थंडीत सांभाळा हृदयाचे आरोग्य..!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 डिसेंबर 2020

हिवाळा सुरू झाल्याने सध्या तापमानामध्ये अचानक घट होत आहे. याचा परिणाम बाह्य शरीरासह हृदयावरही होतो. थंडीत रक्त घट्ट होत असल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होत नाही.

मुंबई  :  हिवाळा सुरू झाल्याने सध्या तापमानामध्ये अचानक घट होत आहे. याचा परिणाम बाह्य शरीरासह हृदयावरही होतो. थंडीत रक्त घट्ट होत असल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्‍याची शक्‍यता अनेक पटींनी वाढते. त्यामुळे हृदयाचा आधीपासून त्रास असलेल्यांनी हिवाळ्यातील थंडीपासून आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना दिला आहे.

हिवाळ्यात हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होते. यामुळे वायू प्रदूषण वाढते. हिवाळ्यात शरीराला गरम करण्यासाठी मज्जासंस्थेची क्रियाशीलता वाढते आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्याचवेळी रक्त घट्ट होते. हे सर्व घटक रक्तदाबावर नकारात्मक पद्धतीने परिणाम करू शकतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता वाढते. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मते, आपल्या शरीरास ऊबदार ठेवण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम करावे लागतात. त्यामुळे थंडीत आपल्या हृदयाची गती आणि उच्च रक्तदाब वाढतो. शिवाय थंडीच्या दिवसात झोपून राहिल्यास रक्तपुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या आणि झटका येण्याची 

 

कशी काळजी घ्याल?

  •     हृदय रुग्णांनी सकाळी फिरणे टाळावे.
  •     थंडीत ऊबदार कपडे परिधान करावेत.
  •     थंड हवामानात व्यायाम टाळावा.
  •     घराबाहेर पडताना हातमोजे, स्कार्फ वापरा.
  •     तेलकट खाद्यपदार्थांपासून दूर राहावे.
  •     सात-आठ तास झोप घ्यावी.
  •     शारीरिक श्रमाची अधिक कामे करू नयेत.
  •     थंडीत मद्यपान करू नये.
     

"हिवाळ्यात हृदयावर अतिरिक्त दबाव येतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी हृदयातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होते. अनेकदा रक्ताच्या गुठळ्याही होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता वाढते. हिवाळ्यात उच्च रक्तदाबाच्या  रुग्णांना घाम येत नसल्याने शरीरातील मिठाचे प्रमाण वाढते. यामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो."
- डॉ. रवी गुप्ता, हृदयरोग तज्ज्ञ, वोक्‍हार्ट रुग्णालय, मुंबई

"थंडीत हृदयाशी संबंधित विकारांमध्ये प्रचंड वाढ होते. ज्या व्यक्तींना हृदयाचा कोणताही आजार नाही, अशांनाही थंडीत हा त्रास जाणवू शकतो. हिवाळ्यात रक्त गोठत असल्याने हृदयाला रक्तपुरवठा योग्य पद्धतीने न झाल्यास हार्ट फेल्युअरची समस्या उद्‌भवू शकते. त्यातच हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांनी स्वतःच्या हृदयाची काळजी घेणे गरजेचे आहे."
- प्रा. डॉ. अजय चौरसिया, हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय, मुंबई

 

संबंधित बातम्या