गोव्यात चर्चची मानवतावादी मदत

Dainik Gomantak
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

आर्चबिशप फिलीप नेरी फर्राव यांनी कोविड १९ महामारीच्या वेळी चर्चने मानवतावादी कार्य हाती घ्यावे असे आवाहन केले होते. त्यानुसार विविध ठिकाणच्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी स्थानिक भाविकांच्या मदतीने हे काम हाती घेतले आहे.

पणजी

कोविड १९ टाळेबंदीच्या काळात रोमन कॅथोलिक चर्चने राज्यभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले. समाजातील मागे पडलेल्या घटकांपर्यंत चर्चने आपली मदत पोचवली. चर्चचे हे मानवतावादी कार्य याहीपुढे सुरु राहिल अशी माहिती आर्चबिशपांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
आर्चबिशप फिलीप नेरी फर्राव यांनी कोविड १९ महामारीच्या वेळी चर्चने मानवतावादी कार्य हाती घ्यावे असे आवाहन केले होते. त्यानुसार विविध ठिकाणच्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी स्थानिक भाविकांच्या मदतीने हे काम हाती घेतले आहे. पणजीचे आल्बानो फर्नांडिस यांनी पणजीतील ३७ रोजंदारीवरील कुटुंबांपर्यंत किराणा साहित्य पोचवले. कोलवाळचे जानुरीओ दा कॉस्ता यांनी गरजूंना औषध पुरवठा केला तर गिरीचे आनंद द गामा यांनी गावातील चारशे गरजवंताना अन्न पुरवले. मिरामार येथील स्टेला मरीस कपेलाच्या वतीने ज्येष्ठ नागरीकांना आवश्यक त्या साहित्याची मदत करण्यात आली. शिरदोन येथे वालेरीन वाझ यानी गरजुंना खाद्यपदार्थांचे वाटप केले.कार्मोणा येथील रोझारीयो ओलीवेरा यांनी २५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. ओर्ली यथे रॉजर गुदिन्हो यांनी सोळाशे मुखावरणांचे आणि ३६ बांधकाम मजूर कुटुंबांना भाजीपाल्याचे वाटप केले.
बोर्डा मडगाव येथे सिमॉन डिकुन्हा यांनी दररोज तिनशे गरवंतांना अन्नदान करत आहेत तर ४०० कुटुंबांना किराणा माल दिला. त्यांनी अडकून पडलेल्या ९ गुजराती व्यक्तींनाही जीवनावश्यक वस्तू पुरवल्या. लोटली येथे लिर्गोन्हो डिकॉस्ता यांनी गरजवंतांना धान्य पुरवले. बाणावली येथे लुसिओ डायस यांनी १०० कुटुंबांना किराणा माल पुरवला. परिसरातील गरीब कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची तर एकच व्यक्ती राहत असलेल्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत देण्यात आली. आगोंद येथे रोमिओ डिसिल्वा यांनी १६ स्थलांतरीत मजूर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या. सावर्डे येथे विठल मिरांडा यांनी १८ कुटुंबांना किराणा माल पोचवला. काणकोणात इजिदोर डायस यांनी फ्लायओव्हर खाली राहणाऱ्या परप्रांतीयांच्या १० कुटुंबांना किरणा माल दिला. १२ गरजू कुटुंबांना दुप्पट कडधन्ये व प्रत्येकी एक हजार रुपयांची मदतही त्यांनी मिळवून दिली. बोगमाळो येथे लुर्डिन्हो परेरा यांनी ४० कुटुंबांना किराणा माल दिला. वास्कोत ॲंथनी रॉड्रिग्ज यांनी दोनशे कुटुंबांना किराणा माल पुरवला. चिखली येथे बोलमाक्स परेरा यांनी कोणी भुकेला राहता कामा नये याची तजवीज केली. 

संबंधित बातम्या