चर्चिल ब्रदर्सच्या विजयात क्लेन्सियोची हॅटट्रिक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

पणजी : क्लेन्सियो पिंटोच्या शानदार तीन गोलांच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने मंगळवारी गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत देखणा विजय मिळविला. नागोवा पंचायत मैदानावर झालेल्या लढतीत त्यांनी कळंगुट असोसिएशनचा ४-० फरकाने फडशा पाडला.

पणजी : क्लेन्सियो पिंटोच्या शानदार तीन गोलांच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने मंगळवारी गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत देखणा विजय मिळविला. नागोवा पंचायत मैदानावर झालेल्या लढतीत त्यांनी कळंगुट असोसिएशनचा ४-० फरकाने फडशा पाडला.

सामन्यातील सर्व चारही गोल उत्तरार्धातील खेळात झाले. क्लेन्सियोने आठ मिनिटांत तीन गोल नोंदवून कळंगुटच्या आव्हानातील हवाच काढली. त्याने अनुक्रमे ४८, ५१ व ५६व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. याशिवाय चौथा गोल शुबर्ट परेरा याने ६४व्या मिनिटास नोंदविला. पूर्वार्धात संधी गमावलेल्या क्लेन्सियो याने उत्तरार्धात त्याची भरपाई करत संघाला एकतर्फी विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

धेंपो क्लब विजयी

धुळेर-म्हापसा स्टेडियमवर माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबला विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्यांनी पणजी फुटबॉलर्स संघावर ४-३ अशी निसटती मात केली.
सामन्याच्या ८ व्या मिनिटास धेंपो क्लबने आघाडी घेतली. बीव्हन डिमेलो याने हा गोल केला. नंतर ३२ व्या मिनिटास कृष्ण गावस याने पणजी फुटबॉलर्स संघाला १-१ अशी गोलबरोबरी साधून दिली. ३८व्या मिनिटास आल्बर गोन्साल्विसच्या गोलमुळे धेंपो क्लबने २-१ अशी आघाडी घेतली.

उत्तरार्धातही नाट्य घडले. चंदन गावसच्या गोलमुळे ५०व्या मिनिटास पणजी फुटबॉलर्सने २-२ अशी बरोबरी साधली. ६९व्या मिनिटास सूरज हडकोणकरने गोल केल्यामुळे धेंपो क्लबला ३-२ अशी आघाडी मिळाली, पण ती अल्पजीवी ठरली. लॉयड कार्दोझने ७१व्या मिनिटास पणजी फुटबॉलर्सला पुन्हा ३-३ अशी बरोबरी साधून दिली. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना ८८व्या मिनिटाला आल्बर गोन्साल्विसने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल करून धेंपो क्लबचा विजय साकारला.

 

संबंधित बातम्या