काँग्रेसचे शिक्षण संचालनात ठिय्‍या आंदोलन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

‘गेट आउट’ म्‍हटल्‍याने वाद : अखेर पोलिसांकडून शिष्‍टमंडळाला अटक

शिक्षण संचालिका वंदना राव यांना जाब विचारताना काँग्रेस शिष्टमंडळ.

 काँग्रेस शिष्टमंडळाला अटक करून पोलिस स्थानकात नेताना.

 

पर्वरी : सेंट्रल झोन आणि उत्तर विभागातील शिकविणाऱ्या अनुदानित शिक्षकांना जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप न झाल्यामुळे काँग्रेस शिष्टमंडळातील वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी व प्रतिमा कुतिन्‍हो यांच्या नेतृत्त्‍वाखाली आज शिक्षक संचालिका वंदना राव यांना विचारण्यासाठी गेले असता चर्चेदरम्यान संचालिका राव यांनी या शिष्टमंडळाला उद्देशून ‘गेट आउट’ म्हटल्यामुळे संतप्त झालेल्या शिष्टमंडळाने केबिन बाहेर ‘त्या’ अपमानास्पद शब्दाबद्दल माफी मागावी म्हणून एक तास ठिय्या आंदोलन केले.

यावेळी पोलिस उपअधीक्षक अॅडविन कुलासो यांनी शिष्टमंडळाला विनंती करून कार्यालयाच्या बाहेर जाण्याची विनंती केली. पण, शिष्टमंडळाने शिक्षण संचालिकेने माफी मागावी, असा आग्रह धरला.पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून त्यांना जबरदस्तीने शिक्षण संचालनालयाच्या बाहेर काढले व पर्वरी पोलिस स्थानकात आणून अटक केली व नंतर वैयक्तिक हमीवर सोडण्यात आले.

शिक्षकांचे वेतन ठरले वादास कारण?
सेंट्रल झोन आणि उत्तर विभागातील अनुदानित सरकारी प्राथमिक शिक्षकांना जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप झाले नसल्याने आणि उच्च माध्यमिक शाळामधील व्यावसायिक अभ्यासक्रम पुढील वर्षापासून सरकार बंद करीत आहेत. हे दोन महत्त्‍वाचे मुद्दे घेऊन काँग्रेस शिष्टमंडळ शिक्षण संचालनालयात गेले होती. सुरवातीला पोलिसांनी शिष्‍टमंडळाला मुख्य दरवाजाजवळ अडविण्यात आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांबरोबर बरीच हुज्जत घालण्यात सुरवात केली. शेवटी दहा लोकांना संचालिका राव यांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली. पण, पोलिसांनी पत्रकारांना आत जाण्यास मज्जाव केला. दरम्‍यान, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पत्रकारांनाही आत जाण्यास परवानगी देण्यात आली. संचालिका राव यांनी काही तांत्रिक कारणामुळे वेतन देण्यास थोडा उशीर झाला असल्याचे मान्य केले व येत्या दोन तीन दिवसांत वेतन देण्‍यात येईल, असे सांगितले. तसेच सरकारचा उच्च माध्यमिक शाळांमधील व्यावसायिक अभ्यासक्रम करण्याचा कोणताच निर्णय झालेला नाही, असे सांगितले.

काँग्रेस पक्षाला नक्कीच चांगले दिवस येणार : गिरीश चोडणकर

...आणि ठिणगी पडली!
शिष्टमंडळ बाहेर जाण्याच्या तयारीत असताना राव यांनी ‘गेट आउट’ असे म्हटले आणि वातावरण पुन्हा तापले. शिष्टमंडळाचे सर्व सदस्य कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडून बसले व संचालिका राव यांच्या विरोधात जोरजोराने घोषणा देऊ लागले. संचालिका राव यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी करू लागले. पण संचालिका राव यांनी शेवटपर्यंत माफी मागितली नाही. उलट पोलिसांमार्फत सर्व शिष्टमंडळाच्या सदस्यांना अटक केली व नंतर वैयक्तिक हमीवर सोडण्यात आले. यावेळी उपअधीक्षक अॅडविन कुलासो, निरीक्षक रापोस व अन्य पोलिसांचा फौजफाट मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

जनहिताच्या प्रश्नाचा विचार करताना खातेप्रमुखांनी संवेदनशीलतेने वागले पाहिजे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी शिक्षण संचालकांनी केलेला व्यवहार अनपेक्षित व अनावश्यक होता. अधिकारी वर्ग संवेदनशील हवा. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून योग्य पावले टाकावीत.
दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

 

संबंधित बातम्या