गोव्याची आत्मग्लानी कधी सरणार?

काय होईल माझ्या या गोमट्या गोव्याचे? कुठल्या दिशेने चालला आहे हा गोमंतकीय समाज?
What is direction of Gomantak society: New Year 2022

What is direction of Gomantak society: New Year 2022

Dainik Gomantak

सरत्या वर्षाला (New Year) निरोप देताना मन विषण्णतेने भरून येते आहे ते गोव्याच्या (Goa) भवितव्याचे विचार पिच्छा पुरवत असल्याने. काय होईल माझ्या या गोमट्या गोव्याचे? कुठल्या दिशेने चालला आहे हा गोमंतकीय समाज? मतिभ्रष्ट झालेला समाज आपलेच थडगे खोदत असतो, असे म्हणतात. त्याच वळणाने तर आम्ही जात नाही आहोत ना? आम्ही जगण्यासाठी सर्व काही करतो आहोत, किंबहुना अन्य भारतीयांच्या तुलनेने ते अधिकच चांगल्या प्रकारे करतो आहोत, म्हणूनच तर गुळगुळीत कागदावर छापली जाणारी देशी नियतकालिके गोव्याला न चुकता प्रगतिशीलतेचे नानाविध पुरस्कार देत असतात. पण आपल्या या जगण्याच्या, प्रगतीच्या सहज प्रवृत्तीमागे काही वैचारिक उन्नयन आहे? जगण्यासाठी नव्या क्लृप्त्या लढवणे हा सजीवांचा जीवनधर्म झाला. कृत्रिम गोष्टीला तोंडही न लावणारा बैल आता टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या चिवडतो, एखादीत कुठल्या तरी खाद्यपदार्थाचा लवलेश सापडेल, या आशेने. आपणही त्याच्यासारखेच निर्बुद्धपणे चरायचे का? तर मग आपल्यात आणि गुरांत फरक तो काय राहिला?

आपण गोमंतकीय म्हणून मायभूमीचा साकल्याने विचार कधी करणार आहोत? या भूमीला आपल्यामधल्या लबाडांनी पोखरले, तेव्हा आम्ही गप्प बसून तोंडचा घास हिरावून घेतला जाताना बघत राहिलो. आता परप्रांतातून येणाऱ्या धनाढ्यांच्या टोळधाडी आपल्यासमोर हिरव्या नोटांचा मोरपिसारा फुलवतात आणि दिवसाढवळ्या आपल्याला निर्वस्त्र करून जातात, तेही आम्ही मुक्यानेच पाहात आलो आहोत. गोव्याच्या मातीतून कधी साम्राज्य उभारणीच्या उर्मी बाळगणारे बीज उगवले नाही. आपल्यावर सतत कोणी ना कोणी परक्याने राज्य केले. मध्येच कधी तरी आपल्यातल्या तरुणाईला या आत्मग्लानीचा साक्षात्कार झाला आणि ती बंड करून उठली, तेवढेच. त्या चैतन्यशील पर्वाला जेमतेम साठ वर्षे होतील; पण आम्ही पुन्हा ग्लानीच्या आधीन झालो आहोत. आम्ही पराभूत मानसिकतेलाच कवटाळण्याचा प्रण केलाय का? आपल्या धमन्यांतून वाहाणारे रक्त यापुढे कधीच सळसळणार नाही का? आपले ते जपण्याचा, प्राणपणाने त्याचे जतन करून वारशाच्या रूपाने ते साभिमान आपल्या मुला-नातवंडांच्या हाती सुपूर्द करण्याचा विचार आपल्या मनाला शिवणारही नाही का?

<div class="paragraphs"><p>What is direction of Gomantak society: New Year 2022</p></div>
नवीन वर्षामुळे धमाल-मजामस्ती.. पण कोविड संक्रमणात वाढीची शक्यता?

‘गोमन्तक’ सतत खाणप्रश्नाची अप्रकाशित बाजू उजेडात आणतो आहे. खाणीत स्वारस्य असलेल्या मालकांची वृत्तपत्रे ते धाडस करणार नाहीत, म्हणून आम्ही हा किल्ला एकहाती लढवत आहोत. त्यामागे स्वार्थ असल्याचा आरोप एकही खाणचालक वा त्यांच्या उष्ट्यावर जगणारा राजकारणी करणार नाही. आमचे तोंड हिरवी स्वप्ने दाखवून बंद केली जाऊ शकतात, असे कळले तर आज खाणचालकांच्या गाड्या दाराशी येऊन थांबतील. पण या हरामाच्या कवड्यांपेक्षा आम्हाला स्वाभिमानाची मीठभाकर मोलाची वाटते. अथकपणे आम्ही खाणींच्या सार्वजनिक मालकीला प्रस्थापित करण्यासाठी आग्रह धरतो आहोत, यामागचे एकमेव कारण म्हणजे हे सर्वस्वी गोमंतकीयांच्या मालकीचे संचित आहे. आज गोव्याची लोकसंख्या जर पंधरा लाख असेल तर या भूमीच्या पोटात असलेल्या खनिजाचे धनीही पंधरा लाख आहेत. अगदी स्वतःला खाण अवलंबित म्हणणारेही खाणींचे प्रत्यक्षात मालक आहेत. पण या मालकांना बेदखल करून चार-दोन टाळक्यांच्या हवाली सार्वजनिक संपदा केली जात आहे. ही लूट आम्हाला सलते आणि आम्ही पोटतिडकीने तो विषय सार्वजनिक विचारांच्या ऐरणीवर धोपटत राहातो. यातून गोमंतकीयांचा स्वाभिमान जागावा, इतकीच आमची इच्छा. या भूमीतून स्वाभिमानाचे पाते पुन्हा लसलसत उगवले, तरच तिचे उरलेसुरले संचित राखता येईल, ही आमची प्रामाणिक भावना आहे.

आमच्या जमिनी ‘भायल्यां’नी विकत घेतल्या हे खरे; पण विकणारे आम्हीच तर होतो. किनारपट्टीवर आता गोमंतकीयांची मालकी शिल्लक राहिली असेल तर ती मोजक्याच काही घरांपुरती. विचारशून्य कृतीचा हा परिपाक आहे. पर्यटनाचा विचका होण्यामागे त्या व्यवसायाची सूत्रे परकीयांच्या ताब्यात देणारी आमची विचारविहीन कृती आहे. आमच्या मूढपणाची चौकट दूर करून आपल्याला या प्रमादांकडे बघताच येणार नाही. सत्त्व आणि तत्त्व सरते, तेव्हा स्वत्वाचा विसर पडतो व निःसत्त्व जीणे जगण्याची वेळ येते. गोवा आज त्याच दिशेने चालल्याचे वैषम्य आम्हाला वाटते आहे.

आता तर ही मूढ कृतीची प्रक्रिया भलतीच गतिमान झालीय, इतकी की नियंत्रणात आणली नाही तर गोवा जेमतेम दशकभरात धेडगुजऱ्यांची वसाहत बनून राहील आणि स्वतःला गोमंतकीय म्हणवणारा अल्पसंख्याक होऊन या धेडगुजऱ्यांची उष्टी खरकटी सांभाळत बसेल.

राजकारण्यांच्या माथी सारे खापर फोडण्याची सवय आपल्याला लागलीय. पण राजकारणी तर आपल्यातूनच पुढे येत असतात. राजकारणाकडे शेतकऱ्यांच्या तटस्थतेने पाहायचे असते. शेतकऱ्यांच्या शेतातले गवत कंबरेपर्यंत वाढले म्हणून तो त्याचे कौतुक बघत बसत नाही. निर्दयी होत त्या गवताला उपटून फेकून देतो. राजकारणातले उंच वाढलेले गवत उपटण्याचे आपल्याला केव्हा सुचणार? त्याच बथ्थड डोक्याच्या, स्वार्थी, घरबुडव्या व भ्रष्ट लोकांना आपण कुठपर्यंत मतांचे पाठबळ देणार? आम्हाला इथे कोणत्याही एका राजकीय पक्षाकडे बोट दाखवायचे नाही. कारण सगळेच पक्ष स्वाहाकाराचा मंत्र जपत गोव्याच्या डबोल्यावर डोळा ठेवून आहेत. त्यांना नेत्यांची कुमक आपण पुरवतो. हे नेते भाडोत्री सैनिकांसारखे जिथे अधिक बोली लागते तिथे झेपावतात. त्यांच्याकडे नीतिमत्ता नावालाही शिल्लक नाही, म्हणून ते तसे करतात; पण नागरिक म्हणून आपणही नीतिमत्ता खुंटीला लावलेली नाही ना. भाकरी परतली नाही तर ती करपते, हे माहीत असूनही

<div class="paragraphs"><p>What is direction of Gomantak society: New Year 2022</p></div>
Vasco: नववर्षामुळे वास्को पालिका कार्यालयातील कर्मचारी सुट्टीवर; नागरिकांचा खोळंबा

आपण त्याच त्या चाकोरीतून का जात आहोत?

प्रश्न अनेक आहेत आणि गोव्याच्या भविष्याविषयीच्या विवंचनाही. जोपर्यंत गोमंतकीय समाज एकजिनसी विचार करून भ्रष्ट प्रवृत्तींच्या निर्दालनाची प्रत्यक्ष कृती करत नाही, तोपर्यंत या विवंचना सरणारही नाहीत. मात्र, ‘गोमन्तक’ एवढ्यामुळे निराश होणार नाही. विचारांचा महायज्ञ सतत पेटता ठेवण्याच्या आमच्या या व्रतात किंचितही फरक पडणार नाही. आम्ही अखेरपर्यंत हा किल्ला लढवत राहू, काळोखाच्या कडेने दिसणाऱ्या अंधूक उजेडाच्या किरणांचा वेध घेत राहू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com