा केंद्रे बंद करत आहे. सरकारी व खासगी इस्पितळांतील रिकाम्या खाटांची माहिती प्रसारीत करत आहे. कोविडची भीती आता समाजमनातून हळूहळू कमी होत गेल्याने लोकही निर्धास्त झाले आहेत. नेमके कोविडमुळे किती जणांचे मृत्यू झाले, हे सांगण्यात सरकारी यंत्रणेला अजून यश न आल्याने आता जणू ‘कोविड १९’ विषाणू टाळेबंदीनंतरच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याने झालेल्या गर्दीत चेंगरून मेला असावा, असा समज सर्वांचाच झाला आहे.

मुखावरण वापरणे, वारंवार हात स्वच्छ करणे याची सवय लागून गेली असली तरी शाररीक अंतर पाळण्याविषयी उदासिनता दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हिवाळ्यात ‘कोविड - १९’ महामारीची साथ वाढू शकते, असा इशारा देऊनही आर्थिक चाक फिरवण्याच्या नादात या साऱ्याकडे कमालीचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. सरकारने कसिनो सुरू करून, सनबर्नला परवानगी देण्याचे सुतोवाच करून जगरहाटी सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जनतेलाही आता मोकळेपणाने संचाराची जणू मोकळीकच मिळाली आहे. दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याची तारीख जाहीर करून सरकारने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. दिल्लीत मंगळवारी दिवसभरात तब्बल ६ हजार रुग्ण आढळून आले होते. दिल्लीत प्रथमच इतकी मोठी रुग्णसंख्या नोंदवली गेली. मागील पाच दिवसांपासून दिल्लीत ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांवर उपचारासाठी दिल्लीत पुरेशा खाटा आहेत. काही खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या कमी आहे, ती एकदोन दिवसांत सोडवली जाईल. दिल्लीच्या या घडामोडींकडून काही धडा राज्य सरकार घेणार आहे का? हा खरा प्रश्न 
आहे.

कोणत्याही वैश्विक साथीमध्ये, विशेषतः हवेद्वारे पसरणाऱ्या रोगांच्या साथीमध्ये रुग्णसंख्येची पहिली लाट ओसरल्यानंतर काही काळाने पुन्हा रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊन दुसरी लाट येते. १९१८ साली स्पॅनिश फ्ल्यूची महामारी होती. त्यावेळी आलेली दुसरी लाट पहिल्या लाटेहून बरीच मोठी होती. आत्तादेखील कोविडची साथ युरोपियन देशांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे आणि काही देशांमध्ये दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा बरीच मोठी आहे, असे दिसून येत आहे. 

अशा लाटा का येतात? असा प्रश्न सर्वसाधारणपणे पडणे साहजिक आहे. कोणतीही साथ आली की, ती आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने जनतेसाठी विविध नियम सांगितले जातात. जसजशी रुग्णसंख्या वाढत जाते, तसे नियम पाळणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढू लागते आणि जास्त लोक नियम पाळत असल्यामुळे अर्थातच रुग्णसंख्या व पर्यायाने पहिली लाट ओसरू लागते. यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्नदेखील कारणीभूत असतात. मात्र, मानवी स्वभाव बंधन पाळणारा नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होऊ लागताच जनता नियमांच्या बंधनातून मुक्त होऊ पाहाते आणि दिवसेंदिवस कमी लोक नियम पाळतात. लोकांचे जोखमीचे वर्तन वाढीस लागले की, रुग्णसंख्या पुन्हा जोमाने वाढते आणि मग दुसरी लाट येते. 

अशीच काहीशी परिस्थिती सध्या आपल्या राज्यात आहेत. लोक मासळी घेण्यासाठी, मार्केटमध्ये, बसमध्ये गर्दी करू लागले आहेत. मुखावरण वापरले म्हणजे आपल्याला ‘कोविड १९’ची लागण होणार नाही, अशी मनाची पक्की समजूत त्यांनी करून घेतली आहे. या बिनधास्तपणाचीच किंमत येणाऱ्या काही दिवसात चुकवावी लागू शकते, अशी भीती त्याचमुळे डोकावू लागली आहे.

त्याचप्रमाणे कधीकधी बदलणाऱ्या हवामानामुळे लोकांना बंदिस्त जागेत राहणे आवश्यक असल्याने देखील रुग्णसंख्या वाढते.  काहीवेळा आजारास बळी पडू शकणाऱ्या लोकांचे समाजातील प्रमाण वाढले की लाट येते. कधी या लाटा महिन्यांच्या अंतराने येतात तर कधी वर्षांच्या अंतराने. जोपर्यंत रुग्णसंख्या रुग्णालयांच्या क्षमतेबाहेर जात नाही, तोपर्यंत काही अडचण नसते. मात्र लाट खूप मोठी आली तर दवाखान्यांची क्षमता अपुरी पडू शकते. म्हणून कोणतीही लाट मोठी होणार नाही आणि शक्य झाल्यास लाट येणार नाही, यासाठी जनतेकडून एकजुटीने प्रयत्न केले जायला हवे. ज्या ठिकाणी हिवाळा सुरू झालाय आणि तापमान बरेच कमी असते, अशा ठिकाणी लोकांना आता घरामध्येच थांबावे लागत आहे. थंडीमुळे खिडक्या दारेदेखील उघडता येत नाहीत. अशावेळी हवेद्वारे संसर्गाचा धोका वाढतो. हिवाळ्यात हे चित्र असू शकते. त्यामुळे या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली आहे, त्याला नागरिकांचे पूरक असे वर्तन कसे असावे, याविषयी पुरेशी माहिती सरकारने प्रसारीत केली पाहिजे. सरकार आणि जनता यांच्यातील सुसंवादानेच या लाटेला थोपवता येऊ शकते. मात्र, सरकारी पातळीवर तशी तयारी आहे की नाही हे समजत नाही.

दुसरी लाट पहिल्या लाटेसारखीच असू शकते किंवा पहिल्या लाटेहून बरीच मोठी असू शकते अथवा पुढील लाटा पहिल्या लाटेपेक्षा बऱ्याच लहानदेखील असू शकतात आणि हे सर्वसाधारण २०२२ अखेरपर्यंत सुरू राहू शकते. भविष्यातील नक्की चित्र कसे असणार बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. सर्वांत महत्त्‍वाचे आहे, सामूहिक समन्वयातून केले जाणारे काम. लोक एकत्र येऊन प्रयत्न करतील, तर विषाणूला रोखता येऊ शकते. जास्त लोकांनी नियम पाळले, तर लाट लहान असेल. जास्त लोकांनी जोखीम घेणे टाळले, तर लाट लहान असेल. लोकांनी बंदिस्त खोल्यांमधील हवा सुयोग्य वायुविजन व्यवस्थेने वारंवार बदलली की, लाट वाढणार नाही. लोक गर्दीमध्ये जाणे आणि घरातून बाहेर पडणे कितपत टाळतात? उपयुक्त लस उपलब्ध झालीय का? रामबाण औषध सापडलेय का? अलगीकरण प्रभावीपणे केले जात आहे का? या साऱ्या प्रश्नांच्या उत्तरातच हिवाळ्यात राज्यासमोर काय वाढून ठेवले आहे, याचे उत्तर मिळू शकते. प्रत्येक व्यक्तीचा प्रयत्न कोविडची महामारी थांबवण्यासाठी मोलाचा आहे. आपल्या आजूबाजूला रुग्णसंख्या कमी होत आहेत.  सध्याची वेळ खूप महत्त्‍वाची आहे. लोक नियम पाळत नाहीत, मनाला बंधन घालत नाहीत, अशावेळी आपण स्वतः आपले स्वकीय आणि आपले मित्रमंडळ, अशा सर्वांनी नियम पाळणे थांबवले नाही, तर आपण तर सुरक्षित राहूच पण साथ थांबविण्यासाठी, दुसरी लाट टाळण्यासाठीदेखील आपले योगदान बहुमोल असेल. गर्दी टाळूया, नियम पाळूया, दुसरी लाट टाळूया, कोविडला हरवूया असा आपण सर्वांनी निर्धार केला तरच हे सारे शक्य आहे. 
अन्यथा...

- अवित बगळे

संबंधित बातम्या