धारगळमध्ये कसिनो आणण्याची तयारी

Dainik Gomantak
मंगळवार, 7 जानेवारी 2020

सध्या या जागेला भले मोठे दगडी कुंपण घालण्याचे काम जोरात सुरू आहे. सुरवातीला २००६ सालामध्ये ही जमीन एका मंत्र्याने आयटी प्रकल्प घालण्यासाठी विकत घेतली होती. पण, त्यानंतर त्याने हीच जमीन मुंबईच्या एका कंपनीला विकली

प्रकाश तळवणेकर
पेडणे

धारगळ ग्रामपंचायत क्षेत्रातील सुकेकुळण जंक्शनच्या उजव्या बाजूला जवळपास चार लाख चौरस मीटर जमीन एका मोठ्या कसिनो मालकाने विकत घेतली असून, हल्ली त्यातील काही चौरस मीटर जमिनीचे रुपांतर करण्यास नगरनियोजनातर्फे चाळीस हजार चौरस मीटर जागा रुपांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे धारगळ गावाबरोबरच पेडणे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सध्या या जागेला भले मोठे दगडी कुंपण घालण्याचे काम जोरात सुरू आहे. सुरवातीला २००६ सालामध्ये ही जमीन एका मंत्र्याने आयटी प्रकल्प घालण्यासाठी विकत घेतली होती. पण, त्यानंतर त्याने हीच जमीन मुंबईच्या एका कंपनीला विकली आणि या कंपनीने २०१८ सालामध्ये ही जमीन एका मोठ्या कसिनो कंपनीला विक्री केल्याचे समजते. सुरवातीला या कंपनीने आपण इथे सप्ततारांकित हॉटेल उघडणार असे जाहीर केले होते. गावातील काही व्यक्तींना या प्रकल्पाबद्दल माहिती होती. पण, जर एखादे चांगले हॉटेल गावांमध्ये येत असेल व गावातील बेकार युवकांना रोजगार मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, या आशेने या गावातील काही ग्रामस्थ गप्प राहिले. आता मिळालेल्या माहितीनुसार, इथे मोठा कसिनो आणण्याच्या तयारीत हा कसिनो मालक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
गेली काही वर्षे पणजी येथे मांडवी नदीमध्ये हे कसिनो कार्यरत आहेत. या कसिनोला गोव्यामध्ये प्रत्येक स्तरावर विरोध होत आहे. हे कसिनो विविध ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा सरकारचा प्रयत्न आजपर्यंत असफल झालेला आहे. आता मोपा येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यानंतर हे कसिनो मोपा येथे स्थलांतरित करण्यात येतील, असे मायकल लोबो यांनी मागच्याच दिवसात जाहीर केले होते. आता धारगळमध्ये चार लाख स्क्वेअर मीटर जागेमध्ये तर हा काझीनो स्थलांतरित होणार नाही ना असा प्रश्न धारगळ मधील नागरिकांना पडलेला आहे.

ग्रामस्थांत विरोधाची तयारी
पंचायत कार्यालयामधून मिळालेल्या माहितीनुसार, कसिनो कंपनीने हे कूंपण घालण्यासाठी अर्ज केल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. अजूनपर्यंत या कसिनो प्रकल्पाबद्दल काही मोजक्याच लोकांना माहिती झालेली आहे. जर ही गोष्ट संपूर्ण गावातील नागरिकांना कळली तर या ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरणार आहे. या प्रकल्पाला भविष्यात विरोध होण्याची चिन्हे दिसत आहेत. गावात कसिनोसारख्या अनैतिक गोष्टी नकोच, अशी भूमिका ग्रामस्थ घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या विषयावर धारगळ पंचायत, जिल्हा पंचायत सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची याबाबत काय भूमिका आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

धारगळचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता...
एकदा कूंपण बांधून झाले की, मग मुख्य जागेमध्ये भलेमोठे इमारती प्रकल्प आणि कसिनोसाठी लागणारी यंत्रणा उभी केली जाईल. काही दिवसांतच येथे भलामोठा जमिनीवरील कसिनो सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. हा कसिनो या ठिकाणी कार्यान्वित झाला तर धारगळ गावचे अस्तित्वच ऐरणीवर येणार आहे. धारगळ हा सुसंस्कृत गाव. विविध देव-देवतांच्या मंदिरांनी व निसर्गाने नटलेला असा प्रदेश आहे. जर या ठिकाणी कसिनो संस्कृतीला सुरवात झाली तर या गावातील युवक अनैतिक व बेकायदेशीर गोष्टींमध्ये गुंतून पडणार आहेत. या गावाची संस्कृती लोप पावणार आहे सगळीकडे अनैतिक व्यवहार, दारू, अमलीपदार्थ, भांडणे, जुगार, वेश्याव्यवसाय, दलाली व इतर अनेक बेकायदेशीर गोष्टींना चालना मिळणार आहे आणि त्यामुळे या गावातील ग्रामस्थांमध्ये निराशेचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित बातम्या