12  मद्यविक्रेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

मद्य अबकारी शुल्कवाढची पुनर्रचना

मुख्यमंत्र्याचे आश्‍वासन, मद्य व्यापारी संघटनेने घेतली भेट

गोव्यात आधीच पर्यटन क्षेत्रावर परिणाम होत आहे व त्यातच विदेशी बनावटीच्या मद्यावरील अबकारी शुल्कात वाढ केल्याने त्याचा फटका मद्य व्यापारावर पडला आहे.

पणजी : राज्यात मद्यांवरील अबकारी शुल्क वाढीवप्रकरणी आज गोवा मद्य व्यापारी संघटनेने मुख्यमंत्र्यांची आल्तिनो - पणजी येथील शासकीय भेट घेतली. फेणी व वाईन यावरील शुल्कात वाढ केली जाणार नाही मात्र मद्यावरील वाढीव शुल्कबाबत पुनर्रचना करण्याचे आश्‍वासन त्यांना देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी दिली.

गोव्यातील या मद्यांचे दर महाराष्ट्र व कर्नाटक वगळता इतर राज्यांच्या तुलनेत आधीच जास्त आहेत. ही अबकारी शुल्क वाढ केल्याने हे दर आणखी वाढले आहेत त्यामुळे पर्यटक हे मद्य खरेदी करणार नाहीत. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संघटनेची बाजू समजून घेतली. संघटनेतर्फे त्यांना ही शुल्क वाढ कमी करण्यासाठी दिलेल्या निवेदनावर विचार करण्याचे आश्‍वासन दिले.

अर्थसंकल्पात मद्यावरील अबकारी शुल्क वाढ केल्यानंतर फेणी या गोव्याच्या पारंपरिक मद्यावरही अबकारी शुल्क वाढ होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू होती. फेणी व वाईन या दोन्हीवर अबकारी शुल्क वाढवू नये अशी विनंती त्यांना करण्यात आली. इतर मद्यांवरील अबकारी शुल्कात केलेली वाढ काही प्रमाणात कमी करावी जेणेकरून त्याचा फायदा सरकारला तेसच मद्य व्यापाऱ्यांनाही होईल. मद्याच्या व्यापाऱ्यातून सरकारलाही महसूल मिळायला हवा हे मान्य आहे मात्र त्याचा फटका गोव्यातील मद्य बाजारपेठेवर होणार नाही याकडे पाहायला हवे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या वाढीव अबकारी शुल्कामधून सुवर्णमध्य काढण्यासाठी या शुल्काची पुनर्रचना करण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेऊ असे आश्‍वासन दिले.

मद्य अबकारी शुल्क वाढ कमी करण्यासाठी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देताना गोवा मद्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक व इतर पदाधिकारी.
देशातील महाराष्ट्र व कर्नाटक राज्य वगळता इतर राज्यांमध्ये विदेशी बनावटीच्या मद्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्या राज्यांनी अबकारी शुल्क कमी केले आहे तर पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मोठ्या प्रमाणात मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या मद्याच्या किंमती जास्त असल्यास कोणी खरेदी करणार नाही. तसेच त्याचा परिणाम पर्यटनावरही होऊ शकतो. राज्याला मद्याच्या व्यापाऱ्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो मात्र अबकारी शुल्कात वाढ झाल्यास त्याचा परिणाम महसुलावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही व मद्याच्या बाजारपेठेवर परिणाम होईल असे मत दत्तप्रसाद नाईक यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या