World No Tobacco Day 2021: तंबाखू, बिडी, सिगार 'प्लिज छोड दो मेरे यार'

World No Tobacco Day 2021: Tobacco, bidis, cigars 'Please give up my friend'
World No Tobacco Day 2021: Tobacco, bidis, cigars 'Please give up my friend'

तंबाखू, (Tobacco) बिडी, (Bidis) सिगार, (Cigars) हुक्का, (Hukka) क्रिटेक्स, पान मसाला, खर्रा, चिलम, खैनी, गुटखा, ई-सिगारेट आणि अशा कित्येक प्राणघातक पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सेवन होतो. खूप मोठी विडंबना ही आहे की तंबाखूसारखे विष आपल्याला अगदी स्वस्त, सहजपणे उपलब्ध होतो. लहान मुलांपासून ते युवा, वृद्धांपर्यंत सगळेच या घातक व्यसनाचा आहारी असल्याचे दिसून येतात. ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोक तंबाखूच्या अतिप्रमाणात व्यसनाधीन झाले आहेत. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीही तंबाखूचे व्यसन करतात.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका कार्यक्रमात जाताना मी पाच वर्षाच्या मुलाला तंबाखूचे सेवन करताना पाहिले, या घटनेने मी स्तब्ध झालो की ऐवढं लहान मुल कसे काय व्यसनाधीन झाले? मी त्या मुलाला हाक देताच तो पळून गेला, जेव्हा मी तेथील लोकांशी ह्या समस्येवर बोललो तेव्हा ते म्हणाले, की येथे ही गोष्ट खूप सामान्य आहे, लहान मुले, आई-वडील, म्हातारी मंडळी अधिकांश लोक तंबाखूचे सेवन करतात. निर्व्यसनी लोकांना तंबाखूच्या वासानेसुद्धा चक्कर येते, मळमळ वाटू लागते, मग माहीत नाही ही लहान कोवळ्या शरीराची मुलेदेखील ह्या नशेच्या तावडीत कसे अडकतात, ही अतिशय गंभीर बाब आहे.

व्यसनासारखे अनेक समस्या आपल्या समाजात प्रचंड वेगाने वाढत आहेत, परंतु लोकांमध्ये जागरूकताच नाही. आपल्या समाजात दोन प्रकारचा लोकांचा वर्ग आहे ज्या अशा गंभीर समस्या चांगल्याप्रकारे समजतात. पहिला वर्ग त्या लोकांचा जे, समस्यांना ओळखूण, विश्लेषण आणि निष्कर्ष समजून दक्ष नागरिक म्हणून सामाजिक बांधिलकी पाळतात, लोकांना जागरूक करतात, समाजाची काळजी करतात, सामाजिक जबाबदारी चांगल्यापणे निभावतात आणि दुसरा वर्ग, जे या समस्येने ग्रस्त आहेत किंवा समस्येतून गेले आहेत त्यांना अशा समस्यांची जाण असते ते समजून घेतात. या व्यतिरिक्त सर्व लोक अशा समस्यांकडे दुर्लक्ष करतात, स्वतःच्या स्वार्थानुसार जगतात आणि म्हणतात की अशा समस्येशी माझा काय संबंध? आपले स्वतःचे जोपर्यंत नुकसान होत नाही, तोपर्यंत आपण जागरूक होत नाही. आपल्या समाजात हे खूप मोठे दुर्दैव आहे की अशा सामाजिक समस्यांना दूर करण्याची धाडसी वृत्ती फारच थोड्या लोकांमध्ये दिसून येते. जेव्हा की समाजातील अशा सर्व समस्यांना सोडवणे प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असते.

व्यसन करणाऱ्या लोकांद्वारे सिगरेट बिडीचा विषारी धूर जवळपासच्या वातावरणात पसरतो व त्या वातावणातील लोकांना देखील आजारी बनवतो. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये हजारो प्रकारचे जिवघेणे विषारी पदार्थ असतात. त्यात प्रामुख्याने निकोटीन, कार्बन मोनोऑक्साइड, टार असते. निकोटीन शरीरात, हाडे, स्नायूंमध्ये पसरते. कार्बन मोनोऑक्साइड रक्तामध्ये वाहून नेणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते. ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. टार हा बेंझोपायरिनयुक्त एक चिकट पदार्थ आहे जो घातक कर्करोगासाठी सहायक म्हणून काम करतो. इतर विषारी पदार्थांमध्ये कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रोज्नॉक्साईड, अमोनिया, वाष्पशील नायट्रोसामाइन, हायड्रोजन सायनाइड, वाष्पशील सल्फर, वाष्पशील हायड्रोकार्बन, अल्कोहोल, अल्डीहाइड्स आणि केटोन्स यांचा समावेश आहे आणि यातील काही संयुगे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे देखील कोरोना, क्षयरोग, स्वाइन फ्लू, एन्सेफलाइटिससारख्या अनेक संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते महत्त्वाची तथ्ये
तंबाखूमुळे त्याचे अर्धे वापरकर्ते जीव गमावतात. दरवर्षी तंबाखूमुळे ८० लाखांहून अधिक लोक मरतात. यापैकी ७० लाखांहून अधिक मृत्यू हे थेट तंबाखूच्या वापरामुळे होते, सुमारे १०-१२ लाख लोक स्वतः धूम्रपान न करणारे, पण दुसऱ्या व्यसनकर्त्याचा धूम्रपानाचा धुराची लागण होत असून मृत्यूमुखी पडतात, याला निष्क्रीय किंवा सेकंड हँड धूम्रपान म्हणतात. जवळजवळ अर्धी मुले सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या धुराद्वारे प्रदूषित हवेमध्ये श्वास घेतात आणि दरवर्षी या धुरामुळे होणाऱ्या आजारांमुळे ६५,००० लोकांचा मृत्यू होतो. जगातील १३० कोटी तंबाखू वापरणाऱ्यांपैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक लोक निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात राहतात. तंबाखू हा जगातील आतापर्यंतच्या सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्यास धोक्यापैकी एक आहे.

देशात तंबाखूबद्दल तथ्य
ग्लोबल एडल्ट टोबॅको सर्वे इंडिया-२, २०१६-१७ नुसार भारतात तंबाखूचे सेवन करणारे सुमारे २७ कोटी लोक (१५ वर्षांहून अधिक) आहेत. तंबाखू हा मृत्यू आणि आजार होण्याचे मुख्य कारण आहे आणि यामुळे दरवर्षी देशात सुमारे १३ लाख मृत्यू म्हणजेच दररोज सुमारे ३५०० मृत्यू होतात. देशातील कर्करोगाच्या जवळपास अर्ध्या घटना तंबाखूच्या वापरामुळे होतात. महाराष्ट्रात सध्या ६.०% पुरुष, १.४% महिला आणि ३.८% सर्व प्रौढ तंबाखूचे सेवन करतात. जागतिक आरोग्य संगटनेच्या म्हणण्यानुसार, १५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या २८.६ टक्के आणि १३ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे १५ टक्के मुलांनी २०१८ मध्ये भारतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन केले. दररोज १८ वर्षांखालील सुमारे २५०० मुले पहिली सिगारेट ओढतात आणि त्यातील ४०० हून अधिक नवीन मुले रोजचे धूम्रपान करणारे होतात आणि त्यापैकी अर्धे शेवटी स्वतःचा जीव गमावतात. द टोबॅको एटलसच्या मते, १० ते १४ वयोगटातील ६,२५,००० हून अधिक भारतीय मुले दररोज सिगारेट ओढतात. मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार, २०११ साली तंबाखूच्या सेवनाने होणारे सर्व रोग उपचार आणि मृत्यू यामुळे एकूण १,०४,५०० कोटी रुपये खर्च आला, जो भारतासारख्या विकसनशील देशासाठी मोठा ओझा आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तंबाखूचा ग्राहक आणि निर्यातदार देश आहे. भारतीय तंबाखूच्या विविधतेमुळे भारत जगातील १०० हून अधिक देशांमध्ये तंबाखूची निर्यात करतो आणि अब्जों रुपये महसूल प्राप्त करतो. तारी आणि असोचॅमच्या अहवालानुसार देशात एकूण तंबाखूचा आर्थिक व्यापार ११,७९,४९८ कोटी रुपये आहे.

तंबाखू संबंधित कायदेशीर प्रतिबंध
तंबाखूच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने विविध कायदे केले आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा भारत सरकारने मे २००३ मध्ये सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा या नावाने मंजूर केला. सर्व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींचे प्रचार आणि प्रायोजकतेवर बंदी आहे. अठरा वर्षांखालील व्यक्तीस तंबाखू विक्री प्रतिबंधित आहे. सर्व तंबाखूजन्य पदार्थांवर आरोग्य चेतावणीचे लेबल लावणे बंधनकारक आहे. तंबाखूच्या पॅकेटमध्ये परवानगी असलेल्या मर्यादेसह निकोटिन, टार सामग्री आणि निर्दिष्ट चेतावणी तंबाखूच्या पॅकेटवर ८५ टक्के भागात दर्शविली जावी. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ५ वर्षापर्यंत कारावास आणि १० हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे.

तंबाखू आतापासूनच सोडा
जगात सर्वाधिक तोंडाचा कर्करोगाचे रुग्ण भारतात आहेत. त्यापैकी ९० टक्के तोंडाचा कर्करोग तंबाखूच्या वापरामुळे होतो. देशात तंबाखूची विविध प्रकारची उत्पादने अतिशय कमी किंमतीत उपलब्ध आहेत. भारतीय लोकांमध्ये, विशेषत ग्रामीण भारतीयांमध्ये असे काही गैरसमज आहेत की तंबाखू हे धूम्रपान बिडी व सिगारेटपेक्षा कमी हानिकारक आहे आणि तंबाखूच्या वापरामुळे चिंता, शारीरिक दुखणे, सूजन, थकवा, पोटविकार आणि अशा छोट्यामोठ्या आजारावर आराम होतो. डिजिटल, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमांद्वारे समाजातून हे गैरसमज दूर करणे फार गरजेचे आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक पातळीवर शासन, प्रशासन, संस्था यांच्यामार्फत अनेक जागरूकता कार्यक्रम, तंबाखूच्या व्यसनमुक्तीसाठी आरोग्य अभियान राबविले जातात.

- डॉ. प्रितम भि. गेडाम
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com