चिनी कंपन्या संपर्कात नाहीत ः मुख्यमंत्री

Dainik Gomantak
रविवार, 3 मे 2020

संपर्क साधला तर आमची तयारी आहे. त्यासाठी ज्या सवलती देता येतील त्यावर काम करणे सुरु आहे.

पणजी

चीनमधून बाहेर पडणाऱ्या कोणत्याही कंपनीने राज्यात गुंतवणूक करण्यासाठी संपर्क साधलेला नाही. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यांनी तयारी ठेवावी, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सुचित करण्यात आल्याने तशी तयारी ठेवल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 
चीनी कंपन्या राज्यात गुंतवणूक इच्छूक असल्याची चर्चा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना अशा किती कंपन्यांनी व कोणत्या कंपन्यांनी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे अशी विचारणा केल्यावर ते म्हणाले, अशा कोणत्याही कंपनीने संपर्क साधलेला नाही. संपर्क साधला तर आमची तयारी आहे. त्यासाठी ज्या सवलती देता येतील त्यावर काम करणे सुरु आहे. यासाठी सेझ प्रवर्तकांकडून परत घेतलेली जमीन वापरली जाणार का असे विचारल्यावर त्यांनी त्या पर्यायाचाही विचार करता येईल असे उत्तर दिले.
ते म्हणाले, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. प्रदूषणमुक्त असा उद्योगांचे राज्यात स्वागत आहे. राज्यात औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भूखंड उपलब्ध केले जातील. एखादा मोठा उद्योग आणि त्याना सहाय्यभूत ठरणाऱ्या इतर कंपन्या गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. नवे उद्योग धोरणही आम्ही ठरवत आहोत. गुंतवणूक राज्यात येण्यासाठी हर संभव प्रयत्न सरकार करणार आहे. रोजगार निर्मिती हे या सरकारचे ध्येय आहे. 

संबंधित बातम्या