शिस्तीचे धडे दिले तर निदान मृत्यू टाळता येतील

दैनिक गोमन्तक
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

सरकारी कार्यक्रमांवर मर्यादा नसल्यामुळे खासगी कार्यक्रमही बिनधोकपणे तेही विनामास्क , सोशल डिस्टन्सिंगविना उरकले जात आहेत, छायाचित्रे त्याचा पुरावाच आहेत.

ते माझे सहकारी आहेत म्हणून मास्क न घालता त्यांच्याशी बोलण्यास काही हरकत नसावी, ते माझे घनिष्ट मीत्र, मैत्रिणी आहेत त्यामुळे त्यांच्याशी मी मास्क न वापरता बोलू शकतो, ते आमचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्याशी मी मास्क न घालता बोलतो. थांबा, वरील तीन चुका करू नका, मास्क योग्यरित्या वापरा, स्वतःला आणि समाजालाही वाचवा?. अशी विनंती कोविड जलदगतीने का पसरत आहे या मथळ्याखाली मास्क वापरण्यासाठी  जागृती करणारा संदेश गोवा वैद्यकीय महाविद्यालय, इस्पितळाच्या (गोमेकाॅ) सामाजिक शिक्षण गटाकडून मिळाला.

फक्त तीनच नव्हे तर अशा अनेक चुकांतून कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत आहे. आपल्या गोव्यात रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी राज्य परत ग्रिन झोनमध्ये पोचले असे किंवा कोविड म्हणजे घाबरण्याचे कारण नाही, साधी सर्दी आहे असे गृहित धरून बिनधास्त मोकळेपणे वावरण्याचा, समुद्रकिनारी फिरण्याचा, विकएंडची मजा लुटण्याचा, विवाहसोहळे उरकण्याचे प्रयत्न राज्यात सुरू आहेत.,ज्येष्ठही त्यांत सहभागी होत आहेत हे कोणी नाकारेल का ? सरकारी कार्यक्रमांवर मर्यादा नसल्यामुळे खासगी कार्यक्रमही बिनधोकपणे तेही विनामास्क , सोशल डिस्टन्सिंगविना उरकले जात आहेत, छायाचित्रे त्याचा पुरावाच आहेत. शिस्तीने मास्क घालणाऱ्यांपेक्षा मास्क गळ्यांत अडकवणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

आमच्या वेबसाईटवरच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सरकारला त्याची जाणीव थोडी उशीरां का होईना झाली असावी अन्यथा मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाच्या रक्कमेत वाढ झाली असती का ? 
इतर राज्यांच्या तुलनेत दंडाची रक्कम गोव्यात फार कमी आहे, ती पाचशे रुपये झाली असती तर स्थानिकांनी भीतीने मास्कचा उपयोग योग्य प्रकारे केला असता. हजारो रुपये खर्च करून राज्यात सफरीवर येणाऱ्या पर्यटकांना पाचशे रुपये खर्च करणे कठीण नाही परंतु मास्क न वापरणाऱ्यांत स्थानिक मोठ्या प्रमाणात आहेत, राजकारणीही आहेत, समाजकारणीही आहेत, शिक्षकही आहेत, युवकही आहेत, युवतीही आहेत, पुरुष आणि महिलाही आहेत.

विधानसभा निव़डणुका जवळ आल्यामुळे सरकारला नागरिकांना दुखवणे जीवावर येते, प्रत्येक मत मोलाचे आहे पण बेशिस्तीचे काय? शिस्तीचे धडे दिले तर निदान मृत्यू टाळता येतील. 

वास्तवात दिवाळीत कडक निर्बंध हवे होते, बाजाराऐवजी आॅनलाईन खरेदीला उत्तेजन देणे आवश्यक होते, नरकासूरांवरील निर्बधांचे बाजूलाच राहीले उलट कोरोनाच्या पहिल्या लहरीवेळी टाळेबंदी लागू झाल्यानंतर जे कसिनो कसेबसे बंद झाले होते तेही पुन्हा सुरू आहेत. मार्केटमध्ये थोडी मोकळी हवा खेळते पण कसिनोतील जुगार खेळण्याच्या ठिकाणीच नव्हे तर धक्क्यांवरही जी गर्दी होते ते पाहाता कसिनो कोरोनाचे मुख्य वाहक होऊ शकतात असा इशारा डाॅक्टरांनी मार्च महिन्यात टाळेबंदीआधी दिला होता त्याची पुन्हा आठवण सरकारला कोण करून देणार ? कसिनोत कोरोनाचे आक्रमण कधीच सुरू झाले आहे, कसिनोतील कामगारवर्ग कोरोनाला बळी पडू नये म्हणून काळजी घेतली गेलेली नाही याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. कामगारवर्गासाठी विशेष केअर सेंटर्स सुरू झाली आहेत का? कसिनोवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोग अस्तित्वात आहे का ? अशा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. कसिनो धक्क्यांजवळील रस्त्यांवर कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याचा एक प्रकार उघडकीस आला ते पाहाता भविष्यात टोळीयुद्धे भर रस्त्यात होणार नाहीत ना ? गोव्याच्या राजधानीला व्यसनाच्या शहराचा दर्जा बहाल केला जाणार नाही ना ? अशा भीतीचे सावट राजधानीवासियांवर असल्यास आश्चर्य नको. निवडून आल्यास कसिनो राजधानीतून हटवले जातील असे सांगणारे आमदार आतानासियो उर्फ बाबुश मोन्सेरात मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जाणार आहेत ? भाजपतील त्यांचे विरोधक याच मुद्याचे भांडवल करून त्यांना तोंडघशी पाडणार नाहीत ना? 
निवडणुकांसाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसल्यामुळे विरोधक सावध झाले आहेत, सरकारविरोधात मोहीम जोर धरत आहे. इतर विषयांबरोबर महत्त्वाचा न संपलेला कोरोना विरोधकांसाठी खुबीने प्रचाराचा बिन्नीचा मुद्दा होऊ शकतो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी गर्दी टाळा, मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे सातत्याने सांगत आहेत. राज्याराज्यांतील कोरोनाचा आढावा बैठकीत हल्लीच त्यांनी गर्दी टाळण्याच्या विषयाला प्रामुख्याने स्पर्श केला. काळजी घेतली असल्याचे दावे मुख्यमंत्र्यांनी केले तरी ठोस उपाययोजनांअभावी पर्यटनाला दिलेले प्रोत्साहन, सुरु झालेले कसिनो , णववी ते बारावीचे वर्ग कोरोनाला आमंत्रण ठरणार नाहीत ना ? दिवाळीतच बरीच कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या संथगतीने का होईना वाढते आहे, कोरोनातून बाहेर येणाऱ्या रुग्णांपेक्षा कोविड + चे रुग्ण डोके वर काढत आहेत या वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

आमच्या वेबसाईटवरच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

पंतप्रधांनानी चाचण्या वाढवण्यांबरोबरच मृत्यू दर १ टक्के नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याचे आदेशही दिले आहेत. प्राधान्यक्रमाने जागृतीवर भर देण्याकडे त्यांचा कल आहे. जिल्हा, पालिका यंत्रणांना जागृतीत ओढण्याचे त्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे काम आत्मनिर्भर, स्वावलंबचे धडे देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनाच करावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. जिल्हा व नगरपालिकांच्या निवडणुका न झाल्यामुळे दोन्ही यंत्रणांवर प्रशासकीय राजवट आहे व ती नक्कीच लोकसंपर्कात तोकडी पडू शकते. टाळेबंदीच्या कालावधीत सगळे नसले तरी कांही नगरसेवकांनी जी कामगिरी केली ती विचारात घेता नगरसेवकांविना जनसंपर्क प्रसंगी प्रभावी राहील का याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. हिंवाळ्यातील पानगळीमुळे वाढणारा कचरा आधीच त्रस्त झालेल्या कचरा व्यवस्थापन यंत्रणेची डोकेदुखी न ठरो. 
 

संबंधित बातम्या