Yograj Naik: गोव्यातील वेस्टर्न संगीतकारांना घेऊन फ्यूजन कार्यक्रम केले

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 10 मे 2021

गोव्यातील वेस्टर्न संगीतकारांना घेऊन नावीन्यपूर्ण असे फ्यूजन कार्यक्रम योगराजने सादर केले. गायन आणि वादन अशा दोन्ही क्षेत्रात त्यांचे नव-नवीन प्रयोग चालू होते. मध्यंतरी त्यांनी गोव्यात होणाऱ्या संमेलनाचे समीक्षणही केलं. 

18 एप्रिल 2021 रोजी योगराजचा(Yograj Naik) मेसेज आला, की त्याला आणि घरच्या सगळ्यांना कोविडचा संसर्ग(Corona) झाला आहे. त्याचबरोबर त्याच्‍या आईलासुद्धा संसर्ग झाला,  असा त्याचा एक मेसेज होता. ज्यामुळे तो थोडा चिंतित होता. त्यानंतर मी त्याला डॉक्टरला संपर्क करून घरीच औषधोपचार करायला सांगितले. त्याचबरोबर वाफ घेणे, गुळण्या करणे, श्र्वासाचे व्यायाम करणे, हे सामान्य सल्ले दिले. ज्याच्यावर त्यांनी हे सगळं सुरू केले असे सांगितले. 20 एप्रिल 2021 रोजी परत मी चौकशी करण्यासाठी मेसेज केला, तर, योगराजचा रिप्लाय आला, की त्याला इस्पितळात दाखल केले आहे. जे वाचून मला थोडी चिंता वाटली व काही मदत लागल्यास सांग, असे मी त्याला म्हटले. एखाद दुसऱ्या डॉक्टरला विचारू का, असेही मी त्याला विचारले, ज्यावर त्यांनी काही गरज नाही, सगळी औषधे व्यवस्थित चालू आहे, असे लिहिले.(Yograj Naik performed a fusion program with Western musicians from Goa)

पुन्हा 22 एप्रिलला मी विचारपूस करायला परत मेसेज केला तेव्हा, त्याचा रिप्लाय आला नाही. पण मनात जरा धाकधूक असल्यामुळे मी योगराजच्या बहिणीला म्हणजेच, पूनमला फोन केला. तेव्हा योगराज ऑक्सिजनवर आहे व प्रकृती सुधारत आहे, असे तिने सांगितले. त्यानंतर एकदा पूनमशी मेसेजद्वारे खबर घेतली. आणि अचानक, 29 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी पूनमचा फोन आला आणि तिच्या रडण्याचा आवाज ऐकून छातीत धस्स् झालं व योगराज गेल्याची दुःखदायक बातमी कळली. मन सुन्न झालं व काय बोलावं तेच कळेना. काही क्षण ही बातमी खरी आहे हेच पटेना. भराभर समाजमाध्यमावर बातमी झळकायला लागली. RIP, भावपूर्ण श्रद्धांजली, सतार पोरकी झाली, असे मेसेजेस यायला लागले व डोकंच काम करेनासं झालं. काय बोलावं, काय लिहावं काहीच कळेनासं झालं. भावपूर्ण श्रध्दांजली हे लिहायला मन धजत नव्हतं. एवढ्या वर्षांचा सहवास असलेला माणूस अचानक नाहीसा होतो तेव्हा ते पटायला आणि पचायला कठीण जातं.

विदेशी पर्यटकांचा पत्ताच नाही; गोव्यातील व्यावसायिकांचे मोडले कंबरडे 

गोमंतकात जिथे गायन कला प्रसिद्ध आहे आणि जिथे तबला, संवादिनी वाद्ये प्रचलित आहेत, तिथे योगराजने सतार हाती घेण्याचं धाडस केलं व त्यात प्राविण्यही मिळवलं. कला अकादमीत सितार शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर गोव्यात खऱ्या अर्थाने सितार कला योगराजनेच रुजवली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. गोव्यात बऱ्याच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय कार्यक्रमात योगराजची सितार बहरू लागली. तरीही सुरूवातीच्या काळात फक्त कलेवर उदरनिर्वाह करणे हे खूप अवघड काम असते. आणि तसेच काही अंशी योगराजच्या बाबतीत घडले. पण थोड्या अवधीनंतर योगराजला आकाशवाणीत कायमस्वरूपी नोकरी मिळाली आणि तीही सितार कलाकार म्हणून व योगराजच्या सितार शिक्षणाचे व साधनेचे चीज झाले. आकाशवाणीची नोकरी सांभाळतानाच त्याची आतली प्रतिभा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणूनच अनेक मराठी-कोकणी गाणी त्यांनी रचली, अनेक कार्यक्रम प्रस्तुत केले, स्वतंत्र सतार वादनाच्या मैफिली सादर केल्या.

गोव्यातील वेस्टर्न संगीतकारांना घेऊन नावीन्यपूर्ण असे फ्यूजन कार्यक्रम सादर केले. सतत नवीन संकल्पना सादर करण्यात त्याला आव्हानात्मक वाटत असे आणि त्यातूनच त्याला खरा आनंद मिळत असे. गायन आणि वादन अशा दोन्ही क्षेत्रात त्यांचे नव-नवीन प्रयोग चालू होते. देशभर स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम सादर करून अनेक कलाकारांशी त्यांची मैत्री जमली होती. सितार-बासरी, सतार-गायन, सितार-संतूर, असे जुगलबंदीचे कार्यक्रमही त्यानी सादर केले. मध्यंतरी त्यांनी गोव्यात होणाऱ्या संमेलनाचे समीक्षणही केलं. हे लिखाण अत्यंत रोख-ठोक व वाचनीय असायचं. अशाच एका संमेलनाला पं. यशवंतबुवा जोशी यांच्या गायनाची स्तुती करणारा योगराजचा सुंदर लेख अजूनही माझ्या स्मरणात आहे. खोटी स्तुती करणे किंवा एखाद्याला बरं वाटावं म्हणून त्याची स्तुती करणे हे त्याला कधीच जमलं नाही. त्याचबरोबर चांगल्या कलेची किंवा चांगल्या सादरीकरणाची तारीफ करायला तो मागे पुढे बघत नसे. मला आठवते, सुरेश वाडकरजींने गायलेलं पिंपळपान हे मराठी शीर्षक गीत त्याला खूप आवडलं होतं व त्याने मला फोन करून त्याबद्दल चर्चाही केली होती.

कळंगुट, बागा समुद्रकिनारे बनताहेत धोकादायक 

बऱ्याचदा आमची शास्त्रीय संगीतावरही चर्चा व्हायची. मला आठवतं, योगराजने मला एकदा आवर्जून सांगितलं होतं की इतर रागांबरोबरच कामोद, झिंझोटी, छायानट, असे रागही तयार कर. त्याने दिलेल्या संगीत चालीही या हटके असायच्या. त्यात काहीतरी वेगळेपण असायचं. योगराज आणि मी मिळून बरेच कार्यक्रम आयोजित केले होते. संगीतम्‌ या नावाचा शास्त्रीय संगीताचा एक राष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम आम्ही सुरू केला होता, जो दुर्दैवाने पुढे बंद पडला. त्याचबरोबर रीयाज-ए-मेहफिल या नावाचा एक मासिक संगीत कार्यक्रम सुरू  केला जो बरीच वर्षे चालला.

त्याच्या सडेतोड वृत्तीमुळे काहीजणांचा रोषही त्याने पत्करला होता. सरकारी अधिकारी व एकूण व्यवस्थेशी त्याचं फारसं जुळत नव्हतं. त्यामुळे बऱ्याचदा अलिप्त राहणे तो पसंत करत होता. एखाद्या जवळच्या मित्राशी भांडण झालं की बरेच दिवस अबोला धरून एकटेपणाचं जीवन जगण्याचा मार्ग तो स्वीकारत होता. गेली 3 वर्षे मुंबई आकाशवाणीत त्याची बदली झाल्यामुळे तो बराच नाराज होता. मी त्याला या संधीचा फायदा घेऊन, नोकरी करता करता मुंबईत कार्यक्रम कर व आपल्या कलेला बहर आण असं सांगत होतो परंतु, काही केल्या त्याचं मन तिथे रमत नव्हतं. मुंबईला येणं-जाणं आणि आपल्या मित्रांच्या संपर्कात राहणं असंच काहीसं त्याचं हल्ली चाललं होतं. कलाकारांची जीवन शैली ही जरा हटकेच असते. बऱ्याचदा शरीर स्वास्थ्य सांभाळणे किंवा शरीराची काळजी घेणे हे त्यांना जमत नसते किंवा त्याकडे ते काना डोळा करत असतात. कलेची साधना करता करता व त्या धुंदीत जगताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि योगराजही त्याला अपवाद नव्हता.

कोविडच्या या महामारीने हाहाकार माजविलेला आहे. अनेक माणसं मरत आहेत. बरेच व्यवहार ठप्प झालेले आहेत. कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांची हालत खूपच खराब आहे. कोविडमुळे बऱ्याच कलाकारांना आम्ही मुकलो आहोत. हा रोग एवढा भयंकर आहे की त्या मृत कलाकाराचं अंत्यदर्शनही आम्ही घेऊ शकत नाही. कोविडमुळे एकमेकांना भेटू शकत नाही, कुटुंबीयांचं सांत्वनही करू शकत नाही. कर्त्या वयात आणि अवेळी योगराज आम्हा सर्वांना सोडून गेल्याचं दुःख पचविण्या पलीकडे आहे. त्याच्यास्मृतीजागवत पुढचं जीवन जगायचं आहे. त्याला सद्गती लाभो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना.

-डॉ. प्रवीण गावकर

संबंधित बातम्या