पोलीस हे जनतेच्या हितासाठीच नेहमी तत्पर

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

जनतेला पोलिसांनी चांगली सेवा द्यावी

मुख्यमंत्री डॉ. सावंत ः पोलिस खात्याला ४४ चारचाकी वाहने सुपूर्द

पोलिस खात्याला देण्यात येणाऱ्या वाहनांना हिरवा बावटा दाखविताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत पोलिस अधिकारी

पणजी : राज्यातील लोकांना पोलिसांकडून चांगली सेवा मिळावी यासाठी पोलिस खात्याला सर्व प्रकारची मदत सरकार नेहमीच करत आले आहे. त्यामुळे पोलिसांनीही जनतेला चांगली सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी (बुधवारी) पोलिस मुख्यालयातील मैदानावरील कार्यक्रमात बोलताना केले.

यावेळी त्यांच्या हस्ते खात्याच्या पोलिस नियंत्रण कक्षासाठी ४४ वाहने देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला मुख्य सचिव परिमल राय, पोलिस उपमहानिरीक्षक राजेशकुमार, मारुती कंपनीच्या चौगुले इंडस्ट्रिज लिमिटेडचे उपाध्यक्ष सुरेश अकेला, अधिकारी भारत संपथ, अनुप सिन्हा व तेजश्री पै उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सरकारला मारुती कंपनीने नेहमीच सवलतीच्या दरामध्ये वाहने उपलब्ध केली आहेत. पोलिस खात्यासाठी नवी वाहने देऊन लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.

गृह खात्याचा दर्जा वाढविण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे. पोलिस तसेच अग्निशमन दलाला वेळोवेळी आवश्‍यक असलेल्या सुविधा पुरविण्यात प्राधान्य दिले जात आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना उपमहानिरीक्षक राजेश कुमार म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती बिकट असूनही मुख्यमंत्र्यांनी पोलिस खात्याची विनंती मान्य करून ही वाहने मंजूर केल्याबद्दल खात्यातर्पे आभार मानतो. ही नवी वाहने पोलिस नियंत्रण कक्षासाठी असून त्याचा वापर राज्यातील तसेच महामार्गावरील गस्तीसाठी वापरण्यात येणार आहेत. या वाहनांवरील पोलिस खात्याचे ‘चिन्ह’ व नाव रात्रीच्यावेळी ती ठळकपणे दिसतील (फ्लोरेसेंट) अशी लावण्यात आली आहेत.

हे पाहा : भाजपमुळेच अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत : संबित पात्रा

आतापर्यंत ८५ वाहनांना मंजुरी...
पोलिस खात्यासाठी आतापर्यंत ८५ वाहने मंजूर झाली आहेत. त्यातील २ इनोव्हा क्रिस्ट वाहने यापूर्वीच पोलिस महासंचालकांसाठी आली आहेत. माजी पोलिस महासंचालकांनी त्याची मागणी केली होती मात्र अचानक त्यांचे देहांत झाल्यानंतर या गाड्या खात्याच्या ताफ्यात आल्या आहेत. ४४ एरटिगा वाहने आज खात्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. दोन फोर्च्युनर बुलेट प्रूफ गाड्या आल्या असून त्या इतर कामासाठी सर्व्हिस सेंटरकडे पाठवण्यात आल्या आहेत. आणखी २७ मोटारसायकली पोलिस खात्याला देण्यात येणार आहेत. या दुचाकीही गस्तीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती पोलिस खात्यातील वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 

संबंधित बातम्या