म्हादई बद्दल मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

कर्नाटकला म्‍हादईचे पाणी पळवू देणार नाही : मुख्‍यमंत्री

म्हादई नदीवरील कळसा, भांडुरा प्रकल्पाच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाने अन्य एका प्रकरणात स्थगिती दिली आहे. त्याशिवाय प्रकल्पाचे काम करण्यापूर्वी सर्व परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे कर्नाटक उद्यापासून प्रकल्पाला सुरवात करणार, असा जो प्रचार केला जात आहे तो चुकीचा आहे.

पणजी : म्हादई जलवाटप तंटा लवादाचा निवाडा अधिसूचित झाला म्हणजे उद्यापासून कर्नाटक पाणी वळवणार असे होणार नाही. गोवा सरकार कर्नाटकाला म्हादई नदीचे पाणी पळवू देणार नाही,असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुख्‍यमंत्री म्हणाले, लवादाचा निवाडा अधिसूचित करताना जलशक्ती मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकांच्या निर्णयावर ही अधिसूचना अवलंबून असेल असे स्पष्ट केले आहे.या दोन्ही याचिका गोवा व कर्नाटकाच्या आहेत. आम्ही लवादाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.त्यावर १५, १६ व २२ जुलै रोजी सलग सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.

कर्नाटकाने कोणतेही बांधकाम करू नये यासाठी गोवा सरकारने अर्ज केला असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात २ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.लवादाचा निवाडा २०१८ मध्येच झाला होता, तो आता अधिसूचित होणे हा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी होऊ नये, यासाठीही गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

लवादाने आपल्या निवाड्यात प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार केल्याशिवाय आणि कायद्याने आवश्यक अशा सर्व परवानग्या घेतल्याशिवाय निवाड्यानुसार दिलेले पाणी कर्नाटकाला वळवता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे निवाडा अधिसूचित झाला म्हणजे कर्नाटकाला प्रकल्पाचे काम करता येईल, असा जो अपप्रचार केला जात आहे तो निंदनीय आहे. जनतेने यातील सत्य समजून घ्यावे. सर्वोच्च न्यायालयासमोर म्हादई नदीचे रक्षण करण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे. निवाडा अधिसूचित झाल्यामुळे गोव्यावर अन्याय झाला, असे चित्र रंगवणेही चुकीचे आहे. जनतेने अशा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा  : स्‍वच्छता, चांगली वागणूक अंगी बाळगा

संबंधित बातम्या