धडाकेबाज शैली जपण्याचे नव्या प्रशिक्षकासमोर आव्हान

किशोर पेटकर
रविवार, 3 मे 2020

झिको यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघाने आयएसएल स्पर्धेतील तीन मोसमात ७० गोल नोंदविले. लोबेरा यांनीही संघाला आक्रमक राखले. टिकी-टाका शैलीमुळे त्यात आणखीनच भेदकता आली.

पणजी,

 इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघाने आपल्या खास शैलीची ओळख राखली आहे. धडाकेबाज खेळाची परंपरा कायम ठेवण्यासाठी नवे प्रशिक्षक स्पॅनिश ज्युआन फरांडो यांना झटावे लागेल.

एका मोसमाचा अपवाद वगळता झिको यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने आक्रमक खेळाद्वारे भारतीय फुटबॉलप्रेमींना मोहित केले, नंतर लोबेरो यांच्या स्पॅनिश टिकी-टाका शैलीने संघ आणखीनच धडाकेबाज बनला. प्रेक्षणीय फुटबॉलसह गोलांचा पाऊस पाडणाऱ्या संघाचा चाहतावर्ग मोठा आहे. हा लौकिक राखण्याचे आव्हान स्पेनचेच ज्युआन फरांडो यांच्यासमोर असेल.

झिको यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघाने आयएसएल स्पर्धेतील तीन मोसमात ७० गोल नोंदविले. लोबेरा यांनीही संघाला आक्रमक राखले. टिकी-टाका शैलीमुळे त्यात आणखीनच भेदकता आली. प्रतिस्पर्ध्यांवर धडाधड गोल करण्यात, सेट-पिसेसद्वारे वर्चस्व राखण्यात एफसी गोवा संघाने प्रभुत्त्व मिळविले. लोबेरा यांना स्पेनचा फेरान कोरोमिनास याच्यासारखा शार्पशूटर गवसला. लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने आयएसएल स्पर्धेत ११६ गोल केले. ४३ वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षकांना अचानक डच्चू मिळाल्यानंतर, हंगामी प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांनी अगोदरच्या प्रशिक्षकांचीच शैली पुढे नेली. त्यामुळे क्लिफर्ड यांच्या मार्गदर्शनाखालील पाच सामन्यांतच एफसी गोवाने प्रतिस्पर्ध्यांवर १९ गोल डागले. आयएसएल स्पर्धेत दोनशेहून (२०५) जास्त गोल करणारा एफसी गोवा हा एकमेव संघ आहे.

एफसी गोवा संघाने आयएसएल स्पर्धा जिंकलेली नाही, पण स्पर्धेतील मातब्बर संघ या नजरेने त्यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते. झिको यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने दोन वेळा प्ले-ऑफ फेरी गाठली, त्यापैकी एक वेळ अंतिम फेरी गाठताना उपविजेतेपद मिळविले. लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेळा प्ले-ऑफ फेरी गाठत, एकदा उपविजेतेपदापर्यंत मजल मारली, तसेच सुपर कपही जिंकला. गतमोसमात लोबेरा अखेरच्या टप्प्यात संघाचे प्रशिक्षक नव्हते, तरीही लीग विनर्स शिल्ड पटकाविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. क्लिफर्ड यांनी शैलीला धक्का न लावता संघाला प्ले-ऑफ फेरीत नेले.

आयएसएल स्पर्धेच्या इतिहासात एफसी गोवाने प्रभावी खेळाद्वारे चाहत्यांची संख्या वाढविली आहे. येत्या मोसमात ते एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतही खेळणार आहेत. मागील तीन मोसमात खेळलेले काही प्रमुख खेळाडू नव्या मोसमात नसतील हे स्पष्ट आहे, त्यामुळे नवे प्रशिक्षक फरांडो यांच्यासमोर गतवैभव टिकविण्याचे आव्हान जास्त असेल.

 

आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा

- १०८ सामने, ५१ विजय, २३ बरोबरी, ३४ पराभव

- २०५ गोल नोंदविले, १४५ गोल स्वीकारले

- २०१५ व २०१८-१९ मध्ये उपविजेतेपद

- २०१४, २०१७-१८, २०१९-२० मध्ये प्ले-ऑफ फेरीत माघार

- २०१९-२० मध्ये लीग विनर्स शिल्ड मानकरी

संबंधित बातम्या