स्‍वच्छता, चांगली वागणूक अंगी बाळगा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

स्वच्छता अभियानात सहभागी झालेले दयानंद आर्य हायस्कूलचे विद्यार्थी.

माधव खारवी : श्री दयानंद आर्य हायस्कूलतर्फे डोंगरी परिसरात स्वच्छता मोहीम

गोवा वेल्हा : समृद्ध भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्त्‍वाचे पाऊल स्वच्छतेचे असते. यासाठी आपण स्वतःबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्त्‍वाचे आहे. मग ती स्वच्छतेच्या किंवा चांगल्या वागणुकीच्या बाबतीत असो, असे प्रतिपादन श्री दयानंद आर्य हायस्कूलचे मुख्याध्‍यापक माधव खारवी यांनी केले.

नेवरा येथील श्री दयानंद आर्य हायस्कूलतर्फे डोंगरी परिसरातील स्वच्छता मोहीम अभियानाच्यावेळी विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्याचे मोलाचे काम शाळा करते. शाळा ही समाजाशी नाते सांगणारा घटक आहे, असेही खारवी पुढे म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत आर्य हायस्कूलचे सातवी, आठवी आणि नववीचे विद्यार्थी तसेच शिक्षक राजेश नाईक, त्रिशा सावंत, डिंपल नाईक, श्रद्धा पार्सेकर, संगीता सावंत, शिवनाथ गावस, जितेंद्र नाईक तसेच ग्रामस्थ मोहनदास नाईक, मनोज मडकईकर, लक्ष्मीकांत शिरोडकर, संजय शिरोडकर, संदीप शिरोडकर, शंकर नाईक, कमलाकर परांजपे उपस्थित होते.

डोंगरी थोरले भाट येथील इंत्रुज उत्सवाच्या पूर्वसंध्येला येथील देवळांची व मंडपाची विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षकांनी साफसफाई केली. मुख्याध्‍यापक माधव खारवी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या मंदिर परिसरातील स्वच्छतेच्या मोहिमे संदर्भात पालक व देवस्थान यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
 

संबंधित बातम्या