काजू कारखानदार ५० टक्केच उत्पादन घेणार

Dainik Gomantak
मंगळवार, 14 एप्रिल 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची काजू उत्पादकांना झळ बसू नये यासाठी काजू खरेदी प्रक्रियेला सुरवात कलेली आहे. मात्र, कच्चा माल ते प्रक्रियायुक्त काजूचे अंतिम उत्पादन करणारा  कारखानदार यंदाच्या हंगामात ४० ते ५० टक्केच उत्पादन घेण्यावर भर देतील, असे गोवा काजू उत्पादक संघटनेचे खजिनदार सिध्दार्थ झांट्ये यांनी सांगितले.

सासष्टी,

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची काजू उत्पादकांना झळ बसू नये यासाठी काजू खरेदी प्रक्रियेला सुरवात कलेली आहे. मात्र, कच्चा माल ते प्रक्रियायुक्त काजूचे अंतिम उत्पादन करणारा  कारखानदार यंदाच्या हंगामात ४० ते ५० टक्केच उत्पादन घेण्यावर भर देतील, असे गोवा काजू उत्पादक संघटनेचे खजिनदार सिध्दार्थ झांट्ये यांनी सांगितले. काही कारखानदारांसाठी गोव्याची बाजारपेठ मुख्य असून अशा कारखानदारांचा व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.  
कोरोना विषाणूमुळे सण, समारंभ, कार्यक्रम आदींवर पूर्णविराम लागलेला असून पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ठप्प झालेला आहे. देशात तसेच गोव्यात प्रक्रिया केलेल्या काजूला ज्या प्रकारची मागणी मिळत होती ती मागणी यंदाच्या हंगामात मिळणे कठीण असल्यामुळे यंदा कारखानदार मोठ्या प्रमाणात उत्पादन टाळणार असून फक्त ४० ते ५० टक्केच उत्पादन घेण्यावर भर देणार आहेत. आज ज्या कारखानादारांनी माल विक्री केली आहे, त्यांचा पैसा अडकून पडलेला असून यापुढे जाऊन काजूला मागणी मिळणार की नाही हा मोठा प्रश्नही उपस्थित झालेला आहे, असे झांट्ये यांनी सांगितले. गेल्यावर्षी गोव्यातून काजू प्रक्रिया केलेला दहा हजार टनच्या आसपास काजू निर्यात करण्यात आला होता तर यंदा हे प्रमाण पाचशे टनाच्या वर जाणेही कठीण वाटते, असेही त्यांनी सांगितले.  
काजूचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसू नये यासाठी काजू खरेदी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून काजूवर प्रक्रिया करण्यासाठी माल कारखान्यात आणण्यासाठी सरकारने वाहतुकीसही परवानगी दिलेली आहे. कच्च्या काजूवर प्रक्रिया करण्यासंबंधी सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नसून यावर गोवा सरकार केंद्र सरकारच्या मार्गदर्शन तत्वांनुसार निर्णय घेतील. सध्या काजू कारखान्यात सुकवून ठेवण्यासाठी दहा कर्मचाऱ्यांना कारखान्यात येण्याची मान्यता मिळाली आहे. पण, कारखाना सुरू करण्यासाठी २५ ते ५० टक्के कर्मचारी वर्गाची आवश्यकता असते, असेही सिध्दार्थ झांट्ये यांनी सांगितले.

 

काजुचे दर वाढवा ः गाकुवेध
शेतकऱ्यांच्या हितासाठी काजू खरेदी करण्याचे दर वाढवण्यात यावे अशी मागणी गावडा, कुणबी, वेळीप व धनगर (गाकुवेध) महासंघाने केली आहे. गोव्यात लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी 136 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करण्यात येणारा काजू आज १०५ रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे. आदर्श कृषी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी १३४ ते १३६ प्रतिकिलो काजू बिया घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते, परंतु आदर्श कृषी संस्था १०५ रुपये दरात काजू खरेदी करीत आहे. प्रक्रिया करून पॅकेटमध्ये बाजारात येणारा काजू ११०० ते १२०० प्रतिकिलो दराने विकल्या जात असून शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी काजूचे दर १३० रुपयांच्या वर करावे, अशी मागणी गाकुवेधचे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी केली आहे.

संबंधित बातम्या