ब्रिक्स परिषद अन्न घोटाळा सुनावणी मानवाधिकार आयोगासमोर सुरू

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

पणजी : राज्यात २०१६ साली ब्रिक्स परिषदेच्या काळात ड्युटीवरील पोलिसांना देण्यात आलेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या अन्न घोटाळाप्रकरणाची सुनावणी आजपासून गोवा मानवाधिकार आयोगासमोर सुरू झाली. आयोगाचे यु. व्ही बाक्रे यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्य डेस्मंड डिकॉस्ता व प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत प्राथमिक सुनावणी होऊन ती आता ६ मार्चला ठेवण्यात आली आहे.

कथित अन्न घोटाळाप्रकरणासंदर्भात आयोगाने आदेश देताना मे. आमोणकर क्लासिक कॅटरर्सला बाजू मांडण्यास संधी दिली नाही, असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिकेद्वारे केल्यावर आयोगाने यावर नव्याने सुनावणी घेऊन ती तीन महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला होता.

२ मार्चला आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने दिल्याने त्यानुसार मे. आमोणकर, पोलिस प्रमुख व मुख्य सचिवांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले.

ब्रिक्स परिषदेवेळी पोलिस कर्मचाऱ्यांना नास्ता तसेच आहार पुरवण्याचे कंत्राट मे. आमोणकर क्लासिक कॅटरर्सला दिले होते व त्याने ते उपकंत्राटदाराला दिले होते. वेर्णा येथील पोलिस ठाण्याच्या आवारातच उघड्यावर उपकंत्राटदार अस्वच्छता असलेल्या जागेत अन्न शिजवत होता.

त्या ठिकाणी कोणतीच स्वच्छता नव्हती. अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात आलेले पाणी पिंपामध्ये उघड्यावर ठेवण्यात आले होते. शिजवलेले अन्नही उघड्यावर होते. पोलिसांना देण्यात येणारी अन्नाची पॅकेट्सही खाण्यायोग्य नसल्याने यासंदर्भात ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
 
संबंधित बातम्या