काजू उत्पादक शेतकऱ्यांचा काजूविक्रीसाठी खटाटोप

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

गोवा बागायतदार मार्केटयार्डमध्ये येण्यासाठी १० किलोमीटरची पायपीट

पणजी, 

 दक्षिण गोव्यातील हातावर पोट असणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या उत्पादन करून घाम गाळून कष्टाने उगवलेले काजू नासाडी होऊन वाया जाऊ नये, म्हणून खटाटोप करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्याआधी हे काजू बागायतदारामध्ये पोहोचून त्याची योग्य किंमत त्यांची विक्री झाल्यावर मिळाल्यानंतर टीचभर पोटाची खळगी भरण्याएवढे पैसे त्यांना मिळणार असल्याने म्हातारपणी कुणाचाही आधार नसताना ही अस्तित्वाची लढाई त्यांना लढावी लागत आहे.
सध्या कोरोनाविरुद्ध लढाईमध्ये टाळेबंदी सुरु असल्याने सर्व प्रकारची वाहतूक, काही महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंची ने - आण करण्यासाठीची वाहतूक वगळता बंद आहे. त्यामुळे खासगी व काही अपवादात्मक स्थितीत कदंब महामंडळाच्या बसगाड्याही बंद असल्याने वाहतुकीची सोय नसल्याने वयाची साठी ओलांडलेल्या काजू उत्पादक शेतकरी असलेल्या महिला व पुरुषांनाही सध्या भर उन्हात केपे, कुडचडे यासारख्या दक्षिण गोव्यातील भागात १० किलोमीटर किंवा त्याहून जास्त अंतर पायी चालत कुडचडे येथे असलेल्या गोवा बागायतदार मार्केटयार्डमध्ये येऊन द्यावे लागत आहे. बरे, यार्डमध्ये आपले कष्टातून उगवलेले उत्पन्न घेऊन आल्यावरही त्यांच्या हालअपेष्टा संपत नाहीत. कारण यार्डजवळ आल्यावर शेतकऱ्यांची भलीमोठी रांग उभी असल्याने अशा रणरणत्या उन्हात काही तास थांबून त्यांची पाळी आल्यावर मगच त्यांना आपण पिकविलेले काजूचे उत्पन्न तिथे सुपूर्द करावे लागते. कुटुंब नावाचा काहीही आधार नसलेल्या एकाकी जीवन जगणाऱ्या काही वयस्कर शेतकरी महिलांचाही या काजू उत्पादकांमध्ये समावेश आहे. त्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या या अडचणींविषयी या वृद्ध महिलांना छेडले तर सध्या सार्वजनिक वाहतुकीच्या अभावाबरोबरच त्यांना मदत करण्याविषयी स्थानिक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी दाखविलेला अक्षम्य उदासीनपणा याविषयीचा उल्लेख करायलाही या म्हाताऱ्या काजू उत्पादक बायका कचरत नाहीत. सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडा आणि सासष्टी तालुक्यातील अशा कुटुंबांसाठी काजूसारख्या बियांचे उत्पादन हेच आपली उपजीविका कमविण्याचे एकमेव साधन आहे.
यामधील बहुतेक काजू उत्पादक शेतकरी हे गरीब कुटुंबातील आणि विशेषतः आदिवासी समाजातील आहेत. काजू पिकाचे उत्पादन वर्षातील फेब्रुवारी ते मार्च या चार महिन्यात चालते. या कालावधीत काढण्यात येणाऱ्या काजूच्या पिकाची विक्री करून मिळणाऱ्या उत्पन्नावरच या हजारो कुटुंबांचे वार्षिक उत्पन्नाचा स्रोत व रोजीरोटी वा उपजीविका चालते हे विशेष. दक्षिण गोव्यातील बहुतेक काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबांमध्ये मुलांचे शिक्षण, विवाहाचा खर्च, घराचे दुरुस्तीकाम यासाठी लागणारे पैसे अथवा येणारा खर्च हा काजूच्या हंगामामधील काजूच्या उत्पन्नाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांच्या आधारेच भागविला जातो, असे या शेतकऱ्यांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. टाळेबंदीचा परिणाम फार मोठ्या व गंभीर स्वरूपात या काजू उत्पादक शेतकरी असलेल्या आपल्या सामाजिक घटकाला झालेला आहे. राज्य सरकार व प्रशासनाने या काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत करून या कठीण काळात सावरणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया काजू उत्पादक शेतकऱ्यांशी जोडलेल्या या क्षेत्रातील सूत्रांकडून व सर्वसाधारण नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
 

संबंधित बातम्या