महिला आणि सकारात्मकता

महिला आणि सकारात्मकता
महिला आणि सकारात्मकता

मार्च २०२०मध्ये ताळेबंदी जाहीर झाली. आजवर कधीही माहिती नसलेला हा प्रकार भारताच्या वाट्याला आला. सगळे व्यवहार ठप्प. दुकाने, गाडे, आणि गाड्या सगळ्याच बंद झाल्या. सगळे बंद झाले, तरी माणूस जगण्यासाठी हवे असलेले अन्न निर्माण करणारा बळीराजा आणि शिजवून तयार करणारी घरातील स्त्री  कधी आपले व्यवहार बंद करू  शकत नाही. 

विशेषतः परीक्षा, त्यानंतरच्या सुट्ट्या ठरलेली मंगलकार्य या साऱ्याला लगाम आला. सर्वसाधारण रोजी वर रोटी भागवणारे पुष्कळ कुटुंबे  स्थलांतरित झाली. यात अगदी धनाढ्य लोकांपासून ते गरीब वॉचमन पर्यंत सगळ्या घरात चोवीस तास घरात असलेल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी उपलब्ध असल्या नसल्या सामानात भगवीत होत्या, त्यांना अन्नपूर्णा म्हणणे अगदी योग्य. 

या वेगळ्या परिस्थितीत विशेष म्हणजे नेहमीचे मदतनीस नव्हते. आपल्या घरी कामाला येणाऱ्या बायकांचे महत्त्व यावेळी खूपच जाणवले आणि त्याचबरोबर रोज येताजाता भेटणारे अनेकजण ज्यांचा उपयोग या अर्थी काहीच नसतो, पण त्यांचे अस्तित्व पुष्कळ महत्त्वाचे असते. 

चोवीस तास घरात राहणाऱ्या तिन्ही पिढ्यांचे खाणे, पिणे, पथ्य सांभाळत आणि असलेले सगळे धान्य भाजीपाला दूध पुरवून वापरताना त्या बाईची होणारी कसरत तिलाच ठाऊक. वर भर उन्हाची काहिली होत असताना गरम पाणी प्यायला लावायचे. खरच हे कसब एक भारतीय स्त्रीच करू शकते.

सुरुवातीला २२ दिवस पुन्हा २० दिवस करीत लॉकडाऊन पुरे चार महिने चालला. यातील पहिले दोन महिने फारच कठीण होते. पण तरीही कोणीच हार मानली नाही. 

विशेष म्हणजे जगात जेव्हा सगळे लोक भिऊन सैर भैर झाले होते तेव्हा आपल्या गोव्यातील बऱ्याच गावातील महिलावर्ग फणस निरफणस यांचे पापड, आंब्याची साटे, सांडगे, सोले, चिंचेचे गोळे करून आग ओकणाऱ्या सूर्याला आपल्या अंगणात जोजवत होत्या. आजूबाजूच्या या हल्लकल्लोळ माजवणाऱ्या स्थितीत आपले मानसिक धैर्य आणि स्थैर्य टिकवणारी ही बाई आपल्या घरातील बच्चे कंपनी आणि प्रसंगी नवरोजीना कामात मदत करायला लावीत  होत्या. 

याचा प्रत्यय आला, तो जेव्हा फोंड्यात गोवा शेतकरी या संस्थेचा ‘शेतकरी बाजार’ मे महिन्यात  भरला होता तेव्हा. या बाजारात या महिलांनी घरी बनवलेले हे पदार्थ विक्रीला होते. 

गोव्यातील कुळागर म्हणजे हिरव्या संपत्तीचे आगर. त्यात हा लॉकडाऊनचा मोसम म्हणजे पारंपरिक लोणची, पापड, साटे, सोले, सांडगे, कोकम, आगळ यांचा. आपल्या गावागावांतील भगिनींनी नेहमीप्रमाणे याचा उपयोग केला. शिवाय यावेळी परीक्षा शाळा नसल्याने मुलेही घरी होती. एवढ्या वर्षात कधीही न एकलेली महामारीची भीती मात्र सोबत होती आणि त्या भीतीसह स्वत: ची आणि कुटुंबाची काळजी घेत पुढे जायचे होते. 

याहीपेक्षा एक भीती आणखी होती, की आपण तयार करणाऱ्या मालाला बाजार मिळेल का? करोंनाच्या भीतीमुळे आपले पदार्थ कोणी घेतील का? आपली ही मेहनत आणि यासाठी वापरलेले पदार्थ वाया जाणार तर नाहीत? पण आपल्या मालाच्या गुणवत्तेबद्दल असलेली खात्री आणि विश्वास यामुळे त्यांनी आपले काम सुरू ठेवले होते. सूर्य उगवण्यापूर्वी फणसाची आंब्याची साटे, निरफणसाचे पापड अंगणात तयार होते. कोकम सोले आगळ ओटंबाची सोले, असे कितीतरी प्रकार करताना मेहनत, सातत्य , चिकाटी असे सगळे गुण असावे लागतात. शिवाय या पदार्थांची साठवण करणे हे एक मोठे काम असते. वेळेचा सदुपयोग, आजूबाजूच्या निसर्गाने दिल्या संपत्तीचा योग्य उपयोग असे अनेक पैलू यात असतात. 

हे काम त्या दर वर्षी करतातच. पण करोनाचे संकट जगावर आलेले पाहताना आणि अनेक श्रीमंत पाश्चिमात्य सुसज्ज देशांची उडालेली दैना पाहताना आमच्या महिलावर्गाने केलेलं हे काम म्हणजे स्वयंस्फूर्तीने सकारात्मक्तेकडे ठेवलेले पाऊल. ती कधीच हरत नाही. आणि कोणाला हरवू देत नाही. प्रत्येक क्षणी तिच्या डोक्यात असतो तो तिचा संसार आणि त्याचा विचार!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com