शाल्मलीची कोडी विद्यार्थिनींनी उलगडली

डॉ. नंदकुमार कामत
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

सुसाट वारा सुटणाऱ्या पठारांवरच्या वनस्पतींची काही वैशिष्ट्ये असतात.त्यांना मातीत खोलवर गाडून घ्यावे लागते.पावसाळा संपता संपता एक चमत्कार घडतो.शाल्मलीची संथ पानगळ सुरू होते.कधीकधी निवांत वातावरणात या पानगळीचा आवाजही ऐकू येतो.जुने वस्त्र टाकून द्यावे त्याप्रमाणे शाल्मली तुटक्या फांद्यांचा त्याग करते.नखशिखांत पर्णहीन, नागडी-उघडी, बोडकी शाल्मली पाहवत नाही.क्षणभर वाटते, अरे हे झाड मरणार की काय? पण छे, असे झडून जाणे, बोडके होणे शाल्मलीच्या जीवनचक्राचा अनिवार्य भाग आहे.

थरार संशोधनाचा: गोवा कोकणपट्टीत ‘बाँबॅक्स सिएबा’ या काटेरी वृक्षाला ‘सावर’ म्हटले जाते. पण प्राचीन नाव आहे - ‘शाल्मली’. संस्कृत अभिजात साहित्यात शाल्मलीद्वीपाचा उल्लेख येतो. ते बहुतेक गोवा बेटच असेल कारण तिसवाडीच्या पठारावर शेकडो सावरी आहेत. या लेखात सर्वत्र सावरीचा उल्लेख ‘शाल्मली’ असाच होईल कारण पूर्ण लेख शाल्मलीवृक्षविज्ञानावर आहे. गेली २० वर्षे आमच्या वनस्पतीशास्त्र विभागात शाल्मलीवर संशोधन चालू आहे. गोव्याच्या पारंपरिक समईचा फांद्यांसारखा आकार शाल्मलीच्या स्कंधरचनेवरून घेतला असावा. हा वृक्ष एखाद्या तपःपूत योगिनीप्रमाणे दिसतो.जुन्या गोव्याहून दोनापावलापर्यंत विस्तीर्ण पठारी भाग येतो. या पठारावरील शाल्मली वृक्ष उठून दिसतात. आमच्या गोवा विद्यापीठ संकुलात त्यांचे प्राबल्य असल्याने या वृक्षाबद्दल आम्हाला प्रचंड औत्सुक्य होते.

पावसाळा सुरू होता होता गच्च भरदार हिरवी पालवी फुटायची. एखाददुसऱ्या फांदीवर ओला कापूस लोंबकळताना दिसायचा. संपूर्ण पावसाळ्यात वेगवान वाऱ्याला तोंड देणारे हे वृक्ष कधीच आडवे झाल्याचे दिसले नाही. ते स्वाभिमानाने इतके ताठ व राठ उभे असत की त्यांची मुळे किती खोल गेली असावीत याचा अंदाज येईना. सुसाट वारा सुटणाऱ्या पठारांवरच्या वनस्पतींची काही वैशिष्ट्ये असतात. त्यांना मातीत खोलवर गाडून घ्यावे लागते. पावसाळा संपता संपता एक चमत्कार घडतो. शाल्मलीची संथ पानगळ सुरू होते. कधीकधी निवांत वातावरणात या पानगळीचा आवाजही ऐकू येतो. जुने वस्त्र टाकून द्यावे त्याप्रमाणे शाल्मली तुटक्या फांद्यांचा त्याग करते. नखशिखांत पर्णहीन, नागडी-उघडी, बोडकी शाल्मली पाहवत नाही. क्षणभर वाटते, अरे हे झाड मरणार की काय? पण छे, असे झडून जाणे, बोडके होणे शाल्मलीच्या जीवनचक्राचा अनिवार्य भाग आहे. पर्णहीन, बोडकी होणारी शाल्मली चक्क पुढच्या पावसाळ्यापर्यंत कशी काय चिवटपणे तग धरून राहते? जवळजवळ सहा महिने? कारण क्लोरोफिल अथवा हरितद्रव्ययुक्त पाने नसली की कुठच्याही वनस्पतीला अन्नसंचय करता येत नाही. मग कुठच्या जोरावर शाल्मली हे सहा महिने गुजराण करते? अशा निष्पर्ण शाल्मलीवर मग एक दिवस हिरवे कळे दिसू लागतात. काही दिवसात लालबुंद फुले उमलतात. वातावरणात आश्‍चर्यकारक बदल होतात. कुठून तरी पाखराची भिरी येतात.

हे सर्व मधावर जीविका करणारे पक्षी. पर्णहीन शाल्मली पक्षीहीन तर पुष्पयुक्त शाल्मली पक्षीयुक्त असा नेत्रलुब्ध फरक दिसतो. तर या शाल्मलीच्या पुष्पसंभाराची काय कोडी असावीत? इतका पालापाचोळा या वृक्षांखाली साठतो, त्याचे काय होतेय? उंच व रुंद होत जाणाऱ्या शाल्मली आपल्या खोडावरील काटेरी चिलखताचा त्याग हळूहळू का करतात? वर्षोनवर्षे शाल्मलीचा वाळका पालापाचोळा भुगा भुगा होऊन मातीत एकजीव होतो. त्याचे पुढे काय होते? परागसिंचनानंतर पाकळ्या झडून हिरव्या शेंगा तयार होतात. त्या जांभळ्या होत जात शेवटी घट्ट, काळसर, टणक बनतात. आतमध्ये बियांना लगडणारा हिमशुभ्र कापूस असतो. या बिया व कापसाचे गुणधर्म काय? बिया जमिनीवर पडल्यावर असंख्य लाल किडे अवतरतात. वर्षभर ते कोठे असतात बरे? आमच्या सभोवतालच्या छोट्या मोठ्या शाल्मली आम्हाला खुणावत असत. या आमची कोडी सोडवा. अशा संशोधनाचा थरार मोठा विलक्षण असतो.

मे २००४ मध्ये मूळ काना - बाणावलीच्या व सध्या दुबईमधे वास्तव्य असलेल्या निकीता डिसिल्वाने शाल्मलीच्या फुलांवर संशोधन सुरू केले. एक फूल १५ मिलिलिटर्स मध तयार करीत असल्याचे तिला आढळले. या मधात मग तिला वैशिष्ट्यपूर्ण यीस्ट मिळाले. हे यीस्ट असायचे कारण मधातील ग्लुकोज नावाची शर्करा. हिरव्या कळ्या हवाबंद, सीलबंद असताना शाल्मलीच्या मधात यीस्ट कोठून येत असावेत त्याचा उलगडा होत नव्हता. जवळजवळ सूक्ष्मजंतूंचे शेवटचे आश्रयस्थान मातीच असते. पूर्ण डवरलेल्या शाल्मलीच्या फांद्यांवर बराच वेळ पक्षी बसून असल्याचे आमचे निरीक्षण होते. काही अंतराने मग पक्षी चोची खुपसून फुलांची चाचपणी करत. यात कावळे व मैना आघाडीवर असायच्या. निकिताच्या लक्षात आले की १५ एमएल मध काही पुष्पचषकात एकाचवेळी पाझरत नाही. त्यासाठी मधुग्रंथी उत्तेजित करावी लागते व पुन्हा पुन्हा चोच खुपसून पक्षी हा उपद्‌व्याप अभावितपणे करतात. मग निकिताने ताजी फुले काढून आणली. प्रयोगशाळेत पक्षाच्या चोचीसारखे एक उपकरण तयार केले व मध निर्मितीचा अंदाज घेतला. मग थेट नेक्टरी म्हणजे मधुग्रंथीचा छेद घेऊन स्टीरीओ मायक्रोस्कोपखाली तपासल्यावर अतिसूक्ष्म छिद्रांतून थेंब थेंब मध पाझरत असल्याचे दिसून आले. या छिद्रांना जरा झटका दिल्यावर थेंब थेंब मध बाहेर येई. सगळे निष्कर्ष तपासल्यावर शाल्मलीची जैविक हुशारी आमच्या लक्षात आली. कुठच्याही पक्षाला सहजासहजी मधाचे बक्षीस मिळत नव्हते. अनेकवेळा त्यांना चोच खुपसावी लागे. अनेकवेळा का? तर प्रत्येकवेळी जादा परागकण त्यांच्या चोचीला चिकटावेत म्हणून. निकिताने काही कोडी सोडविली.

पण फलन झाल्यावर शेंगा तयार होण्यापूर्वी स्त्रीपिंड निर्जंतुक असतो का याबद्दल आम्हाला उत्सुकता होती, कारण आसमंतात हल्ला करण्यासाठी अनेक सूक्ष्मजीव टपून बसलेले असायचे. या उपद्रवी सूक्ष्मजिवांपासून व जैविक रोगांपासून शाल्मली आल्या बीजांचे कसे रक्षण करते ते पाहण्यासाठी बस्तोडेच्या श्‍वेता सौदागरने संशोधन केले. तिला महत्प्रयासाने ओव्हरी (स्त्रीबीजांड) मधे यीस्ट मिळाले. या यीस्टमधे तिला जंतुनाशक गुणधर्म आढळले. म्हणजे हे यीस्ट बाळगून शाल्मली आपले बीजभांडार सुरक्षित ठेवत असे. आणखी एक कोडे सुटले.तेजा गावडे ही विद्यार्थिनी काटेरी वनस्पती व त्यांच्या अणकुचीदार काट्यामध्ये सूक्ष्मजंतू असावेत का याचा शोध घेत असताना शाल्मलीच्या घट्ट, टणक, टोकदार काट्यामध्ये तिला सूक्ष्मजीव आढळले. ते सजीवांना व विशेषतः सस्तन प्राण्यांना हानिकारक होते. म्हणजे शाल्मलीचे काटे वरकरणी दिसतात तसे फक्त टोकदार नसून त्यांच्या पोटात ही जैविक हत्यारे इजा करण्यासाठी लपलेली असायची. हा एक नवा शोध होता.अंजुम सडेकर व श्‍वेता कांबळी या विद्यार्थिनीना शाल्मलीच्या पाचोळ्यावर संशोधन करायला सांगितले होते. शाल्मलीच्या पानांमधे अंजुमला फायटोलिथ म्हणजे वाळूचे सूक्ष्म कण व सिडेरोलिथ म्हणजे विविध व विचित्र आकाराचे चुंबकीय लोहकण सापडले. या कणांमुळे शाल्मलीच्या फांद्या व खोडे टणक होत असावीत. शाल्मलीचे आणखी एक चकीत करणारे रहस्य आम्हाला सापडले.

‘प्लुरोटस’ या भूछत्रांच्या कुटुंबातील सात जाती तंतुमय स्वरूपात शाल्मलीच्या जिवंत फांद्यामध्ये दडलेल्या असायच्या. त्यांना जिवंत राहण्यासाठी फार थोडे अन्न लागे. अशा तंतुयुक्त अवस्थेला बुरशी असली तर ‘फंगल एंडोफायटस’ म्हटले जाते. ‘प्लुरोटस’ भूछत्रे शाल्मलीचे मित्र आहेत. कारण फांद्या जीर्ण होऊन कोसळल्यावर पावसाळ्यात या फांद्यांवर ही गुलाबी किंवा सफेद, कालवाच्या शिंपल्याच्या आकाराची भूछत्रे उगवलेली दिसतात. खुशबु खातून या इंदिरानगर, चिंबलमधे रहाणाऱ्या विद्यार्थिनीला शाल्मलीच्या ओल्या फांदीवर एक भूछत्र सापडले. त्यातून तिने शुध्द बुरशी मिळवली. ही बुरशी नेमॅटोडस हे उपद्रवी कृमी खात असल्याचे तिने आपल्या संशोधनातून दाखवून दिले. अशा बुरशीचा सेंद्रिय शेतीत झाडांची मुळे खाऊन टाकणाऱ्या कृमींचा बंदोबस्त करण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. सोनाशिया व्हेलो पेरेरा ही डॉक्टरेटसाठी संशोधन करत होती. पीएचडी मिळाल्यावर लंडनला स्थायिक होऊन ती ग्लॅक्सोज स्थिमक्लाईनमधे वैज्ञानिक म्हणून नोकरी करते. तिने शाल्मली वृक्षांच्या मुळांजवळच्या मातीतून एंझायम्स व जंतुनाशके तयार करणारे ॲक्टीनोबॅक्टेरिया मिळवले. नंतर श्‍वेता कांबळीला सेल्युलोज खाऊन टाकणारी बुरशी मिळाली. सर्वात विस्तृत संशोधन जवळजवळ वर्षभर वास्कोच्या प्रियांका चोडणकरने केले. तिने शाल्मलीच्या पुष्पसंभाराचे रहस्य शोधून काढले. शाल्मलीच्या प्रत्येक फुलात तिला ७२० ते ८६४ मिलीग्रॅम ग्लुकोज आढळली. प्रत्येक शेंगेत १०-१२ ग्रॅम कापूस तयार होत असल्याचे आढळले. आजवर जगात शाल्मलीच्या फुटबॉलएवढ्या कंदमुळांचा अभ्यास कुणी केला नव्हता. विद्यापीठात अनायासे खोदकाम चालू असताना दोन मीटर्स खोलीवर ही कंदमुळे मिळाली. त्यात सरासरी २०० ते ६०० ग्रॅम स्टार्च असल्याचे आढळून आले. हा पिठुळ पदार्थ वापरूनच पर्णहीन अवस्थेत शाल्मली जिवंत राहून पुष्पमंडीत होतात. मध व कापूस निर्माण करतात हे जगाला दाखवून देणारी प्रियांका चोडणकर ही या संशोधनाचा थरार अनुभवलेली एकमेव विद्यार्थिनी आहे.

 

 

संबंधित बातम्या

फोटो फीचर