बोल्ड इज ब्युटिफुल

ttttttttt
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

टीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते.

टीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन लोकप्रिय होण्याचं महत्त्वाचं कारण अनेकदा जुन्या-नव्याचं फ्युजन हे असतं. यातील सध्याची एक फॅशन आहे ती म्हणजे टेराकोटा ज्वेलरीची. मालिकांबरोबर सिनेमातही ही फॅशन दिसली. बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर, सोनम कपूर, विद्या बालन, कोंकणा सेन यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ही ज्वेलरी वापरली आहे. मातीपासून तयार केलेल्या या ज्वेलरीचे डिझाइन्स बोल्ड असतात, त्यामुळे "बोल्ड इज ब्युटिफुल‘ असा ज्यांचा फॅशन फंडा आहे, त्यांच्यासाठी ही ज्वेलरी परफेक्‍ट आहे. 

टेराकोटा मातीला चिकटपणा जास्त असल्याने त्याला तडे जात नाहीत, त्यामुळे यापासून दागिने बनवले जातात. हे सर्व दागिने हॅंडमेड असतात. या दागिन्यांना मोठी परंपरा आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो काळातही अशा प्रकारची टेराकोटा ज्वेलरी होती, हे त्या काळातल्या अवशेषांवरून दिसून येते. तसेच दक्षिण भारत किंवा बंगालमध्येही टेराकोटाचे दागिने वापरण्याची परंपरा आहे. आता काळानुरूप अनेक नवीन डिझाईन्स या प्रकारात आल्या आहेत. 

ट्रॅडिशनल, कंटेपररी, कॅज्युअल अशा अनेक डिझाईन्स टेराकोटामध्ये आता बघायला मिळतात. शिवाय सगळी कलरफुल व्हरायटी असल्याने अगदी लेटेस्ट पलाझोपासून साडीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर हे दागिने उठून दिसतात. 

इअरिंग्ज 

झुब्यांचे आणि इअरिंग्जचे विविध प्रकार, स्टड्‌स, टॉप्स असे प्रकार विविध धातूंमध्ये असतात तसे टेराकोटामध्येही बघायला मिळतात. ज्यामध्ये भरपूर डिझाईन्सची चलती आहे. 

पेंडंट सेट 

कॅज्युअल, ट्रॅडिशनल, सिग्नेचर ज्वेलरी या सर्व प्रकारांमध्ये टेराकोटापासून तयार केलेले पेंडंट सेट उपलब्ध आहेत. जिन्स, स्कर्ट्‌स, रॅपअराउंड बरोबर साडी, लेहेंगा आणि कुर्तीजवर घालता येतील असे आपल्या आवडीप्रमाणे टेराकोटाचे पेंडंट सेट लेटेस्ट फॅशन म्हणून निवडता येतील. 

नेकलेस सेट 

सध्या अगदी सोन्याच्या नेकलेसच्या तोडीच्या डिझाईन्स टेराकोटा नेकलेसममध्ये पाहायला मिळतात. चोकर्स, गळ्यालगतचे नेकलेस किंवा तीन पदरी बोरमाळ, ठुशी, टेराकोटामध्ये तयार केलेली पुतळ्याची माळ असे पारंपरिक प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत. अँटिक ज्वेलरीमध्येही बरेच प्रकार आहेत. शिवाय टेराकोटा आणि सिल्क थ्रेड यापासून तयार केलेली फ्जुजन ज्वेलरीही सध्याच्या फॅशनच्या दुनियेत वरचढ आहे. यावर कधी-कधी वारली, मधुबनी पेंटिंगची कलाकारी केली जाते, जी दागिन्यांना अधिक देखणेपण आणते. 

 

टेंपल ज्वेलरी 

सध्या टेंपल ज्वेलरीची फॅशन आहे. मोठ्या कार्यक्रमात फेस्टिव्ह कपड्यांसोबत या प्रकारची ज्वेलरी उठून दिसते. टेराकोटामध्ये केलेले टेंपल कलेक्‍शनही ब्रायडल फॅशनमध्ये इन आहे. पैठणीवरचा मोर जसा पैठणीचा बाज दाखवतो तसा या ज्वेलरीमध्येही मोराच्या डिझाईनमध्ये विशेष पसंती आहे. गळ्यातले, कानातले, बिंदी, साडीपीन, अंगठी, अँकलेट्‌स असा पूर्ण ब्रायडल सेटही टेराकोटामध्ये कस्टमाईज्ड बनवून मिळतो.

 

बांगड्या

बांगड्यांमध्ये मोठी कडी, ब्रेसलेस्ट यात बघायला मिळतात. रंगिबेरंगी असल्याने ही कडी किंवा ब्रेसलेट्स जिन्स, स्कर्ट्स, पलाझो याबरोबर साडीवरही छान दिसतात. सध्या कुटची वर्कची फॅशन आहे. या वर्कमधील ब्लाउज, साडीचे काठ, जॅकेट्स आपल्याला बघायला मिळतात त्याबरोबर या बांगड्या मस्त दिसतात.  

व्यक्तिमत्त्वाला आणि कपड्यांना साजेशा रंगांच्या आवडीप्रमाणे टेराकोटाचे डिझाईन्स निवडता येतील. दागिन्यांचा हा प्रकार बजेटमध्येही उपलब्ध होतो. वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्‌सवर याची खरेदी करण्याची सुविधा आहे. 

अनेकदा एखादी गोष्ट स्वतः करून वापरण्यातला आनंद अधिक असतो. तो आनंद या ज्वेलरीबाबत नक्कीच घेता येतो. ज्वेलरी बनविण्याची आवड असेल तर टेराकोटा ज्वेलरी बनविण्याच्या कार्यशाळाही पुण्या-मुंबईत असतात. माती आणि ज्वेलरी बनविण्यासाठी लागणारे साहित्यही संबंधित आयोजकांकडे उपलब्ध असते किंवा हे साहित्य देणारे काही ऑनलाईन विक्रेतेही आहेत, त्यामुळे तुमच्या कल्पकतेप्रमाणे घरच्या घरीही हे दागिने बनविणे सहज शक्‍य आहे. 

 

संबंधित बातम्या