बस प्रवाशांच्या तपासणीचा फार्स

Dainik Gomantak
बुधवार, 22 एप्रिल 2020

कोविड - १९ ला रोखण्यासाठी थर्मल गनने नागरिकाचे तापमान मोजण्याची सोय अनेक ठिकाणी करण्यात आली आहे.

पणजी

राज्यात कदंब बससेवा सुरू करून प्रवाशांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची थर्मल गनने तपासणी केली जात होती. मात्र, हा फक्त फार्स असल्याचे दिसून आले. बसमध्ये काही कर्मचारी तपासणी होण्यापूर्वीच आत जाऊन बसले होते, तर काहींची बसमध्ये तपासणी केली जात असली, तरी त्यामध्ये गंभीरता नव्हती असे दिसून आले.
कोविड - १९ ला रोखण्यासाठी थर्मल गनने नागरिकाचे तापमान मोजण्याची सोय अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. बस प्रवाशांचीही तपासणी करण्यासाठी सरकारने कदंब महामंडळाला सुमारे २०० थर्मल गन उपकरणे दिली आहेत. ही उपकरणे राज्यातील सर्व कदंब बसस्थानकाच्या नियंत्रक कक्षाकडे देण्यात आली आहेत. प्रवाशाचे तापमान मोजल्याशिवाय त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जाऊ नये अशी सक्ती आहे. मात्र, आज पणजी बसस्थानकावरील स्थिती बरीच विस्कळीत दिसून आली. कोणतेही नियोजन नसल्याने प्रवाशांना कोणती बस कोठे जाणार याचा थांगपत्ता नसल्याने अनेक प्रवासी बस आल्यावर त्यामागे धावत होते. बसमध्ये प्रवेश देण्यापूर्वी त्यांची थर्मल गनने तपासणीही केली जात नव्हती. यासंदर्भात कदंब बसस्थानकाच्या नियंत्रक कक्षाच्या अधिकाऱ्याला विचारले असता तो म्हणाला की थर्मल गन दिल्या आहेत. मात्र, प्रवाशांची त्याने तपासणी करण्यास वेळ मिळत नाही. संध्याकाळच्या वेळेला प्रवाशांची गर्दी होत असल्याने काही प्रवाशांची थर्मल गनने तपासणी करणे शक्य होत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या थर्मल गनने प्रवाशांची किती तपासणी करावी याचे प्रशिक्षणही कदंबच्या कर्मचाऱ्यांना दिलेले दिसत नाही. ही थर्मल गन कपाळासमोर सुमारे ५ सेंटीमीटर अंतरावर धरून तापमान मोजायचे असते. मात्र, त्याची तपासणी करताना किमान अंतरावरून ते मोजले जात नव्हते. त्यामुळे ही तपासणी किती गंभीरतेने केली जात होती हे दिसून आले. बसमध्ये बसलेले प्रवाशीही या थर्मल गनने तापमान मोजले जात असताना ते गंभीर नव्हते. त्यामुळे या थर्मल गननचा योग्य प्रकारे वापर करून तापमान मोजले जात आहे का हा संशयाचा विषय बनला आहे.

 

 

संबंधित बातम्या