Gomantak Editorial: कटू सत्याची मात्रा

‘जागतिक आरोग्य संघटना’ जेव्हा एखाद्या बाबतीत लोकांना सावधगिरीचा इशारा देते, तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागते.
Diet and health
Diet and healthDainik Gomantak

Gomantak Editorial आधुनिक विज्ञानाने एकीकडे मानवी जगणे बरेच सुसह्य केले आहे, आयुर्मान वाढवले; पण दुसऱ्या बाजूला अनेक अंतर्विरोधांचे पेचही आपल्या पुढ्यात वाढून ठेवले आहेत. त्यांना सामोरे जाताना नीरक्षीर विवेकाची आणि जागरुकतेची किती नितांत गरज आहे, याची जाणीव करून देणाऱ्या घटना घडताहेत.

समाजमाध्यमे हातात आल्याने माहिती, मते, सल्ले, कानमंत्र यांचा पूर वाहात असून त्यात बऱ्याचदा सत्य-असत्याचे बेमालूम मिश्रण असते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस भांबावला तर नवल नाही. त्यातही हे जेव्हा आरोग्याच्या क्षेत्रात घडते, तेव्हा प्रश्न आणखीनच गंभीर बनतो. अशावेळी ज्या विश्वासार्ह व्यक्ती, संस्था आहेत, त्यांचाच आधार उरतो.

त्यामुळेच ‘जागतिक आरोग्य संघटना’ जेव्हा एखाद्या बाबतीत लोकांना सावधगिरीचा इशारा देते, तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागते. विविध कारणांनी आहारातील साखर कमी केली पाहिजे, याविषयीची मानसिकता तयार झाल्यानंतर साखरेला पर्याय म्हणून साखरविरहित गोडवा आणणाऱ्या पदार्थांची निर्मिती होऊ लागली.

शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी, जाडी घालविण्यासाठी साखर नको म्हणून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. इतका की एका पाहणीनुसार, येत्या काळात या पदार्थांची बाजारपेठ 65 अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याची चिन्हे आहेत.

अशा परिस्थितीत ‘जागतिक आरोग्य संघटने’ने एका संशोधनाच्या आधारे इशारा दिला आहे, की आहारात साखरेला पर्याय म्हणून गोडवा आणणारी शुगर फ्री उत्पादने वापरल्याने आरोग्यासाठी दूरगामी लाभ संभवत तर नाहीच; पण काही विकारांना निमंत्रण मिळण्याचा धोका आहे. त्यात हृदयविकार आणि मधुमेह (टाइप टू) यासारख्या विकारांचाही समावेश आहे.

मग ज्यांनी आजवर या पदार्थांचे सेवन केले, त्यांच्या आर्थिक आणि शारीरिक हानीचे काय? त्याचे उत्तरदायित्व कोण घेणार, हे प्रश्न साहजिकच उपस्थित होतात. मुळात अशा उत्पादनांना उठाव मिळाला तो ‘साखर नको; पण गोडवा हवा’, या इच्छेतून.

‘जागतिक आरोग्य संघटनेने’च आहारातून आपण जी ऊर्जा घेतो, त्याचा दहा टक्क्यांपेक्षा अधिक भाग साखरेचा नसावा, अशी शिफारस 2015 मध्ये केली होती. साहजिकच त्यानंतर अशा पदार्थांकडे वळणाऱ्यांची, ते वापरणाऱ्यांची संख्या वाढली असल्यास नवल नाही.

Diet and health
Ponda Panchayat News : फोंड्यातील कामे वेळेतच पूर्ण करणार : नगराध्यक्ष

रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण याविषयीची जी मानके यापूर्वी सांगितली गेली, आणि नंतर त्यात जे बदल केले गेले, तेदेखील सर्वसामान्यांना बुचकळ्यात टाकणारे होते. यातील सर्वात कळीचा प्रश्न हा आहे की, वैज्ञानिक संशोधनाचे पाऊल पुढे पडल्यामुळे हे केले गेले, की बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्यांच्या क्लृप्त्या आणि दबाव यांतून घडले?

रक्तदाबाच्या विकाराविषयी एक प्रकारची भीती निर्माण करून अब्जावधी रुपयांची औषधविक्री करून झाल्यानंतर मग मानक बदलली गेले, असा संशय कोणाच्या मनात आला तर त्याला बोल कसा लावता येईल? अशा काही घटना घडल्या, की सध्याच्या एकूणच जागतिक आरोग्य व्यवस्थांविषयी अविश्वास निर्माण होऊ लागतो.

काही जण दुसऱ्या टोकाला जाऊन प्रत्येक बाबतीत ‘घातसूत्रे’ शोधायला लागतात. विवेकाची गरज जाणवते ती इथेच. याचे कारण विज्ञान संशोधनाच्या माध्यमातून मानवी आयुष्य अधिकाधिक सुखी व्हावे, यासाठी प्रामाणिकपणे काम करणारेही लोक आहेत.

Diet and health
Curchorem Bike Stunt: कुडचडेतील सार्वजनिक रस्त्यावर स्पोर्टस् बाईक चालकांचे जीवघेणे स्टंट

त्यामुळेच वैद्यकशास्त्र आणि त्याचे उपयोजन याविषयी कोणत्याही टोकाला जाण्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याविषयीचे डोळस भान ठेवणे महत्त्वाचे आहे. मुळात वाढती चरबी, मांद्य याला व्यायामाचा अभाव कारणीभूत असतो.

जाहिराती-प्रचार-माहितीप्रसाराच्या या युगात आपण कशाच्या तरी ‘आहारी’ जाऊन आपली मूळ जीवनशैली अकारण बदलत तर नाही ना, हे पाहिले पाहिजे.

परंपरेने चालत आलेली खाद्यसंस्कृती केवळ फॅशनेबल गोष्टींना बळी पडून बदलण्याचे कारण नाही. याविषयी प्रबोधनाची गरज आहे. आपल्याकडे तर आहाराविषयीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी ऋतुमानाचा विचार करून सणवारांमध्ये इतक्या सुंदर रीतीने गुंफल्या आहेत की, त्यातील मर्म लक्षात घेऊन त्यांचे पालन करणे हिताचे आहे.

जे आपल्याच हातात आहे, ते आपल्या आरोग्यासाठी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वैद्यकविषयक सर्व व्यवहारांचे नियमन सध्या आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या आणि सक्षम रीतीने होण्याची आवश्यकता आहे, याविषयी शंकाच नाही. त्या व्यवहारांची पारदर्शकता वाढायलाच हवी.

परंतु त्यासाठी प्रयत्न करत असताना आपणच आपल्या आरोग्याचे भवितव्य दुसऱ्या कोणाच्या हाती आंधळेपणाने सोपविणार असू, तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही. या बाबतीत जर आपण जागरूक झालो तर जागतिक पातळीवर अनुभवाला येणारे हेलकावे आणि लाटा यांची फारशी फिकीर करण्याची गरज नाही.

एकूणच आयुष्यात कृत्रिम गोडवा शोधण्यापेक्षा नैसर्गिक गोडी महत्त्वाची, एवढे सर्वच बाबतीत लक्षात ठेवले तरी पुरे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com