कोलवाळ पंचायतीची भंगार अड्ड्यांवर कारवाई

Dainik Gomantak
गुरुवार, 9 जानेवारी 2020

श्रीाराम च्यारी
कोलवाळ

श्रीाराम च्यारी
कोलवाळ

कोलवाळ पंचायत क्षेत्रात दिवसेंदिवस भंगार अड्ड्यांची संख्या वाढत आहे. कोलवाळ ते करासवाडाच्या महामार्ग क्रमांक १७च्या दोन्ही बाजूंनी मार्बल व ग्रेनाईट विकण्यात येत आहेत. भंगार अड्ड्याकडून व मार्बल विकणाऱ्या व्यवसायिकाकडून कोलवाळ पंचायतीला महसूल किती मिळतो असा प्रश्‍न ग्रामस्थांकडून कोलवाळ ग्रामसभेत उपस्थित झाल्यानंतर कोलवाळ पंचायत मंडळाने याची गंभीर दखल घेत या भंगार अड्ड्यांवर कारवाई केली. सरपंच नित्यानंद कांदोळकर यांनी भंगार अड्ड्यांचे सर्वेक्षण करून बेकायदेशीर भंगार अड्ड्यांवर कारवाई करताना त्यांना दिलेला वीजप्रवाहही बंद करण्यात आला आहे.
कोलवाळ सरपंच नित्यानंद कांदोळकर यांनी सांगितले की, ५४ भंगार अड्ड्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याविषयी पंचायत संचालकाकडे बोलणी करुन कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करण्यासाठी कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सरपंच नित्यानंद कांदोळकर यांनी सांगितले.
कोलवाळ कोमुनिदादच्या जागेत भंगार अड्ड्यामुळे अनेक व्यवसाय चालतात. भंगारात खरेदी केलेल्या वस्तू पुरातन वस्तू म्हणून दामदुप्पट किंमत मोजून काही लोक खरेदी करतात. गाड्यांचे सुटे भाग विकणाऱ्या भंगार अड्ड्यावरुन काही लोक आपल्या वाहनासाठी उपयुक्त अशा वस्तू भंगार अड्डेवाल्यांकडून खरेदी करतात. जुन्या गाड्यांचे सुटे भाग, इंजिन व अन्य वस्तू खरेदी करतात. भंगार अड्ड्यावर काही वस्तू जाळून टाकतात, अशावेळी आग भडकून मोठ्या दुर्घटना घडण्याचे प्रकार वाढत आहेत.
महामार्ग क्रमांक १७च्या दोन्ही बाजूला कोमुनिदादच्या जागेत व खासगी जागेत मोठ्या प्रमाणावर मार्बल व ग्रेनाईटची विक्री होत असते. या मार्बल ग्रेनाईट विक्रीवर कायदेशीर नियंत्रण नसल्यामुळे हजारो रुपयांचा महसूल वाया जात आहे. कोलवाळ पंचायतीने मार्बल व ग्रेनाईट विकणाऱ्या व्यावसायिकांना कायदेशीर नोटीसा काढल्या आहेत. सर्व मार्बल व ग्रेनाईट विकणाऱ्यांनी कोलवाळ पंचायतीला कायदेशीर मार्गाने ठराविक रक्कम या मार्बल विकणाऱ्या व्यवसायांकडून घेण्यात येणार असल्याचे कोलवाळ सरपंच नित्यानंद कांदोळकर यांनी सांगितले. अशा पंचायत नोटीसा पाठवल्यानंतर बहुसंख्य व्यवसायिक कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कोर्टात धाव घेतात. त्यामुळे अशा लोकावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायत संचालकांची सल्ला मसलत करण्यात येणार असल्याचे कोलवाळ सरपंच नित्यानंद कांदोळकर यांनी सांगितले.

मासिक हप्प्त्याचा बोलबाला...
कोलवाळ भागात भंगार अड्ड्यांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारचा या लोकांना वरदहस्त असल्याचे काही लोक सांगतात. भंगार अड्डेवाल्याकडून मासिक हप्ता गोळा करण्यात येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कोलवाळ भागातील भंगार अड्डे म्हणजे सोन्याचे अंडी देणारी कोबंडी आहे, असा काही लोकांचा समज आहे. त्यामुळे कोलवाळ पंचायत क्षेत्रातील भंगार अड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस कशी वाढत आहे व कोणाच्या आशीर्वादाने भंगार अड्ड्यातून दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. भंगार अड्ड्यांच्या नावाखाली काही ठिकाणी नवीन सामान विकले जात आहे. लोखंड, ऍल्युमिनियमच्या सामानाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

भंगार अड्ड्याद्वारे होणाऱ्या
व्यवहाराकडे कानाडोळा नको

बाजारात व्यवसाय करणाऱ्यांना हजारो रुपयांचा टॅक्‍स भरावा लागतो. तसेच जीएसटी टॅक्‍समुळे सामान्य लोकांना हजारो रुयांचा टॅक्‍स भरावा लागतो. भंगार अड्डयावर विकण्यात येणाऱ्या नवीन सामानाला जीएसटी व अन्य करांचा काहीच संबंध येत नाही. त्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असूनही खाते डोळे झाक करून भंगार अड्ड्यांवर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही.

स्थानिकांसाठी कायदेशीर सोपस्कारचा नियम
महामार्गाच्या दोन्ही बाजूना मार्बल व ग्रेनाईट विकणाऱ्यांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे. पंचायतीला मात्र या व्यवसायातून काहीच महसूल मिळत नाही. कोलवाळ पंचायत क्षेत्रातील एखाद्याला दुकान सुरु करायचे असल्यास पंचायतीकडून ना हरकत दाखला घ्यावा लागतो. त्यासाठी कार्यालयीन सोपस्कार पूर्ण करण्यासाठी एक चौदाच्या उताऱ्याची प्रत पंचायतीला द्यावी लागते व जागा किंवा घर कोणाच्या नावावर आहे याचा तपशील द्यावा लागतो.
भंगार अड्डेवाल्यांना व मार्बल ग्रेनाईट विकणाऱ्यांना कोणतीच कायदेशीर कारवाई न करता व्यवसाय करीत आहेत. गावातील लोकांना मात्र एखादा व्यवसाय सुर करण्यासाठी कायदेशीर कार्यालयीन सोपस्कार पूर्ण केल्याशिवाय पंचायतीकडून व्यवसाय करण्यासाठी ना हरकत दाखला मिळत नाही.

संबंधित बातम्या