सडा कचराप्रकल्‍पाची मुख्‍यमंत्र्यांकडून पाहणी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

कामाबाबत समाधान व्‍यक्‍त : सव्वालाख टन कचऱ्यावर लवकरच प्रक्रिया

पालिकेच्या नवीन कचरा प्रकल्पाची पाहणी करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला नगरविकासमंत्री मिलिंद नाईक व अन्‍य मान्‍यवर.

दाबोळी : सडा येथील पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये एक लाख वीज हजार टन कचरा कोणत्याही प्रक्रियाविना पडून आहे. सदर कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथील कचऱ्याचे ढिगारे हटविण्यासाठी काही अंतरावर अत्याधुनिक यंत्रणा असलेला नवा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सडा येथील नव्या प्रकल्पाला भेट देऊन एकूण कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
जुन्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात परिसरात पडून असलेल्या कचऱ्यावर नव्या प्रकल्पामध्ये प्रक्रिया करून वर्गीकरण करण्यात येत आहे. त्याची पाहणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, नगरसेवक शशिकांत परब, मुरारी बांदेकर, लिओ रॉड्रिग्ज, संजय सातार्डेकर, पालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर व इतर उपस्थित होते.

गोव्यात ठिकठिकाणी पडून असलेल्या कचरा ढिगारे हटविण्यासाठी गोवा सरकार मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहे. अशा प्रकारचे प्रकल्प महत्त्‍वाच्या ठिकाणी उभारून तेथे वर्षानुवर्षे पडून असलेल्या कचरा ढिगाऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच नव्या कचरा प्रकल्पाच्या कामासंबंधी दोन महिन्यानंतर पुर्नआढावा घेतला जाईल. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे कचरा पडून आहे तेथे अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्याचा विचार आहे. ५० वर्षांपासून पडून असलेला कचरा साफ करण्यासाठी सरकार दरवर्षी ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सडा येथे अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारल्याबद्दल त्यांनी कंत्राटदार कायतान यांचे खास अभिनंदन केले.

हे पाहा : कर्नाटक व केंद्राकडून गोव्याचा घात"

कंत्राटदार कायतान यांनी बोलताना सदर प्रकल्प स्वखर्चाने उभारला असून त्यासाठी ४.५ कोटी रुपये खर्च केले आहे. हा प्रकल्प वीस दिवसात उभारला आहे. कॅम कंपनी हा प्रकल्प हाताळत आहे. गोवन इंडस्ट्रीयलला ह्या कचरा प्रक्रियेचे काम दिल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केले. सदर एक लाख टनापेक्षा अधिक असलेला कचरा आम्ही चार महिन्यात तेथून हटविणार असल्याचे कायतान यांनी सांगितले.

संबंधित बातम्या