शहर व नगर नियोजन मंडळ बैठक   

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

क्षेत्रबदलाच्या ४५ प्रस्तावांना मंजुरी
नगर व शहर नियोजनमंत्री कवळेकर यांची माहिती

पणजी : शहर व नगर नियोजन मंडळाच्या झालेल्या बैठकीत कायद्यातील १६ ब कलमानुसार क्षेत्रबदलसंदर्भात ५७ प्रस्ताव होते त्यापैकी ४५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर १० प्रस्ताव फेटाळण्यात आले. सुमारे ८० टक्के प्रस्तावामध्ये ५०० चौ. मी. पेक्षा कमी जमिनीचे क्षेत्रबदल करण्यात आल्याची माहिती नगर व शहर नियोजन मंत्री व उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी दिली.
अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर म्हणाले की, १० प्रस्ताव फेटाळण्यात आले त्यामधील ८ प्रस्ताव वन जमिनीतील होते व प्रत्येकी एक प्रस्ताव जलसाठा व खाजन जमिनीचे होते.

दोन प्रस्ताव स्थगित ठेवून ती मंडळाच्या समितीकडे वर्ग करण्यात आले आहेत. मंजूर करण्यात आलेल्या ४५ प्रस्तावांपैकी ३४ प्रस्ताव हे ५०० चौ. मी. पेक्षा कमी जमीन असलेले आहेत तर ११ प्रस्ताव हे ५०० चौ. मी. पेक्षा अधिक जमीन असलेले आहेत. या ४५ प्रस्तावामध्ये ५ लाख १६ हजार ५८४ चौ. मी. जमीन क्षेत्रबदल करण्यासाठी होते त्यातील फक्त ८० हार ५२८ चौ. मी. जमिनीच्या कलम १६ ब नुसार क्षेत्रबदलास परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिली.

दरम्यान, शहर व नगर नियोजन कायद्यात १६ ब दुरुस्ती आणून जमिनींचे क्षेत्रबदल करण्याचा निर्णय माजी मंत्री विजय सरदेसाई यांच्या काळात झाला होता. प्रत्येक प्रकरणानुसार हा क्षेत्रबदल करण्याचे त्यात नमूद केले होते. या दुरुस्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. ही जनहित याचिका दाखल करून घेण्यात येऊन गोवा सरकार या दुरुस्तीनुसार घेतले निर्णय हे याचिकेवरील निवाड्यावर अवलंबून असतील असे खंडपीठाने स्पष्ट केलेले आहे.
 

 

 

जिल्हा पंचायत आरक्षण प्रकरण

संबंधित बातम्या