संशय का मनी आला!

सौ. नीमा आमोणकर
बुधवार, 12 ऑगस्ट 2020
प्रत्येक गोष्ट संशयास्पद बनत गेली तर नात्यात, मैत्रीत कटुता येणं साहजिक. विनाकारण संशय बाळगल्याने कौटुंबिक स्तरावर मनं दुखावलं जाण्याची, नाती तुटण्याची शक्यता असते. पालकांनी तारुण्यात पदार्पण करणाऱ्या आपल्या पाल्यांवर सदैव संशयास्पद रितीने नजर न ठेवता संवादाचं अस्त्र वापरून विश्‍वास संपादन करण्यावर भर द्यावा.

सौ. नीमा आमोणकर

माणसाचं मन हे अजीब रसायन, या इवल्याशा मनात काय-काय पिकतं काय-काय रूजतं, हे कळणं महाकठीण. मनात कोणत्या विचाराचं वादळ उठलंय, कोणती खलबतं रूजू लागली आहेत. ह्याचा थांगपत्ता लागणं अशक्य. दुसऱ्याचं मन आपण बघू शकत नाही. थोडक्यात मन ही अलीबाबाची गुहाच. त्यातून बरं वाईट काय काय निघेल काही सांगता येत नाही. मनात प्रेम, माया, आपुलकी, चांगुलपणाचा वास असू शकतो त्याचप्रमाणे द्वेष्, राग, इर्ष्या सारख्या प्रवृत्तींचं भांडार ही असू शकतं. असंच मनात घर करून ठाण मांडून बसणार भूत म्हणजे संशय. ही संशयीवृत्ती मनात घर करून बसली की सहजासहजी तिचं तिथून काढता पाय घेणं कठीण. काही ठिकाणी, काही प्रसंगी काही कार्यक्षेत्रात सावधगिरीच्या पायी संशय बाळगणं तसं अपरिहार्य असतं. खास करून राजकारणाच्या क्षेत्रात तर संशयाच्या आधारे मोठीमोठी खलबतं, कटकारस्थानं धुडकावली जातात. राष्ट्रीय सुरक्षेसाठी तर संशयीवृत्ती लाख मोलाची पण सामान्य माणसं मात्र काही वेळा विनाकारण तर काही वेळा अज्ञानामुळे तसंच अर्धसत्याच्या आधारे संशयवृत्ती बाळगून प्रेम-सलोखा, मान-सन्मान गमावत असतो.
आजकाल तसं पाहिलं तर आपण आत्मकेंद्रित बनत चालल्यामुळे संशयाचं भूत बऱ्यापैकी अन् बऱ्याच जणांच्या मानगुटीवर बसलंय अन् ते सुध्दा साध्या क्षुल्लक गोष्टीवरून. काळ गतीने सरकताना माणसं एकत्र येण्याचे क्षण धावपळीत उडून चाललेत. तसंच आजकाल एकमेकांकडे जाणं येणं तसं बऱ्यापैकी घटत चाललं असताना एखादे वेळेस सहज म्हणून सुध्दा आप्तेष्टांकडे जाणं झालं तर आपलं स्वागत करणारे ‘यजमान’ आज ‘पाहुण्यांच’ आपल्याकडे येण्यामागील कारण काय असेल ह्याचा आपल्यापरीने मनोमन अंदाज बांधत असतात. आपल्या घरी पाहुण्यांचं आगमन झाल्याचा आनंद मनवण्यापेक्षा त्यामागील कारण मीमांसा करण्यात गुंतून जात असतात. कळस म्हणजे एखाद्यानं प्रेमानं पाठविलेल्या एखाद्या भेटवस्तूचा स्वीकार करताना ह्याचं आपल्याकडे काहीतरी काम असेल त्यामुळेच आपल्याला भेट पाठविली असेल असे संशयास्पद विचार मनात घोळवत असतात.
संशयाला एक मर्यादा असावी. प्रत्येक गोष्ट संशयास्पद बनत गेली तर नात्यात, मैत्रीत कटुता येणं साहजिक. विनाकारण संशय बाळगल्याने कौटुंबिक स्तरावर मनं दुखावलं जाण्याची, नाती तुटण्याची शक्यता असते. पालकांनी तारुण्यात पदार्पण करणाऱ्या आपल्या पाल्यांवर सदैव संशयास्पद रितीने नजर न ठेवता संवादाचं अस्त्र वापरून विश्‍वास संपादन करण्यावर भर द्यावा. प्रसंगी आपल्या मनात उफाळणाऱ्या शंका-कुशंकांची स्पष्टपणे फोडनिशा करणं केव्हाही चांगलंच. संशय हा पाणी साचलेल्या डबक्याप्रमाणे असल्याने प्रेम, स्नेहाचा झरा वाहण्यापासून रोखणारा असतो. ‘‘शक ही दोस्ती का दुश्‍मन है.. दिल में इसे घर बनाने न दो... जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम, वो फिर नहीं आते...’’
पती-पत्नीच्या संशयापोटी वैवाहिक जीवनात पडणारी दरार दर्शवणारं हे गीत बरंच काही सांगून जातं. माझ्या मते तर कित्येक संसार उद्ध्वस्त होण्यापासून रोखले जाऊ शकणारे असे हे ह्रदयस्पर्शी गीत! एखाद वेळेस एखाद्यावर वळवलेली संशयाची सुई फोल ठरली तर पश्‍चातापाशिवाय दुसरा पर्याय उरत नसतो हे दर्शविणारा एक किस्सा.
सुखवस्तू, आर्थिक सुबत्ता लाभलेल्या सुमनच्या लेकीचं लग्न पाच सहा दिवसावर येऊन ठेपलेलं, सुमनच्या छोट्या बहिणीनं आपल्या मुलांसमवेत मोठ्या उमेदीनं लग्नघरात हजेरी लावली. सर्वांचा उत्साह द्विगुणित झालेला. बहिणीवर घरच्या जबाबदाऱ्या टाकून सुमनला बाहेरील कामं निपटण्यास वेळ मिळू लागलेला. बहीण तर मोठ्या आनंदानं सहभागी झालेली. अखेर हळदीचा दिवस उजाडला. लेकीला दागिन्यांनी मढवताना सुमनने स्वतःही आपले दागिने मोठ्या हौशेने अंगावर चढवले. आपल्या रोजच्या वापरातल्या बांगड्या बाजूला काढून ठेवत नवीन साज चढवला. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. लेकीची पाठवण झाली. घर सुनं-सुनं झालं. अशावेळी बहिणींची साथ सुमनच्या मनावर फुंकर चालणारी पण दुर्देवानं दुसऱ्याच दिवशी सासूची तब्येत बिघडल्यामुळे बहिणीला बोलावणं आलं. दुसरा पर्यायच नव्हता. सुमनने बहिणीचा, तिच्या पती तसंच मुलांचा यथासांग मान-पान करून जड मनानं निरोप दिला. लेकीला, बहिणीला निरोप देऊन झालेल्या सुमनला आता चिंता होती ती आपल्या दागदागिन्यांना निरोप देण्याची अर्थात बॅंक-लॉंकर मध्ये स्थानापन्न करण्याची. नवीन अलंकार जागी लावून परत आपल्या जुन्या बांगड्या घालण्यासाठी तिनं कपाट उघडलं. पण बांगड्या मिळेनात.बऱ्याचशा सवयीच्या जागी तिनं शोधाशोध केली पण बांगड्या गायब. तिच मन प्लॅशबॅक मध्ये जाऊन आलं त्या दिवशीच्या सगळ्या घटना मनोमन रिवांइड करून पहिल्या जुन्या बांगड्या हातातून काढताना तिच्या समवेत होती ती व्यक्ती म्हणजे तिची बहीण नोकरवर्गाचा प्रश्‍नच नव्हता. आर्थिक परिस्थिती बेताचीच असणाऱ्या बहिणीवर संशयाची सुई वळवली. आपल्या लेकीच्या दागिन्यांना कौतुकानं न्याहाळणाऱ्या बहिणीचा चेहरा परत-परत तिच्या नजरेसमोर फेर धरून नाचू लागला. चार बांगड्यांचा मोह तिलाच झाला असेल, कदाचित सासुच्या तब्येतीचं निमित्त करून तिनं दुसऱ्याच दिवशी त्यामुळेच तर पोबारा केला नसावा?अशा नाना शंका-कुशंकांचं खतपाणी संशयाला पुष्टी देत चाललेलं क्षणात आदर, माया, प्रेम धुळीस मिळत चाललेलं. त्यादिवसापासून बहिणीला फोन करणं सुध्दा टाळत चाललेली. तिचा फोन आला तर थोडक्यात संवाद आटोपण्याकडे सुमनचा कल असायचा.
सुमनची लेक आपला मधुचंद्र आटपून परतली. आल्या-आल्या आपल्या आईला फोन लावला. इकडच्या तिकडच्या गोष्टींना फाटा देत एक महत्त्वाची बातमी आईच्या कानावर घालायची तिला घाई झालेली. तिच्या चार बांगड्या आपल्या पर्समध्ये सापडल्याची बातमी लेकीच्या तोंडून ऐकताच सुमनंच डोकं एकदम सुन्न झालं. हळदीच्या दिवशी घाईगडबडीत आपल्या जुन्या बांगड्या आपल्या पर्सशेजारी असलेल्या लेकीच्या पर्समध्ये ठेवल्या गेल्याची जाणीव होताच ति मनोमन खजील झाली. नाहक बहिणीला दोषी ठरवल्याची खंत मनाला बोचू लागली. जिभेवर ताबा ठेवल्याने संभाव्य वादळ टाळलं गेलं. ‘संशयकल्लोळाची’ थोडी सुध्दा भनक लेकीला जाणवलेली तर आपल्या प्रिय मातृतुल्य मावशीवर झालेला अन्याय तिला सहन झाला नसता आणि आईला माफ करणं तिला जमलं नसतं हे जाणून सुमननं त्या गोष्टीला मनोमन तिलांजली दिली. एक सुंदर, नितळ नात्याचा गोफ तुटण्यापासून सावरला गेला. मनोमन पश्‍चातापाच्या प्रायश्‍चित्ताशिवाय सुमनपाशी दुसरा पर्यायच नव्हता.

 

 

संबंधित बातम्या