विचारातील सर्जनशील शक्ती जीवनात चमत्कार घडवू शकते

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

कांपाल येथे अध्यात्मिक व्याखानमालेला मोठी उपस्थिती

कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या अध्यात्मिक व्याख्यानमालेत व्याख्यान देताना सरिता राठी

पणजी : आपल्या बऱ्या वाट विचारांची कंपने प्रत्येक वस्तूत फैलावत असतात. आपण जसा विचार करू, तसा त्याचा प्रभाव वास्तूवर, नात्यांवर पडत असतो. विचारांमुळे घरातील वातावरण बनते, वास्तूची शांती आपल्या विचारांवर अवलंबून असते. आपण विचार करतो वेगळा आणि बोलतो वेगळे. त्यामुळे प्रत्येक विचारात सर्जनशील शक्ती असते व ती जीवनात चमत्कार घडवू शकते याची जाणीव देऊन सकारात्मक व नकारात्मक विचारानुसार आपली प्रतिमा बनत असते, हे सोदाहरणासह ध्यानधारणा शिक्षिक ब्रह्मकुमारी सरिता राठी यांनी स्पष्ट केले.

ब्रह्मकुमारी सरिता राठी या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कांपाल-पणजी येथे दयानंद बांदोडकर मैदानावर सुरू असलेल्या अध्यात्मिक व्याख्यानमालेत ‘क्रिएटिंग मिरॅकल्स इन लाईफ’ या विषयावर सोमवारी बोलत होत्या. प्रत्येक मुद्दा दृष्टांतासह स्पष्ट करून सहज सुंदर सोप्या भाषेत विवेचन करून त्यांनी उपस्थित जनसमुदायाला उद्‍बोधन केले.

त्या म्हणाल्या, तुमची नाती तपासून पहा. एक काळ लहानपणी आपण एका ताटात जेवायचो. मिळून-मिसळून आनंदाने रहायचो. परंतु आज आपण पार बदललो आहोत. मन, बुद्धी, संस्कार या आपल्यातील सुक्ष्मशक्ती आत्म्याशी निगडीत आहेत आणि आत्म्यामध्ये ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, आनंद, ऊर्जा, समाधान यांच्याशी संबंध आहे. तोच तोच विचार मनात घोळायला लागला की, कृतीत उतरतो व त्या कृतीचे सवयीत रुपांतर होते. मात्र, सवयी बदलणे आपल्याच हातात असते. आतून बदल झाला की, बाहेरचे जग आपोआपच बदलते.

व्याख्यानमा लेत समन्वयक नागराज अंकलेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मंगळवारी २५ रोजी सरिता राठी ‘रिसिव्हींग गॉड्‍स पावर’ या विषयावर संध्याकाळी साडेसहा ते रात्री आठ या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत. आज त्यांचे व्याख्यान ऐकायला लोकांनी गर्दी केली होती. त्यांच्या विचारांनी लोक अंतर्मुख झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

शुभ चिंतल्याशिवाय
दुसऱ्याला चिंतणार नाही

आपण दुसऱ्याला समजून घेतल्याशिवाय ‘लेबलं’ लावतो. स्वतःसाठी तुम्ही शुभ चिंतल्याशिवाय दुसऱ्याला चिंतणार नाही. शुद्ध प्रेमाची ऊर्जा आपल्यात उत्पन्न होईल, तेव्हा प्रेमाचे झरे सभोवताली वाहतील. म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. सगळ्यांबद्दल चांगला विचार केला तरच लोक जोडले जातील. जेवढे आजार आपल्याला ग्रासतात ते आपण नकारात्मक विचारांमुळे, बदलाया जीवनशैलींमुळे ओढवून घेत असतो, याची जाणीव सरिता राठी यांनी दिली. स्वतःला बदलण्यातच विकासाचा, उन्नतीचा, शांतीचा मार्ग आहे, हेही त्यांनी पटवून दिले.

 

संबंधित बातम्या

फोटो फीचर