बेरोजगारांसाठी हटके करिअर

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

बेरोजगारांना नवा पर्याय : सुमारे ७ लाख कोंबडीच्‍या मांसाचा आहारात वापर

कुक्कुटपालन व्‍यवसायातून करिअर संधी

पशुसंवर्धन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ मध्ये झालेल्या १९व्या लाईव्ह स्टॉक गणतीच्या अहवालानुसार गोव्यात दरडोई कुक्कुट उत्पादनाचा वापर अंदाजे ८० अंडी आणि तीन किलो मांस असून राष्ट्रीय सरासरी ५५ अंडी आणि २.२ किलो मांस एवढा आहे.

पणजी : भारतातील इतर राज्यात कुक्कट पालनाचा व्यवसाय गती घेत आहे. मात्र, त्‍या तुलनेत गोवा काहीसा मागे असल्याचे दिसून येते. राज्‍यातील हॉटेल उद्योगात, घरगुती आणि इतर उद्योगात सुमारे ६ ते ७ लाख कोंबडीच्‍या मांसाचा आहारात महिनाभरासाठी वापर होतो. परंतु, खेदाची गोष्ट म्हणजे गोव्यात होणाऱ्या कोंबडी उत्पादनातून या संख्येच्‍या केवळ एक तृतियांशच गरज भागवली जाते.

उत्‍पादन व मागणी
या शिरगणतीनुसार असेही दिसून येते की, गोव्यात दरवर्षी २,९२,०२८ कुक्कुट पक्षांचे उत्पादन होते. ज्यात बदके, टर्की, कोंबडी इत्यादींचा समावेश आहे. दोन्ही विभागांच्या अहवालातून असे आढळते की, गोव्यात दरवर्षी सुमारे ६०८७ मेट्रिक टन कुक्कुट उत्पादनांची आवश्यकता आहे. स्थानिक कुक्कुट उत्पादन फक्त १०५० मेट्रिक टन होते. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी विविध राज्यातून सुमारे ५००० मेट्रिक टन कुक्कट उत्पादन गोव्यात आणले जाते. अंडी पुरवठा - मागणीची अवस्थाही काहीशी याच प्रमाणे आहे. २०१६ च्या सरकारी अहवालानुसार दरवर्षी अंड्यांची १६२३ लाख एवढी मागणी असूनही पुरवठा केवळ ३५२ लाख एवढाच आहे.

खाद्यावर सर्वाधिक खर्च
कुक्कुटपालनात उत्पादनासाठी होणाऱ्या प्रचंड खर्चामुळे गोव्यातील लोक व्यवसायाकडे वळत नाहीत. महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या राज्यांच्या तुलनेत गोव्यात उत्पादन खर्च १०० पट जास्त आहे. या व्यवसायात सगळ्यात जास्त खर्च खाद्यासाठी होतो. खाद्य घटकात ज्याने बचत केली, तो या व्यवसायात नफा कमवितो, असा समज या व्यवसायात आहे. खाद्य हा मांसल कोंबडी पालनातील महत्त्वाचा घटक असल्यामुळे खाद्य गुणवत्तेमध्ये कुठल्या प्रकारची कमतरता पक्ष्यांची वाढ खुंटवण्यास कारणीभूत ठरू शकते. खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचा सातत्याने सल्ला घेतला की, कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि खर्चात बचत होते.

कुक्कुटपालन उत्पादन वाढवण्यासाठी खात्‍यातर्फे आकर्षक योजना सुरू केल्या आहेत. यामुळे आता या योजनांचा फायदा घेण्यासाठी अनेक अर्ज येण्यास सुरवात झाली आहे. त्‍यापैकी काही अर्ज मंजूरदेखील केले आहेत. हे सगळे प्रयत्न गोव्याच्या कुक्कुट उत्पादनात भर येण्याच्या उद्देशाने होत आहे.
-संतोष देसाई, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालक.

प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण​

व्‍यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण हवे
कोणत्याही शेतीपूरक व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती असेल, तर तो व्यवसाय निश्‍चितपणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. यामुळे चांगल्या जातीची पिल्ले कशी ओळखावी, हे समजते आणि त्यासोबत त्यांचे आरोग्य, खाद्य व्यवस्थापन कसे करावे, याबाबत माहिती असतेच. त्याचबरोबर लसीकरण व औषधोपचाराचे तंत्रही कळते. त्यासोबत या पशूंची विक्री कशी करावी याबाबतही समजते. गोव्यात या व्यवसायाविषयी प्रचार होणे अत्यंत गरजेचे आहे.

 

संबंधित बातम्या