साळमध्ये मंगळवारपासून गडोत्सवास प्रारंभ

दिलीप देसाई
रविवार, 8 मार्च 2020

साळः डिचोली तालुक्यातील साळ या गावचा प्रसिध्द गडोत्सव मंगळवार १० मार्चपासून सुरू होत असून तो १२ मार्चपर्यंत चालणार आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

साळः डिचोली तालुक्यातील साळ या गावचा प्रसिध्द गडोत्सव मंगळवार १० मार्चपासून सुरू होत असून तो १२ मार्चपर्यंत चालणार आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

समस्त गोमंतकात शिमगोत्सव हा आनंदाचा नि उत्साहाचा उत्सव आहे. गोमंतकात प्रत्येक गावातील शिमगोत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. ग्रामीण भागात या शिमगोत्सवात आनंदाला उधाण येते. फाल्गुन मास हा या उत्साहाचा नि आनंदाचा महिना. याच फाल्गुन महिन्यात संपूर्ण भारतातही होळी, रंगपंचमी, धुलीवंदन, तर कोकणपट्ट्यात धुळवड, घोडेमोडणी अशा विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल असते. गामंत भूमीतही हा शिमगोत्सव आगळ्यावेगळ्या ढंगात साजरा केला जातो. गोमंतक भूमी ही कलाकारांची भूमी. इथली लोककला व लोकसंस्कृती या शिमगोत्सवाच्या माध्यमातून पाहावयास मिळते. ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेचा हा खेळ लोकोत्सवाच्या नजरेतून बघतो. शेतात राबणारा शेतकरी, श्रमीक थकून जातो. आपला थकवा दूर करण्यासाठी मनोरंजनाकड नि श्रध्देकडे वळतो. मनोरंजनाद्वारे उत्सवाला जन्म देतो. लोककलेद्वारे उत्सवात विकास घडून येतो. रोमटामेळ्यातून ढोल-ताशांच्या गजरात व थिरकणाऱ्या पावलांच्या तालांवर खेळणाऱ्यांच्या ओठातून शब्द बाहेर पडतात -

शबय, शबय,
शबयचो बावलो, तारीकडे पावलो, शबय, शबय
काट कूट करता
पेटलाची चावी काडरा, आमका शबय घालता शबय, शबय

अशा शब्दात लोकगीतातून लोकवाद्ये, ढोल, ताशे, नगारे, घुमट, कासाळे, समेळ इत्यादी वादनांच्या मदतीने शिमगोत्सवात आनंद व्यक्त केला जातो. अशा या उत्सवांना दीर्घ परंपरा लाभलेली आहे. आता तर गोव्यात शिमगोत्सवाला राजाश्रय मिळाला आहे. यातून पारंपरिक कला व उत्सव यांची जपणूक केली जाते.

गोमंत भूमीतील शिमगा हा बेधूंद होवून नाचतात. मालगाडी, रोमट, चपय, रणमाले, करूल्यो, सोकारती, फुगड यांसारखे विविध लोककला प्रकार सादर केलेले पाहावयास मिळतात. डिचोली तालुक्यात बोर्डे-डिचोली, कुडणे, पिळगाव व साळ या ठिकाणी गडोत्सव होतो. यांच्या रोमांचकारी घटनांमुळे शिमग्यातून चैतन्याचा आविष्कार दिसतो. साळ येथील उत्सवाच्या शिरोमणी असलेला गडोत्सव हा खूपच प्रसिध्द आहे व साळचे ते भूषण आहे. एक वेळ जरी कोणी गडोत्सव पाहण्यासाठी आले असेल, तर त्याला गडे पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा यावे असे वाटणे स्वाभाविक आहे. दोन देवता दिसणे ही कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. ही इथल्या जागृती देवस्थानच किमया आहे. इथली होळीसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण असते. फाल्गुन शुध्द पौर्णिमेच्या दिवशी उंच असे आंबा, फणस किंवा कोकमचे सरळ झाड देवतांना गाऱ्हाणे घालून घाडी यांच्याकरवी तोडले जाते. तिची लांबी (उंची) ६० ते ६५ फूट असते.

श्री महादेव व श्री भूमिका या मंदिराच्या परिसरात आणली जाते. हे झाड स्वखूषीने व नवसाच्या रूपाने. काहीजणांकडून दिले जाते. भूमिका देवीचे श्रध्दाळू केवळ साळ गावातच नव्हे, तर संपूर्ण गोव्यात, सिंधुदुर्गातही दिसून येतात. या भक्तजनांकडूनही या होळीसाठी झाड उपलब्ध होते. अशी ही होळी प्रांगणात आणल्यानंतर हर हर हर असा मोठा आवाज करीत दोन ते अडीचच्या सुमारास होळी नेमात (खड्ड्यात) उभी करतात. नंतर तिच्यावर धार्मिक संस्कार केले जातात. होळीचे पूजन होते. शिमगोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून देवतांना आठवून गाऱ्हाणी घालतात. नंतर बुंध्यापाशी आग लावतात.
श्री महादेव व श्री भूमिका ही या गावची दैवते. श्री भूमिका देवीचे पाषाण हे स्वयंभू असून हिचा महिमा अगाध आहे. श्री महादेव मंदिराच्या प्रांगणात होळी घातल्यानंतर येणाऱ्या तिन्ही रात्री गडे उत्सव साजरा केला जातो. ही होळी काही भाविक झेंडूच्या फुलांनी सुशोभित करतात. होळीच्या दुसऱ्या रात्रीपासून याच होळी भोवती गडे पडू लागतात. या गड्यांचा पेहराव म्हणजे पायघोळ पांढरे शुभ्र धोतर व त्यावर चमड्याचा काळा जाडजूड पट्टा असा असतो. या उत्सवाची सुरवात श्री सिध्देश्‍वर मंदिर-वरचावाडा येथून तेथील अबालवृध्द ग्रामस्थ ढोलताशांच्या गजरात नाचत मिरवत

जय जयकार, जय जयकार,
माडयावल्याचो जय जयकार
माडयावयलो देवचार इलो रे
त्याच्या हातात फुलांचो झेलो रे

असा जयघोष करीत रोमाट घालीत येतात. तब्बल अडिच ते तीन तास हे रोंबट वरचावाडा ते भूमिका मंदिर, होळीपाशी येवून विसर्जित होते. त्यानंतर गावकरी, नातेवाईक, मित्रमंडळी व भाविक होळीपाशी येऊन पुरोहित किंवा गड्याकरवी आपापले नवस बोलतात, फेडतात व नंतरच गउे पडण्यासाठी गाऱ्हाणे घालतात. गाऱ्हाणे घालताच नम्मान (देवतांची प्रार्थना, आळवणी, स्तुती) सुरू होते.

गड्यांचा अवसर आल्यानंतर पाच-दहा फेऱ्या मारुन होळीपासून दूर डोंगरावर करुल्या आणण्यासाठी जातात. वाटेवरच देवचार दैवत त्यांच्या स्वागतासाठी मशाल घेऊन उभा असतो. करवेश्‍वर स्थानाकडे गेल्यानंतर करुल्या हस्तगत करण्यासाठी धावपळ करतात नि त्या प्रयत्नांत देवचार काही गड्यांना लपवितो आणि कहींना त्याच रात्री तर काहींना दुसऱ्या नि तिसऱ्या रात्री देतात. गड्यांचा शोध घेताना शोध लागताच ते एका ढोलकीवाल्याला आपल्याबरोबर घेऊन निघून जातात. त्यावेळी हजारो लोक गड्याबरोबर लपविलेल्या गड्याला आणण्यासाठी धावतात. त्यात त्यांना देवचार नि मशालीचे दर्शन घडते. ठराविक स्थानावर, झाडांवर लपविलेल्या गड्याला इतर गड्यांकडे सुपूर्द करतो. कधी एकाला तर कधी जोडी देतो. त्यांना चौघे मिळून खांद्यावर घेऊन येतात. त्यांचे शरीर ताठर असते. भूमिका मंदिरात येऊन त्याला तीर्थ घालतात व होळीपाशी काही क्षण ठेवून नंतर त्याला खांद्याचा आधार देत फरफर ओढतात नि फिरवतात. साधारणपणे या खेळाची मर्यादा पहाटेपर्यंत म्हणजे साडेचार ते पाच वाजेपर्यंत असते. या मर्यादेतच खेळ आटोपला जातो. बाबरेश्‍वर, घवनाळेश्‍वर, अम्यानी, काजरेश्‍वर, म्हालकूमी, जठार, पातोळी, भूमीका मंदिर, चिचेर या ठिकाणी गडे देतात तर शेवटचा गडा श्री माड्येश्‍वर आपल्या स्थानावर देतो. शेवटी स्मशानभूमीत मसणा आणायला जातात. ऐरवी तिथे काहीही नसते पण इतक्या ४०-५५ गड्यांना तिरडींचे दांडे, मटकी, हुसकीच्या डहाळ्या, बुजगावणे व स्मशाणभूमीतील पेटती लाकडे घेऊन येतात. होळीपाशी ठेवून तालात नाचतात व परत मसणवटीत पोहोचवितात. पण जाताना आपण आणलेलेच घेऊन जातात तिथेसुद्धा काही खुणा नसतात. ठेवून आल्यानंतर होळीपाशी विसर्जित होतात.

वयोवृद्ध गावकऱ्यांना तसेच गड्यांनासुद्धा या उत्सवाचा ठावठिकाणा माहीत नाही. आज मानवाचे जीवन यंत्रवत, आधुनिक होत असताना संगणक, इंटरनेटच्या या युगात अशा या गडे उत्सवाची संकल्पना स्पष्ट होत नाही. मात्र, ही केवळ देवाची नि अद्भूत शक्तीचीच किमया आहे असे म्हणावे लागेल. हे गडे रात्रभर अनवाणी, काट्याकुट्यातून धावतात, फिरतात तरी त्यांच्या पायांना किंचीतही ओरखडा नसतो. दुसरे म्हणजे गड्यांच्या मुखातून गड्यांना सांकेतिक भाषेतील लयबद्ध हुंकाराने संबोधतात हेसुद्धा भाविकांना भूरळ घालते. असा हा अद्भूतपूर्व गडेत्सव झाल्यानंतर या गावात धार्मिक कार्य चालूच असते. होळीपाशी नवस फेडणे, धुळवट, घोडेमोडणी आदी कार्यक्रम होतात. सातव्या दिवशी धुळवट, घोडेमोडणी झाल्यानंतर रात्री श्री चव्हाटेश्‍वर मंदिरात न्हावान होते. भाविक व सर्व गावकरी श्रद्धेने देवीचे न्हावा (तीर्थ) घेतात नि गडेत्सवाची सांगता होते.
 

संबंधित बातम्या