गाडी आणली ती चूकच..!

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

जी इनोव्हा गाडी आपल्याकडे होती त्या गाडीला सात वर्षे झाली. त्यामुळे नवी गाडी घेण्याचे आम्ही मागील वर्षी प्रयत्न सुरू केले होते.

पणजी,

कोरोनामुळे देशभर टाळेबंदी लागू आहे. जनता पुरती हैरान झाली आहे. तर दुसरीकडे स्वतःसाठी नवी गाडी महापालिकेच्या दारात आणली जाते, त्यावरून समाजमाध्यमातून आणि पक्षाने कान टोचल्याने महापौर उदय मडकईकर यांनी नवी गाडी वातावरण सुयोग्य होईल, तेव्हाच ती वापरू असे वचन त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.
मडकईकर यांनी सांगितले की, सर्वत्र टाळेबंदी आहे असे असताना गाडी आणणे चुकीचेच आहे. आपली ती मोठी चूक झाली, कोणाचे मन दुखावले असतील तर आपण माफी मागतो. परंतु गाडी आणण्यासाठी महापालिकेला पूर्वी १४ लाखांपर्यंत निधी मिळत होता. परंतु आता नव्या नियामानुसार २० लाखांपर्यंतची गाडी खरेदी करणे शक्य आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून आम्ही गाडी घेण्यासाठीची कागदोपत्री पूर्तता केली होती. केवळ महापौरांसाठी असलेलीच गाडी नाहीतर इतर नऊ अशा दहा गाड्या आम्ही खरेदी केल्या आहेत. त्यात हायड्रोलिक ट्रक, टँकर, साहित्य नेण्यासाठी छोटी टाटाची चारचाकी वाहने, जेसीबी, आपल्यासाठी असणारे क्रेस्टा गाडी अशी सुमारे एक कोटी रुपयांची खरेदी झालेली आहे. आपण जरी वाहन आणले असले तरी देशभरातील कोरोनामुळे जे वातावरण निर्माण झाले आहे, ते वातावरण पूर्णपणे निवाळल्यानंतरच ती नवी गाडी वापरू, असे वचन देतो.
आपल्याला गाडीचा मोह नाही, परंतु जी इनोव्हा गाडी आपल्याकडे होती त्या गाडीला सात वर्षे झाली. त्यामुळे नवी गाडी घेण्याचे आम्ही मागील वर्षी प्रयत्न सुरू केले होते. पूर्वीच्या इनोव्हा गाडीतूनच आपण फिरू असेही मडकईकर यांनी नमूद केले.

 

गोवा गोवा पणजी

संबंधित बातम्या