कोविड महामारीनंतर शिक्षण घेताना...

अंतरजालाच्या माध्यमातून शिक्षक - विद्यार्थ्यांचा शैक्षणिक संपर्क होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर ‘ऑनलाईन क्लास’ ही संकल्पना पुढे आली.
कोविड महामारीनंतर शिक्षण घेताना...
कोविड महामारीनंतर शिक्षण घेताना... Dainik Gomantak

वास्तविक इतर क्षेत्रांना झालेल्या नुकसानीची भरपाई - काही प्रमाणात का होईना- हळूहळू होऊ शकेल; परंतु शाळा, विद्यार्थी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेला हा काळ बरीच वसुली करणारा ठरणार आहे, असे दिसू लागले आहे. एका संपूर्ण पिढीसमोर उभी झालेली अनेक प्रश्नचिन्हे त्यांच्या आणि एकूणच समाजाच्या दृष्टीने अत्यंत काळजी करण्यासारखी आहेत असेच विचारांती वाटू लागते. अर्थात ‘बूंदसे गयी वो हौदसे नही आती’, हे जरी खरे असले तरी प्रत्येक काळ्या ढगाला एक रूपेरी किनार असते, हे लक्षात घेऊन सकारात्मकपणे या वस्तुस्थितीवर कशी मात करता येईल, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

२१ मार्च २०२० च्या देशव्यापी टाळेबंदीनंतर हळूहळू टाळेबंदीचा काळ वाढत गेला आणि बहुधा सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांतील कामकाज ठप्प झाले. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या कालावधीतील बहुतेक अभ्यासक्रमांच्या मूल्यमापनाचा तो काळ होता. विद्यार्थ्यांचे परीक्षेवर आधारित मूल्यमापन ही मॅकॉलेप्रणीत शिक्षण व्यवस्थेची एकमेव मूल्यमापन कसोटी आजपर्यंत राबविल्यामुळेच आता पुढे काय, हा प्रश्न सर्व पालकांना सतावू लागला होता. औपचारिक शिक्षणाला पर्याय नाही हीच वास्तवता आणि त्यातून झालेली सामाजिक मानसिकता यांमुळे यावर तोडगा शोधण्याचे काम संबंधितांना करावे लागले. अंतरजालाच्या माध्यमातून शिक्षक - विद्यार्थ्यांचा शैक्षणिक संपर्क होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर ‘ऑनलाईन क्लास’ ही संकल्पना पुढे आली. गुरुकुल संकल्पनेचा वारसा घेऊन येणाऱ्या भारतासारख्या देशात ही संकल्पना किती फलद्रुप होत आहे वा होईल, हे काळच ठरवील.

कोविड महामारीनंतर शिक्षण घेताना...
गोव्यातील खाणींची सुवार्ता

अर्थात गेल्या कित्येक पिढ्या परीक्षार्थी बनलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया ही मूल्यमापनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने शिक्षण व्यवस्थेला परीक्षा घेण्यासाठी आणखीही दिव्यातून जावे लागले. महामारीच्या पहिल्या लाटेत म्हणजे २०१९-२० या शैक्षणिक वर्षांतील काही परीक्षा टाळेबंदीपूर्वीच झाल्या असल्या तरी नंतर उर्वरित बहुतेक सर्व परीक्षा रद्द करून टाकाव्या लागल्या आणि अंतर्गत मूल्यांकनानुसार काही परीक्षांचे निकाल जाहीर केले गेले.

नीट, जेईई यासारख्या प्रवेश परीक्षा पुरेशा खबरदारीनिशी केंद्रावर घेण्याच्या निर्णयालाही विद्यार्थी, पालक, काही संघटना यांनी विरोध केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या गेल्या. एकूणच सरकार वा संबंधित व्यवस्थांनी अतिशय परिश्रमपूर्वक योजना आखून या महत्त्वपूर्ण परीक्षांचा व्याप पूर्ण केला. मधल्या काळात विविध प्रयत्नांना यश आल्याची चिन्हे दिसून हळूहळू महामारीचा विळखा सैल होतोय, असे वाटेपर्यंत पुन्हा या महामारीने तीव्र रूप धारण केले. ज्या नवीन विषाणूपुढे उपचारक आणि संशोधकही हतबलतेचा अनुभव घेत होते, तो विषाणू अधिक आक्रमकतेने पसरत होता. रोगप्रतिबंधक लस वा औषधे उपलब्ध नसल्याने विविध नियम पाळून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, हेच सर्वांच्या हातात होते.

ऑनलाईन वर्ग वा व्हिडिओ शिक्षणाला आता हळूहळू विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही सरावले आहेत. वास्तविक या नवीन बदलासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा वा सामाजिक मानसिकता निर्माण होण्यासाठी थोडा काळ जाण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाला पर्याय म्हणून अतिशय किरकोळ स्वरूपात काही शाळा - महाविद्यालयांनी प्रत्यक्ष वर्ग सुरू केले आहेत. या नवीन बदलाचे स्वागत काहीजण आनंदाने तर काही नाईलाजाने करताना दिसतात. एकूण माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विद्यापीठीय पातळीवरील सर्वच नसले तरी बहुतेक विद्यार्थी बऱ्याच प्रमाणात या बदलाला सरावले आहेत.

या सर्व शैक्षणिक परिवर्तनातील खरा प्रश्न आहे तो शालेय विद्यार्थ्यांचा. शैक्षणिक संस्था ही औपचारिक ज्ञान वा माहिती देणारे एक पवित्र स्थान असते हे जितके खरे आहे तितकेच ते अनौपचारिक शिक्षण आणि संस्कार देणारे महत्त्वाचे ठिकाण असते. मुलांचे सहा ते चौदा हे वय संस्कारक्षम असे असते. या वयात समवयीन मुलांसोबत दंगा-मस्ती करून त्यांच्यातील अतिरिक्त ऊर्जेचा निचरा होण्याची गरज असते. मुलांचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यासाठी अशा अनौपचारिक शिक्षणाचे फार महत्त्व असते.

कोविड महामारीनंतर शिक्षण घेताना...
गोवेकरांसाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा 1 डिसेंबरपासून

सद्यकालीन महामारीत या वयोगटातील मुलांच्या अनुभवविश्व आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे फारच नुकसान होत आहे. अनेक मुलांच्या बाबतीत त्यांची अतिरिक्त ऊर्जा वाईट वर्तनाकडे झुकताना दिसते आहे. हातात आलेले मोबाईल या अल्पवयीन मुलांना असंस्कारित करतील की काय, अशी भीती वाटू लागली आहे. मोबाईलवर खेळ खेळण्याचा नाद लागलेल्या अशा अनेक मुलांनी अज्ञानातून खेळांसाठी पालकांच्या खात्यावरील पैसे वापरण्याची परवानगी दिल्यामुळे कित्येक पालकांच्या खात्यावरील हजारो रुपये गायब झाल्याचे अनुभवही पालक एकमेकांना सांगत आहेत.

या विपरित परिस्थितीत बाहेर मुलांना खेळण्यास मज्जाव असल्याने हातात मोबाईल आलेली मुले खेळ वा तत्सम अनिष्ट गोष्टींच्या आहारी जात आहेत. त्यातूनच मोठ्या माणसांना आपली कृत्ये कळू नये म्हणून लपवाछपवी आणि खोटेपणा अंगी बाणवू लागली आहेत, ही गोष्टही अलीकडे निदर्शनाला आली आहे. या सर्व गोष्टी समाजाच्या स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या ठरू नयेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करणे हेच आपल्या हातात आहे.

-डॉ. विद्या प्रभुदेसाई

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com