सांगे भागातील काजू उत्पादकांत चिंता

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

बोंडू दृष्टी पडत नसल्याने काजूभट्ट्यांची डागडुजीकडेही दुर्लक्ष

बोंडूविना असलेली काजूचे झाड.

सांगे:  तीन महिने उत्पादन देऊन गरिबांना रोजी रोटी पुरविणारे काजू पीक मार्च महिना सुरू झाला तरी अद्याप दिलासा देणारे चित्र स्पष्ट होत नसल्याने काजू उत्पादकांत चिंता व्यक्त केली जात आहे. सांगे भागात अद्याप काजू बोंडू दृष्टीस पडत नसल्याने काजूभट्ट्याची डागडुजीही करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

तीन महिने समाधानकारक काजू उत्पादन मिळाल्यास गरीब शेतकऱ्यांच्या घरातील एखादे मंगल कार्य, घराची दुरुस्ती, कर्जफेड किंवा थकलेल्या कार्यांना चालना देण्यात येथे. लहान-सहान कामे उरकली जात असे. पण, यंदा निसर्गाने शेतकऱ्यांना चपराक दिल्याने सर्व ठिकाणी गर्मी वातावरणात थंडावा पसरला आहे.

वास्तविक आतापर्यंत काजू रसापासून तयार होणारे ‘हुऱ्हाक’ बाजारात दाखल झाले नाही. मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन होण्यापूर्वी जर ‘हुऱ्हाक’ बाजारात दाखल झाल्यास काजू उत्पादकांना चांगला भाव मिळत असतो. त्यामुळे थोड्या मिळकतीत वाढ होत असे. पण, अद्याप काहीच चित्र नसल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना मारक ठरणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

काजू दरही हवा तसा नसल्याने यंदा पावणीदार बुचकळ्यात पडलेले आहेत. पुढील दोन महिन्यात बदल घडून आल्यास काजू उत्पादक सावरू शकतील, अन्यथा यंदाचा हंगाम गेल्यातच जमा आहे.
 

संबंधित बातम्या