मुख्‍यमंत्री दहा दिवसांनी भेटले ‘लेकी’ला

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पार्थिवी.

अर्थसंकल्‍प तयारीच्‍या कामामुळे व्‍यस्‍त : अधिवेशन कामकाज संपल्‍यानंतर ‘रिलॅक्स’

मुख्यमंत्री गेल्या महिन्यापासूनच अर्थसंकल्‍पाच्‍या तयारीत अतिशय व्‍यस्‍त होते. त्यांनी संबंधित घटकांसोबत बैठकांचा सपाटा लावला होता. शेवटी शेवटी त्यांनी आपण लोकांसाठी उपलब्ध नसणार, असेदेखील जाहीर केले होते.

पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा वारसा चालवत मुख्यमंत्रिपदाची सुत्रे हाती घेतलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री या नात्याने आपला पहिलाच अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्‍प तयारीसाठी गेले दहा दिवस त्यांनी लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध नसल्याचे जाहीर केले होते. त्याचा फटका खुद्द त्यांच्या लेकीलासुद्धा बसला. २९ जानेवारीपासून ती आपल्या लाडक्या ‘पापा’ला भेटू शकली नव्हती. आज मात्र तिने आपल्या शाळेमधील मैत्रिणींसोबत विधानसभेत हजेरी लावत तब्‍बल दहा दिवसांनी ‘पापा’ची भेट घेतली.

तसेच याच कालावधीत दिल्ली येथे प्रचारासाठी बोलावणे आल्यामुळे वेळात वेळ काढून त्यांनी दिल्लीत जाऊन प्रचारसभादेखील घेतल्या. या गडबडीत २९ जानेवारीपासून आजपर्यंत त्यांना आपली लाडकी लेक ‘पार्थिवी’ची भेट घेता आली नव्हती. कधीतरी रात्री बारा किंवा एक वाजता एखादा फोन करून डॉ. सावंत हे आपल्या लेकीची खुशाली घेत होते.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्यावर्षी आजाराशी झुंज देत असतानादेखील अर्थसंकल्प सादर केला होता. पर्रीकर यांच्या पश्चात मुख्यमंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प सादर करताना अपेक्षांचे ओझे आणि राज्याच्या विकासाला गती देण्याचे आव्हान होते.

...आणि चेहऱ्यावर हास्‍य फुलले!
विधानसभा अधिवेशन संपता संपता कामकाजाचा प्रत्‍यक्ष अनुभव घेण्‍यासाठी आलेले विद्यार्थी ज्या मतदारसंघातून आले, त्यांचा आमदार किंवा मंत्री त्यांच्यासोबत समूह फोटो काढतो. आज साखळी मतदारसंघातील विद्यार्थी असल्याने साहजिकच त्यांचा मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढला जाणे नक्की होते. याच फोटोवेळी मुख्यमंत्री आपल्या लेकीला भेटले. लेकीला तर आपल्या ‘पापां’सोबत स्वतंत्र फोटो हवा होता. मुख्यमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत फोटो काढून झाल्यानंतर तिला होकर दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हास्‍य फुलले.

प्राथमिक शिक्षक वेतनापासून वंचित​

सभागृहातील गदारोळामुळे भेट लांबली...
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. मुख्यमंत्री थोडेसे ‘रिलॅक्स’ होऊन आपल्या लेकीला भेटण्याची शक्यता होती. मात्र, लेकीने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत विधानसभेचे कामकाज बघण्यासाठी हजेरी लावत ‘पापा’ मुख्यमंत्री म्हणून सभागृहात कसे काम करतात याचा प्रत्‍यक्ष अनुभव घेतला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी रोहन खंवटे यांच्या अटकेवरून गोंधळ घालण्यास सुरवात केल्यानंतर सभापतींनी कामकाज दुपारी साडे बारापर्यंत तहकूब केले.

विद्यार्थ्यांचीही केली विचारपूस
त्यानंतर काही वेळाने सभागृहात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी गॅलरीत बसलेल्या कारापूर - साखळी येथील डॉ. के.बी. हेडगेवारच्या विद्यार्थ्यांना ‘हाय, हॅलो’ केले. अगदी आस्थेने तुमचे सर, टीचर कुठे गेले? अशी विचारणादेखील केली. याच शाळेत सातवीमध्ये त्यांची लेक शिकत आहे. तेवढ्यात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि इतर सहकारी मुख्यमंत्र्यांजवळ आले. त्यावेळी बोलता बोलता त्यांनी आपली लेकदेखील आज विधानसभा कामकाज अनुभवण्‍यासाठी आल्याचे त्यांना सांगितले. एवढेच नव्हे, तर तिची ओळख होण्‍यासाठी उभे राहायला सांगून त्यांनी ती नेमकी कोण हे देखील दाखवून दिले.

पापाच्‍या भेटीमुळे पार्थिवी खूश...
या भेटीबद्दल मिसेस मुख्यमंत्री सुलक्षणा सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, २९ जानेवारीपासून पार्थिवी पापाला भेटलेली नव्‍हती. तिचे पापा रात्री एकदा फोन करून तिची खुशाली घेत असतात. आज पार्थिवीच्या शाळेतील विद्यार्थी विधानसभेचे कामकाज बघण्यासाठी गेल्यामुळे बाप लेकीची भेट झाली. लेक इतकी खूश होती की, तिला स्कूल बसमधून इतर विद्यार्थ्यांसोबत परत न येता पापाबरोबर थांबायचे होत. तिने फोन करून मला त्याची कल्पना दिली. पापा दहा दिवसांनंतर भेटल्यामुळे लेक मात्र भलतीच खूश आहे, एवढे मात्र नक्की.

पार्थिवीला प्रश्‍‍नोत्तर तास
अनुभवायचा होता...

पार्थिवीला सत्ताधारी आणि विरोधकांमधील रंगणारा प्रश्नोत्तरांचा तास अनुभवायचा होता. मात्र ,आज आमदार खंवटे यांच्या अटकेच्या प्रकरणावरून विरोधक सभापतींसमोरील हौद्यात गेले. त्यामुळे सभागृहात दुपारी साडेबारापर्यंत कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे पार्थिवी नाराज झाली. विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोरील हौद्यात जाऊन घातलेला गोंधळदेखील पार्थिवीला अजिबात आवडला नाही. अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर आपल्याशी बोलताना पार्थिवीने आज आपण नाखूश झाल्याचे मिसेस मुख्यमंत्री यांनी सांगितले. विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यामुळे मुख्यमंत्री जनतेसाठी आणि कुटुंबासाठी आता उपलब्ध असतील आणि त्यांचे प्रश्न सोडवतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
 

संबंधित बातम्या