#GoaLiberationDay: गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी जिवंतपणीच मरण भोगलेला तरूण क्रांतिकारक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 डिसेंबर 2020

मुक्ति संग्रामासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेले काही असेही लोक आहेत. ज्यांचे कार्य न विसरता येणारे आहे. यापैकीच एक आहेत पुण्यातील हेमंत महाजन. 

बी मयुर

आज गोव्याचा ६०वा मुक्तिसंग्राम दिन. गोवा आज जेष्ठ झाले. मात्र, याच गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. गोव्यासहित सबंध भारतातील हुतात्म्यांनी गोव्यातून पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले.  गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी समाजवादी नेते राम मनोहर लोहियांनी केलेले प्रयत्न आजही लोकांच्या स्मृतीत आहेत. याबरोबरच मधू लिमये यांनी भोगलेला तुरूंगवास, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी संघाची ताकद उभी करण्यासाठी घेतलेली मेहनत, यापैकी काहीही न विसरता न येणारे आहे. आझाद गोमन्तक दलाच्या क्रांतिकारी कारवायांचे किस्से तर आजही अनेकांच्या चर्चेचा विषय असतो. मात्र, या मुक्ति संग्रामासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेले काही असेही लोक आहेत. ज्यांचे कार्य न विसरता येणारे आहे. यापैकीच एक आहेत पुण्यातील हेमंत महाजन. 
 
 तरूणावस्थेत असलेल्या हेमंत महाजन यांच्या डोक्यात राष्ट्रवादाची झिंग चढलेली होती. आणि पुण्यात गोव्याच्या मोहिमा आखल्या जात होत्या. हेमंत सर्व सोडून कधी एकदा त्या मोहिना फत्ते करण्यासाठी निघाले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. पुण्यात शिक्षण घेत असताना स्वातंत्र्य चळवळीतील अनेक रंजक कथा कानी पडल्यानंतर आपल्यालाही असे धाडसी कृत्य करायला मिळावे यासाठी त्यांनी थेट गोवा गाठले. त्यांनी गोव्यात  आल्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या योजनांच्या आखणीला सुरूवात केली. त्यात पहिलेच काम एवढे धाडसी होते की यानंतर त्यांना जिवंतपणीच मरण झेलावे लागले. 

हेमंत यांनी पणजीतील पोर्तुगीजांच्या पोलिस मुख्यालयाचा ध्वज खाली उतरवण्यासाठी खांबावर झेप घेतली. पोर्तुगीजांचा ध्वज उतरवल्यानंतर ते सुद्धा खाली कोसळले. यानंतर तेथे गर्दी जमली. पोर्तुगीजांनी खाली झोपलेल्या अवस्थेत असलेल्या हेमंत यांच्या हातून आपला ध्वज परत घेतला.  मात्र, त्यानंतर हेमंत यांच्याबाबतीत कोणतीही वार्ता बाहेर आली नाही. सर्वांना वाटले की या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. पुण्यातील शनिवारवाड्यात त्याकाळात पेशवे राहत होते. तेथे त्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. हा सर्व वृत्तांत गोव्याला स्वतंत्र होण्याच्या काही महिन्यांच्या आधीचा आहे. गोवा १९ डिसेंबरला स्वतंत्र झाले आणि  स्वतंत्रता आंदोलनात कैदीत असलेल्या आंदोलकांनाही मुक्त करण्यात आले. यात हेमंत यांचाही समावेश होता. हेमंत जेव्हा मुक्त होऊन पुण्याला आले तेव्हा काही दिवसांपूर्वीच त्यांच्या श्रद्धांजली सभेला असलेली माणसे अवाक झाली. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.  

हेमंत महाजन यांचे स्वातंत्र्यासाठी चित्तथरारक गोष्टी करून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांपेक्षा काही कमी काम नव्हते. केवळ मातृभूमीला स्वतंत्र करता यावे यासाठी जीवंतपणीच मरण झेललेल्या या वीरांमुळेच आज केवळ गोवाच नव्हे तर सबंध भारतभूमी ताठ मानेने उभी आहे. 
       
    

 

संबंधित बातम्या