शनिवारपासून गोव्यात कार्निव्हलची धूम

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

गोव्यात शनिवारपासून ‘कार्निव्हल’ धूम

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर : पणजी, मडगाव शहरांसह सात ठिकाणी मिरवणूक

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असलेल्या या कार्निव्हलसाठी देश - विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्निव्हल महोत्सवावेळी ‘खा, प्या व मजा करा’ असा संदेश पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

पणजी : गोव्याची संस्कृती व पारंपरिक कलेचे दर्शन घडविणाऱ्या गोवा कार्निव्हल मिरवणूक धूम येत्या शनिवारी २३ ते २५ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. या चार दिवसांच्या काळात पणजी, मडगाव, वास्को, म्हापसा, कुडचडे, मोरजी व केपे असे ७ ठिकाणी कार्निव्हल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्निव्हल महोत्सव शहरामधून आता ग्रामीण भागामध्येही नेऊन पर्यटकांना अंतर्गत पर्यटनाचीही माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. या महोत्सवाच्या मिरवणुकीवेळी गोव्याची संस्कृती तसेच पारंपरिक कलेचे दर्शन घडविणाऱ्या पथकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या पथकांची प्रत्येक ठिकाणच्या कार्निव्हल महोत्सव समिताच्या चिकित्सा समितीकडून तपासणी होणार आहे व या समितीने परवानगी दिल्यानंतरच त्यांना मिरवणुकीत सहभागी होण्यास प्रवेश दिला जाईल. मिरवणुकीत वादग्रस्त पथकांना प्रवेश दिला जाणार नाही.

या चार दिवसांच्या कार्निव्हल काळात गोव्यातील वातावरण कार्निव्हलमय होणार असल्याने गोमंतकियांना तसेच पर्यटकांना हा महोत्सव म्हणजे पर्वणीच असेल असे मंत्री आजगावकर म्हणाले. यावेळी यावर्षीचे कार्निव्हल महोत्सवाचे ‘किंग मोमो’ म्हणून निवड झालेले शॅलोम सार्दिन व पर्यटन संचालक मिनिनो डिसोझा उपस्थित होते. ‘गोवा कार्निव्हल २०२०’ महोत्सवाची ध्वनिफितचे उद्‍घाटन मंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते झाले. यातील गाणी बोनी आलेक्स (बँड अँबेसेडर) यांनी संगीतबद्ध केली असून शालिशा फर्नांडिस, बोनी आलेक्स व आदेलिओ मेंडिस यांनी गायिली आहेत.
सात ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्निव्हल मिरवणुकीसाठी बक्षिसे तसेच साधनसुविधेवर सुमारे १ कोटी ४७ लाख १५ हजार रुपये खर्च होणार आहे तर पणजी, मडगाव, वास्को व म्हापसा या चार शहरांमधील कार्निव्हलच्या सजावटीचे कंत्राट विनय डेकोरेटर्सला देण्यात आले असून त्यावर सुमारे १ कोटी ५२ लाख रुपये खर्च होणार आहेत.

पणजी व मडगाव येथील कार्निव्हलसाठी प्रत्येकी ६.४० लाखांची बक्षिसे व साधनसुविधेसाठी २०.९५ लाख मिळून २७.३५ एकूण रक्कम समितीकडे देण्यात आली आहे. म्हापसा येथील कार्निव्हलसाठी ६.४० लाखांची बक्षिसे व १५ लाख ९५ हजार रुपये मिळून २२.३५ लाख रुपये देण्यात आले आहेत. वास्को, कुडचिडे, मोरजी व केपे या ठिकाणच्या प्रत्येक कार्निव्हल मिरवणुकीसाठी ५ लाख ५५ हजारांची बक्षिसे व ८ लाख ७० हजार साधनसुविधेसाठी मिळून १४.२५ लाख रुपयांची रक्कम कार्निव्हल आयोजन समितीकडे पर्यटन खात्याने दिली आहे. फोंडा व शिरोडा येथे कार्निव्हल आयोजनसंदर्भातचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास तेथेही कार्निव्हलचे आयोजन करण्यात येईल असे मंत्री आजगावकर म्हणाले.

या कार्निव्हल मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीसंदर्भातील मिरवणूक पथकांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक पथकाची संकपल्पना ही गोव्याच्या संस्कृतीशी तसेच पारंपरिक कलेशी निगडित असणे सक्तीचे आहे. कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या या कार्निव्हल महोत्सवामधून देशी व विदेशी पर्यटकांना गोव्याच्या पर्यटनाकडे आकर्षित करण्याचा त्यामागील मुख्य उद्देश आहे. गोवा हे पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरले आहे त्यामुळे अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करून गोव्यातील पर्यटनात वाढ करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.
 

कार्निव्हलचे आयोजन
२२ फेब्रुवारी - पणजी
२३ फेब्रुवारी - मडगाव व केपे
२४ फेब्रुवारी - वास्को व कुडचडे
२५ फेब्रुवारी - म्हापसा व मोरजी

महाशिवरात्रीनिमित्त पणजीत मॅजिक ऑफ मॅडिटेशन

शॅलोम सार्दिन ‘किंग मोमो’
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांचे पुत्र व व्यवसायाने वकील असलेले शॅलोम सार्दिन यांची ‘गोवा कार्निव्हल २०२०’चे किंग मोमो म्हणून पर्यटन खात्याच्या कार्निव्हल समितीने निवड झाली आहे. ‘किंग मोमो’साठी चारजण स्पर्धेत होते. २०१६ मध्येही ते ‘किंग मोमो’ होते. शॅलोम सार्दिन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, युवा पिढीने या पारंपरिक महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हा महोत्सव म्हणजे पारंपरिक पदार्थ, संगीत व नृत्य याचा मिलाफ आहे. ‘ईडीएम’ यासारख्या महोत्सवाला माझा पाठिंबा नाही.

 

संबंधित बातम्या