लोकोत्सवाला महापालिकेची अद्याप मान्यता नाही

Dainik Gomantak
गुरुवार, 9 जानेवारी 2020

विलास ओहाळ
पणजी

विलास ओहाळ
पणजी

कला अकादमीच्या दर्यासंगमावर भरणाऱ्या लोकोत्सवाला अद्याप महापालिकेने मान्यता दिलेली नाही. आज महापालिकेने काही अटी घातल्या असून, उद्या (शुक्रवारी) सकाळी त्या अटींची पूर्तता झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांना परवानगी मिळेल, असे स्पष्ट आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी आजच्या बैठकीत सांगितले. दरम्यान, दुसरीकडे कला व संस्कृती खात्याने या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.
महापालिकेत महापौर उदय मडकईकर यांच्या कार्यालयात आज सायंकाळी झालेल्या बैठकीत कला व संस्कृती खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर, पोलिसांच्या वाहतूक शाखेचे उपअधीक्षक धर्मेश आंगले, आयुक्त संजित रॉड्रिग्स, अग्निशामक दराचे अधिकारी, पोलिसांच्या वाहतूक शाखेचे निरीक्षक, महापालिकेचे निरीक्षक आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.
कला व संस्कृतीच्यावतीने लोकोत्सवाचे दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजन केले जाते. परंतु कला अकादमीच्या दर्यासंगमावर आयोजिल्या जाणाऱ्या या उत्सवामुळे कांपाल परिसरातील नागरिकांना वाहनांच्या पार्किंगचा त्रास सहन करावा लागतो. येथील नगरसेविका सोरया पिंटो माखिजा, माजी उपमहापौर कबिर पिंटो माखिजा यांच्यासह येथील कांपालमधील नागरिकांनी या लोकोत्सवाला हरकत घेतली होती. गेली तीन चार दिवसांपासून लोकांचा या उत्सवाला विरोध आहे. मात्र, उद्यापासून सुरू होणाऱ्या या उत्सवाच्या अगदी शेवटच्या दिवशी कला व संस्कृती खात्याच्या सदस्य सचिवांनी बैठकीस उपस्थिती लावत अटींचे पालन केले जाईल, असे सांगितले.
आजच्या बैठकीत घातलेल्या अटींची पडताळणी उद्या, शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून केली जाईल अशी माहिती आयुक्तांनी दिली. ते म्हणाले की, आम्ही अद्याप लोकोत्सवाला परवानगी दिलेली नाही. अटींची पडताळणी आणि अग्निशामक व पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून परवानगी मिळाल्यानंतरच महापालिका त्यांना परवानगी देईल. कला अकदामी परिसरात अनेक उत्सव होत असतात, त्याचा त्रास कांपालमधील लोकांना सहन करावा लागतो. पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांचा अडथळा घरात जाणाऱ्या लोकांना होत असतो, त्याशिवाय आजारी व्यक्तींनाही रात्रभर चालणाऱ्या येथील गोंगाटाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे लोकांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. यावेळी लोकांनी या उत्सवाला विरोध दर्शविला. दरम्यान, याशिवाय महापालिकेने कला व संस्कृती खात्याला काही अटी घातल्या असून, त्यांचे पालन करणार असल्याची ग्वाही यावेळी पिळर्णकर यांनी दिली. दरम्यान, सकाळी याविषयावर बैठक झाल्यानंतर उत्सवातील नियोजनाची पाहणी केल्यानंतर आयुक्तांच्या उपस्थितीत सायंकाळी पुन्हा बैठक घेतली जाईल.

आयोजनासाठी काय आहेत अटी!
१) आरोग्य खाते ते बालभवनाच्या दोन्ही बाजूच्या पदपथाकडून बॅरिगेटस उभारणे.२) खासगी ५० सुरक्षारक्षक तैनात करून कांपाल परिसरात वाहने उभी करण्याला अटकाव करणे
३) वाहनांच्या पार्किंगसाठी ठिकठिकाणी लोकांना दिशादर्शक फलक लावणे
४) चारचाकी वाहनांसाठी कवायत आणि बांदोडकर फुटबॉल मैदानावर पार्किंग
५) याशिवाय बाहेरून येणाऱ्या वाहनांकरिता बहुमजली पार्किंग इमारतीचा वापर
६) बहुमजली पार्किंग इमारतीपासून तीन कदंबा बसेसद्वारे लोकांची ने-आण
७) दररोज सकाळी महापालिका निरीक्षकांद्वारे नित्याच्या सुविधांची पाहणी

संबंधित बातम्या