प्रशिक्षकपद जास्त आव्हानात्मक : क्लिफर्ड

dainik gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या २०१९-२० मोसमातील अखेरच्या टप्प्यात एफसी गोवा संघाचे हंगामी मुख्य प्रशिक्षकपद सांभाळलेल्या क्लिफर्ड यांनी आपल्या भावना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या संकेतस्थळावर व्यक्त केल्या. 

पणजी, 

 खेळाडूच्या तुलनेत प्रशिक्षकपद जास्त आव्हानात्मक आहे, असे भारताचे नवे प्रो-लायसन्स फुटबॉल प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांना वाटते. या गोमंतकीय प्रशिक्षकाने हल्लीच उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे प्रशिक्षणातील प्रो-डिप्लोमा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. प्रशिक्षकाने आपले तत्वज्ञान ठरवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या २०१९-२० मोसमातील अखेरच्या टप्प्यात एफसी गोवा संघाचे हंगामी मुख्य प्रशिक्षकपद सांभाळलेल्या क्लिफर्ड यांनी आपल्या भावना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या संकेतस्थळावर व्यक्त केल्या. ``२०१४ साली मी खेळत असताना प्रशिक्षक आर्थर पापास यांच्या संपर्कात आलो. त्यांना भेटल्यानंतरच मी प्रशिक्षक बनण्याचा विचार गांभीर्याने करू लागलो. प्रत्येक मिनिटाकडे लक्ष पुरविण्याची त्यांची वृत्ती मला भावली. आर्थर यांनीच मला प्रशिक्षणाकडे ओढले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही,`` असे निवृत्तीनंतर प्रशिक्षक बनण्याविषयी क्लिफर्ड यांनी सांगितले. खेळाडू व प्रशिक्षक यांचे मापन करता, प्रशिक्षकपद जास्त आव्हानात्मक आहे, असेही त्यांनी यांनी नमूद केले.

``२०१७ साली, खेळाडू या नात्याने व्यावसायिक फुटबॉलमधील अखेरच्या वर्षी चर्चिल ब्रदर्सकडून खेळत असताना डेरिक (परेरा) यांनी मला एफसी गोवा संघात रुजू होण्यास प्रेरित केले,`` असे क्लिफर्ड यांनी पुढे सांगितले. एफसी गोवाने प्रशिक्षकपदी संधी दिल्याबद्दल क्लिफर्ड यांनी क्लबचे आभार मानले. ``बरेच जण होते, पण क्लबने तरुण प्रशिक्षकावर विश्वास दाखविला. माझ्यासाठी ही फार मोठी बाब आहे. त्यांचा मी खूप कृतज्ञ आहे,`` असे ते म्हणाले.

 

`प्रशिक्षकाने आपले तत्वज्ञान ठरवावे`

``मी अजूनही सांगतो, फुटबॉल खेळणे ही जगातील उत्तम गोष्ट आहे, प्रशिक्षण नंतर येते,`` असे क्लिफर्ड यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील तुलना करताना सांगितले. क्लिफर्ड यांनी सांगितले, की ``तुम्ही प्रशिक्षक बनल्यानंतर, तुमच्या संघाने कोणत्या प्रकारचे फुटबॉल खेळायला हवे याबाबत आपले तत्वज्ञान ठरवणे गरजेचे आहे. मेंदू कोरा ठेवून तुम्ही मैदानावर जाऊ शकत नाहीत.`` त्यांनी पुढे सांगितले, की ``प्रशिक्षण ही सामान्य जबाबदारी नाही. येथे तुम्हाला खेळाडूचे मन वाचता आले पाहिले, विविध व्यक्तिमत्त्वांचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. त्याचवेळी तुम्हाला तंत्र, डावपेच यांचे सखोल ज्ञान हवे, केवळ एका खेळाडूची नव्हे, तर साऱ्या संघाच्या मानसशास्त्रविषयक बाबी समजता आल्या पाहिजेत. प्रशिक्षक आधुनिक असणे आवश्यक आहे.`` २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजच्या खेळाडूची मानसिकता पूर्णतः बदलली आहे. आजचा खेळाडू जास्त तत्पर, धीट आहे, त्यामुळे प्रशिक्षकाला सज्ज राहावे लागते, असे त्यांनी नमूद केले.

 

दबाव तोडतो आणि घडवतोही

``दबाव तुम्हाला तोडू शकतो आणि घडवूही शकतो. त्याला कसे सामोरे जाणे हे सामन्यागणिक जमते. जेवढा दबाव जास्त तेवढा मी अधिक संवेदनक्षम बनतो. दबावास मैलाचा दगड बनविणे महत्त्वाचे आहे, कारण दबावच तुम्हाला उच्च पातळीवर घेऊन जातोतुमची दुसरी बाजू शोधतो,`` असे क्लिफर्ड यांनी नमूद केले. खेळाडू या नात्याने आपणास पराभव नावडता होता, पण प्रशिक्षक या नात्याने त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असल्याचे या ३७ वर्षीय प्रशिक्षकाने स्पष्ट केले.

संबंधित बातम्या