तेलही गेले आणि तूपही गेले, हाती आले धुपाटणे

The World Health Organization has also indicated that a second wave of infection has begun
The World Health Organization has also indicated that a second wave of infection has begun

चा दिवसांपूर्वीच कोरोनाचा वाढदिवस झाला. कोरोना महामारी चीनमध्ये सुरू झाली, त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरातील कोरोनाचा आढावा घेतल्यास जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा सहा कोटींपर्यंत पोहोचला आहे. जगभरातील मृत्यूचे प्रमाण हे चौदा लाखांवर पोहोचले आहे, तर गोव्यात हाच आकडा पन्नास हजारांच्या जवळ गेला आहे. गोव्यात कोविड मृत्यूचे प्रमाण हे देशातील इतर राज्यांपेक्षा जास्तच असून वीस लाख लोकसंख्येच्या या राज्यात बळींचा आकडा आता सातशेच्या जवळ पोहोचला आहे. कोविडचे हे आकडे हलतच आहेत. फक्त फरक एवढाच कोरोनाची संख्या आता कमी झाली असली तरी जगात आणि देशात आता दुसऱ्या लाटेचा संसर्ग सुरू झाला असल्याचे संकेतही जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत, आणि कोरोना रुग्णही वाढू लागले आहेत. एवढे सगळे माहीत असूनही आपण मात्र गाफील राहिलोय.  कोरोनाचा आकडा कमी झालाय हे फक्त मृगजळ आहे, आणि या मृगजळाच्या जाळ्यात आपण अडकलो असून ‘खाओ पिओ मौज करोच्या नादात सगळेजण वावरत आहेत, गोव्यात पर्यटनाचा बहार आलाय, आणि नकळतच एकमेकांना संसर्ग देऊन आपण जातोय, याची कुणाला खबरबातही नाही, एवढे आपण पर्यटनात दंग झालोय. 


कोरोनाच्या काळात बळी गेलेली कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. बहुतांश कुटुंबातील कमावता पुरुषच गेल्याने अजूनही या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सुटलेला नाही. या कुटुंबांचा आढावा कुणी घेतलेला नाही, की कुणी सहाय्य केलेले नाही. कोरोना काळानंतर एकामागोमाग एक अशी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन उठवली खरी, पण बळी गेलेल्या कुटुंबांकडे आपण दिलासादायक चित्र उभे करण्यास अपयशी ठरलो आहोत. चतुर्थीच्या काळात राज्यात कोरोनाचा आकडा सातशेपर्यंत पोचला होता, पण नंतरच्या काळात हा आकडा उतरला. विशेष म्हणजे होम क्वॉरंटाईनची सोय राज्य सरकारने उपलब्ध केली. त्यामुळे लोक आपणहूनच घरी राहू लागले. काहीजणांना तर कोरोना होऊनही गेला असेल. ताप आलेल्या लोकांनी आपल्यापरीने औषधे घेऊन कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, देशातील अथवा राज्यातील कोरोनाचे नियंत्रण हे कोणत्याही सरकारच्या प्रयत्नांमुळे झालेले नाही.

लोक अजूनही कोरोनाबाधीत होत आहेत, इस्पितळात जाण्याचे टाळून स्वतःच उपचार करीत आहेत. डॉक्‍टरांचा सल्ला घेत आहेत. त्यामुळे हा आकडा कमी दिसतोय. चतुर्थीनंतर राज्यात गरमी वाढल्यानेही कोरोनाचा संसर्ग रोखला गेल्याची चर्चा आहे, पण आता हिवाळा सुरू झाला असून देशात इतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, त्या लाटेचा प्रादुर्भाव आता गोव्यातही जाणवणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची स्थिती आणि वागणे पाहिले तर कदाचित आणखी महिन्या, दोन महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमालीचे वाढलेले आपल्याला दिसतील, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आपण काय करतोय, याचे भान प्रत्येकाने आणि विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेने ठेवण्याची आज गरज निर्माण झाली आहे. 


कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाल्यानंतर बरेच उद्योग व्यवसाय बंद पडले. राज्याची आणि देशाची आर्थिक घडी विसकटली. ‘इकॉनॉमिक ग्रोथरेट’ पार रसातळाला पोहोचला. त्यामुळेच एका पाठोपाठ लॉकडाऊन उठवण्यात आले. आता दुसरी लाट आल्यास आणि ती आटोक्‍यात येणे शक्‍य नसल्यास कदाचित दुसऱ्यांदा लॉकडाऊनची शक्‍यताही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आपण सगळे बिनधास्त आहोत. कारण कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाण नव्वद टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. कोरोना झाला तरी बरे होऊन येऊ शकतो, हा विचार केला जात आहे, पण लोकं मेली आहेत, कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत, त्याचा विचार मात्र आपण करीत नाही. 


देशातील सर्व राज्यात एकदम सुरक्षित राज्य कोणते तर ते गोवा, प्रदूषणापासून मुक्त श्‍वास कुठे घ्यायचा तर गोव्यात, पर्यटनासाठी कुठे जावे तर ते गोवा, आणि बिनधास्त उर्वरित आयुष्य कुठे घालवायचे तर ते गोव्यात हा विचार परप्रांतीयांच्या मनात रूढ झाला आहे. गोव्यात सेकंड होम घेण्याचा प्रकार चालीस लागला असून विशेषतः किनारपट्टी भागातील जमिनी लोक फुंकून टाकत आहेत. केवळ किनारपट्टीच नव्हे तर राज्यातील इतर भागातही जमिनी विकत घेण्याचे प्रकार वाढले आहेत. ग्रामीण भागातील डोंगरच्या डोंगर घशात घालण्याचे प्रकार घडत असून एकदा जमिनी ताब्यात घेतल्यानंतर मग त्या विकसीत करण्यासाठी स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार आता किनारपट्टी भागात स्पष्टपणे दिसू लागला आहे. एकापरीने आपण शांतताप्रिय आणि समृद्ध गोव्याचा ऱ्हास करतोय, याचे भान कुणालाही नाही. मला पैसे मिळाले बस्स...इतरांचे मला कशाला पडलेय...हाच विचार आज गोमंतकीयांच्या मुळावर येत आहे. 


गेल्या आठवड्याभरापासून पर्यटकांचे लोंढे गोव्यात वाढू लागले आहेत. गोव्यात आल्यानंतर कमरेचे सोडून ढोपराला बांधण्याचे प्रकार पर्यटकांकडून होत आहेत. या वाढत्या पर्यटकांच्या संख्येवर कुणाचेही नियंत्रण नाही. कसिनो सुरू झाल्याने, दारूची दुकाने खुली झाल्याने पर्यटक बेभान होऊ लागला आहे. गोव्यात सगळं काही माफ ही भावना या लोकांत आहे, ती आधी बदलायला हवी. देशातील इतर राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने हेच लोक जर पर्यटनासाठी गोव्यात यायला लागले, तर गोव्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती रास्त आहे, त्यामुळेच आवश्‍यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. आरोग्यमंत्र्यांनी परराज्यातील कोरोनाबाधितांची स्थिती, आकडेवारी यावर नजर ठेवण्यास सांगितले असले, तरी प्रत्यक्षात मात्र गोव्यात येणाऱ्या पर्यटकांवर कुणाचे नियंत्रण नाही, त्यामुळेच तर कसिनोतील कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक ठरू लागला आहे. 


कोरोना रोखण्यासाठी जे नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत, त्यांचे पालन केवळ वीस ते पंचवीस टक्के होत असल्याचे दिसत आहे. तोंडावरील मास्क आता हनुवटीवर आला आहे. काहीजणांनी तर मास्क वापरण्याचे सोडूनच दिले आहे. सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे. सॅनिटायझेशन खुंटीला टांगून ठेवले आहे. पोलिसांना दुचाकीस्वारांच्या डोक्‍याची चिंता वाटू लागली आहे, त्यामुळे हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना हुडकून तालाव दिला जात आहे. चेहऱ्याला मास्क लावला नाही तरी चालेल, पण हेल्मेट पाहिजेच हा आग्रह धरून पोलिस कारवाई करीत आहे. काय चाललेय हे..! मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे सरकारने यापूर्वी आदेश दिले होते. पोलिसांबरोबरच पालिका, पंचायतींचे सचिव व इतरांना मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार सरकारने दिले होते. त्यासाठी शंभर रुपये दंडाची तरतूद केली होती. पण कुणीही गांभीर्याने घेतलेले नाही. आता परत एकदा कारवाईचे सुतोवाच सरकारने केले आहे. सगळं काही रामभरोसे चालले आहे. कुणाला कशाचे पडलेले नाही, त्यामुळेच पर्यटनस्थळे, दारुची दुकाने, कसिनोत गर्दी वाढू लागल्याने येणारा काळ हा आपल्यासाठी कसोटीचा ठरू शकतो. कुणी म्हणेल कोरोना काळात बुरी हालत झाली, आता पर्यटन व्यवसाय जोरात आहे, त्यामुळे थोडे तरी पैसे कमवुया. नाही कुणी म्हटलेय, पण जे काही चालले आहे ते कोरोनाचे भान ठेवूनच करायला हवे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन झाल्यास तेलही गेले आणि तूपही गेले, हाती आले धुपाटणे अशी स्थिती झाली तर मग काय..!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com