नदी परिवहनचा ‘पाय’ खोलात

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पणजी:कर्मचारीच लाटताहेत मलिदा : केंद्रीय समिती, महालेखापाल करणार परीक्षण

पणजी:कर्मचारीच लाटताहेत मलिदा : केंद्रीय समिती, महालेखापाल करणार परीक्षण

नदी परिवहन खात्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या फेरीबोट सेवेच्या तिकिटांएवढे पैसे न आल्याबद्दलचा ठपका पर्वरीच्या महालेखापालाच्या (कॅग) कार्यालयाने आपल्या तपासणी अहवालात ठेवला आहे.सुमारे ३६.६३ लाख रुपयांची तफावत मिळूनही सचिवांच्या समक्ष झालेल्या बैठकीत खात्याच्या अधिकाऱ्यांनी तिकिटांपेक्षा जास्त पैसे आल्याचे दाखवत घोटाळा लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.विशेष म्हणजे या घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे.दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी केंद्रीय नियंत्रक आणि महालेखापरिक्षक समिती येत्या काही आठवड्यांत गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती हाती आली आहे.महालेखापालांनी आपल्या अहवालात या खात्याने सन २०१४-१५ मध्ये ८९ लाख २२ हजार १९२ रुपये आल्याचे दाखविले आहे.परंतु तिकिटे किती दिली याचा पायपोसच अजिबात दाखविला नाही.महालेखापालांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.त्यानंतर २०१५ ते २०१८ पर्यंतच्या काळात या खात्याकडून फेरीबोटींनी तिकिटे पुरविण्यात आली, त्यात सरासरी २० लाख रुपयांची तफावत दिसून आली. जेवढी तिकिटे नेण्यात आली, तेवढे पैसे येणे अपेक्षित असताना तेवढी रक्कम जमा न झाल्याचे स्पष्टपणे अहवालात नमूद केले आहे.त्याशिवाय शिल्लक तिकिटेही जमा केलेली नाहीत.त्यामुळे नदी परिवहन खात्याच्या अहवालात २०१४ ते २०१८ या काळात तिकीट आणि जमा झालेल्या रकमेत ३६ लाख ६३ हजार ३१४ रुपयांची तफावत दिसून आली आहे. ही तफावत केवळ तीन वर्षांची आहे. कारण २०१४-१५ मध्ये रुपये जमा झाल्याचे दाखविले पण तिकिटे किती रुपयांची होती ते दाखविले नसल्याने ‘त्या‘ लाखो रुपयांचा या तफावतीत समावेश नाही.नदी परिवहन खात्यातर्फे राज्यात १८ ठिकाणी फेरीबोट सेवा सुरू आहे.या मार्गावरून जाणाऱ्या चारचाकी व दुचाकींना पैसे आकारले जातात. दररोज फेरीबोटवरील तिकीट कलेक्टरने तिकीटे न्यावयाची आणि तेवढीच रक्कम आणून कार्यालयात भरावयाची असते.पण तसे झालेले दिसून येत नाही, हे स्पष्ट अहवालातून दिसून येते.

खात्याचा जावई ‘तारी’ लईभारी
बेती येथील खात्याच्या कार्यालयातील या घोटाळ्यामागे मोठी साखळी असल्याची चर्चा खात्यात आहे. विशेष म्हणजे अनेकांना या तिकीट घोटाळ्यामागे कोण आहे, हे माहीत असले तरी आता कोणी तोंड उघडत नाहीत. ज्या व्यक्तीने हा घोटाळा झाल्याचे पुढे आणले त्या व्यक्तीची बदली करण्याची ताकद या घोटाळेबाज साखळीतील लोकांमध्ये आहे. त्यामुळे सर्व काही आलबेल सुरू आहे.घोटाळा दाखविणारा व्यक्ती जुन्‍ता हाऊसमधील एका खात्यात बदलून गेला आहे.तर दुसरीकडे रोखपाल (कॅशिअर) अधिकारी आणि खलाशी म्हणून नेमणूक झालेला व अकाऊंट विभागात ३० वर्षांहून अधिक काळ या खात्याचा जावई बनलेला ‘तारी’ नामक व्यक्तीची या घोटाळ्यात प्रमुख भूमिका असल्‍याचा संशय आहे.या खलाशाविरुद्ध माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही काहीही करू शकले नव्हते, एवढी ताकद त्याची असल्याचेही चर्चेत आहे.

खाण कंपन्यांचे अर्ज फेटाळला

तिकिटांपेक्षा पैसे जास्त कसे?
नदी परिवहन खात्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या फेरीबोट सेवेच्या तिकिट घोळप्रकरणी महालेखापालांनी ताशेरे ओढले आहेत.महालेखापाल कार्यालयाच्या द्विस्तरीय समितीने नोव्हेंबर २०१९ मध्ये केलेल्या आर्थिक परीक्षणाच्या अहवालातील अनियमितता दिसून आली आहे.हा अहवाल बंदर कप्तान खात्याकडे १७ डिसेंबर २०१९ रोजी पाठविला आणि त्या खात्याला तो २३ डिसेंबरला मिळाला.त्यानंतर याविषयावर राज्याच्या सचिवांनी बैठकही घेतली, परंतु त्या बैठकीत तिकिटांपेक्षा अधिक पैसे खात्याकडे आल्याचे सांगण्याइतपत या कर्मचाऱ्यांची मजल गेली.सध्या हे कर्मचारी तिकिटांपेक्षा अधिक पैसे आल्याचे भासविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची चर्चा खात्यात सुरू आहे.या सर्व घोटाळ्याविषयीचा अहवाल केंद्रातील केंद्रीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक समितीला पाठविला असून, लवकरच एक गट या अनियमितेच्या तपासणीसाठी दाखल होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

संबंधित बातम्या